रॅगिंग...?
" सर , आपल्या वसतिगृहातल्या मुलाने रॅगिंग झाल्याची तक्रार नवी दिल्लीच्या हेल्पलाईनवर केली आहे. काय प्रकार आहे?" सुमारे नऊ दहा वर्षापूर्वी सकाळी ८ च्या सुमाराला मला त्यावेळचे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गुप्ता सरांचा फोन आला. तिथून पुढे चौकशीला सुरुवात झाली.
गेल्या काही वर्षात 'रॅगिंग 'हा शब्द महाविद्यालयात वसतिगृहात परिचयाचा झाला आहे काही ठिकाणी यातून गंभीर घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच महाविद्यालय आणि वसतिगृह या ठिकाणी हा शब्द गांभीर्याने घेतला जातो. त्याबद्दलची उपाय योजना देखील केली जाते.
प्रकार असा घडला होता. वसतिगृहातील प्रथम वर्षाचे तीन विद्यार्थी सकाळच्या पीटीनंतर एका खोलीत गप्पा मारत बसले होते. एकमेकांची चेष्टा चालू होती. पण गमतीगमतीत चाललेल्या चेष्टेचे रूपांतर अचानक थट्टेत झाले. एका विद्यार्थ्यांच्या बाबतीत अपघाताने थोडे लाजिरवाणे वर्तन घडले. प्रसंग घडल्यानंतर उरलेले दोघे आपापल्या खोल्यात गेले. ज्याच्या बाबतीत ही घटना घडली त्याला ही थट्टा नकोशी वाटली. त्याने सर्वत्र प्रसिद्ध होणाऱ्या अँटी रॅगिंग हेल्पलाईनच्या क्रमांकावर लगेच फोन लावला आणि पुढची कार्यवाही सुरू झाली. दिल्लीहून पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात फोन, पोलीस आयुक्तालयातून डेक्कन पोलीस स्टेशनला आणि तिथून महाविद्यालयाच्या प्राचार्यांना फोन आला. तोपर्यंत हा चेष्टा-मस्करीचा प्रसंग मी आणि त्यावेळचे वसतिगृहप्रमुख डॉ. उमराणीसर यांच्यापर्यंत न येता थेट फोन केला होता. माहिती मिळाल्यानंतर आम्ही चौकशीला सुरुवात केली. त्यातून सर्व प्रकार उघड झाला.झाल्या प्रकाराचा संकोच वाटल्याने त्याने फोन केला होता. अपघाताने प्रकार घडला होता जाणून-बुजून नाही हेदेखील संबंधित विद्यार्थ्याने मान्य केले त्याच्याशी संवाद केल्यानंतर त्याने याबाबत आपली तक्रार मागे घेण्याचे मान्य केले. मग महाविद्यालयाकडून सर्व स्पष्टीकरण पोलीस आणि अँटी रॅगिंग हेल्पलाईनला पाठवण्यात आले आणि या घटनेला पूर्णविराम मिळाला.
हा प्रसंग घडल्यानंतर रॅगिंग म्हणजे काय याविषयी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातील प्रा. ए. टी. साठे यांचे विशेष व्याख्यान आम्ही आयोजित केले.
नंतर एकदा, सुमारे ७-८ वर्षांपूर्वी, अकरावीतील विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर एकमेकांच्यात चेष्टा-मस्करी झाली. तो विद्यार्थी आपल्या गावी निघून गेला. त्याच्या पालकांनी महाविद्यालयाच्या तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली. त्या समितीच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार समितीने सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि समिती निष्कर्ष काढला की हा विद्यार्थ्यांच्या अवखळपणाचा परिणाम आहे. तक्रार करणारा विद्यार्थी आणि अन्य विद्यार्थी सगळ्यांनीच एकमेकांची चेष्टा केली. पण हा प्रसंग रॅगिंगचा नाही. सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले आणि या प्रसंगावर पडदा पडला.
प्रा. र.वि. कुलकर्णीसर वसतिगृहप्रमुख असताना त्यांनी दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला नवीन विद्यार्थ्यांची विशेष सभा घेण्याची पद्धत सुरू केली. ती आम्ही पुढे चालू ठेवली. त्या सभेत आम्ही विद्यार्थ्यांना रॅगिंगबाबतची माहिती देत असतो. महाविद्यालयाच्या नव्या वातावरणात विद्यार्थ्यांना रूळताना अडचणी येतात. आम्ही त्यातून मार्ग काढतो. गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली की विद्यार्थ्यांच्यात अधिक मोकळेपणा येतो आणि नवीन विद्यार्थी देखील वसतिगृहात चांगले राहतात. अद्याप आमच्या वसतिगृहात रॅगिंगची गंभीर घटना घडली नाही हे विद्यार्थ्यांचे श्रेय आहे.
सुधीर गाडे, पुणे
माहितीपूर्ण
ReplyDelete🙏
Delete👍
ReplyDelete🙏
ReplyDelete