मोहाचा एक क्षण

 " सर मी माझ्या हातावर दगडाने मारून घेतले." अमर(नाव बदलले आहे) सांगत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले होते. "पण मी परत असं करणार नाही सर!", एक निश्चयही त्याच्या बोलण्यातून डोकावत होता.

सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. अमर आणि गौरांग (नाव बदलले आहे) हे महाविद्यालयाचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी. आमच्या मएसो महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात एकाच खोलीत राहत होते. त्यावेळी मोबाईल फोनचा प्रसार वाढायला सुरुवात झाली होती. गौरंगच्या वडिलांनी त्याला एक भारी किमतीचा मोबाईल विकत घेऊन दिला होता. नवाकोरा मोबाईल अचानक चोरीला गेला. चौकशी सुरू झाली पण त्यातून चोर काही सापडला नाही. गौरंगच्या वडिलांनी पोलिसात जाण्याची धमकी दिली आणि त्यातून अमरने मोबाईल चोरल्याचे कबूल केले. तो मोबाईल त्याने परत दिला. स्वतःच्या वडिलांनादेखील या घटनेबद्दल त्याने सांगितले. त्याच्या वडिलांनी , "आता याची शिक्षा काय करून घ्यायची ते तूच ठरव" असे अमरला सांगितले आणि मग अमरने दगडाने स्वतःच्या हातावर मारून घेतले. मोहाच्या एका क्षणी अमरने हा मोबाईल चोरला होता. पण हा प्रसंग त्याच्या वागणुकीला कलाटणी देणारा ठरला. पदवीचे शिक्षण होईपर्यंत तो आमच्या वसतिगृहात राहिला. या प्रसंगानंतर तो पुन्हा अशा मोहाच्या वाट्याला गेला नाही आणि त्याने चांगली शैक्षणिक प्रगती  केली.

६- ७ वर्षांपूर्वी अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या फेसवॉश, बॉडी स्प्रे यासारख्या गोष्टींच्या चोरी होत असल्याचा तक्रारी आमच्याकडे आल्या. ज्यांची चोरी झाली होती त्यांनी त्यांचा संशय गोपाळवर (नाव बदलले आहे) असे सांगितले. त्या वेळचे वसतिगृहप्रमुख डॉ.उमराणी आणि मी दोघांनी मिळून चौकशी केली. त्यात गोपाळने बाथरूममध्ये पडलेली फेस वॉशची ट्यूब उचलल्याचे कबूल केले. मुलांना वाटले की त्यानेच सर्व चोर्‍या केल्या आहे. परंतु चौकशीअंती लक्षात आले की केवळ एकदाच त्याच्या हातून अशी चूक घडली आहे. मुलांनीच नंतर हे आम्हाला सांगितले. गोपाळशी बोलून त्याला समजावून सांगितले.


४-५  वर्षांपूर्वी मुलींच्या वसतिगृहात वरचेवर चोर्‍या होऊ लागल्या. मी मुलींशी बोललो. त्यांना लक्ष ठेवून राहा असे सांगितले. मुलींनी पाळत ठेवून चोरी करणाऱ्या आदितीला(नाव बदलले आहे) पुराव्यासह पकडून दिले. या मुलीच्या आईला बोलावून घेतले. आपल्या मुलीचा या वागण्याने तिची आई अगदी लज्जित झाली होती. " आदितीचे १२ वीचे वर्ष आहे. तिला एकच संधी अजून द्या.मी तिची हमी घेते ", असे त्या माऊलीने शब्दशः पदर पसरून सांगितले. त्या माऊलीची गयावया बघून डॉक्टर उमराणी आणि मी यांनी आदितीला संधी दिली. तिने उर्वरित वर्ष कोणतीही तक्रार येऊ दिली नाही. ती बारावी उत्तीर्ण झाली.


अशा अजून काही घटना मी अनुभवल्या आहेत. मोहाच्या एका क्षणी मुलामुलींपैकी काहीजण चूक करून बसतात. पण सारासार विचार करून त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधणे, त्यांना एक संधी देणे यातून त्यांच्यात चांगला बदल घडू शकतो हे मी अनुभवले आहे. कारण ही महाविद्यालयात शिकणारी मुलं मुली आहेत, सराईत गुन्हेगार नव्हेत. मुलामुलींमध्ये होणाऱ्या परिवर्तनावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे असे वाटते.

सुधीर गाडे, पुणे


Comments

  1. होस्टेल जीवन हे वेगळेच असते,त्यातून येणारे अनुभव,वैचारिक उंची वाढवतात
    मी ही गरवारेच माजी विद्यार्थी आहे,सध्या याच संस्थेमध्ये अध्यापनाचे काम करत आहे,म ए सो ने आम्हा ला खूप काही दिले आहे,गाडे सरांचे अनुभव हे नावाप्रमाणेच 'गाढे' आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख