नका रे......
" आमचा साहिल (नाव बदलले आहे) असं वागूच शकत नाही. आज तुम्ही त्याला वसतिगृहातून बाहेर काढत आहात पण चार वर्षांनी मी येऊन अभिमानाने त्याची पदवी दाखवेन." साहिलचे वडील त्यावेळचे वसतिगृहप्रमुख डॉ. उमराणी सर यांच्या टेबलवर हात आपटून म्हणाले. ही सुमारे सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट.
वसतिगृहात राहायला आल्यानंतर मुलामुलींना पुष्कळ स्वातंत्र्य मिळते. अनेक जण त्याचा जबाबदारीने उपयोग करतात परंतु काहीजण मात्र व्यसनांच्या मार्गाला लागतात असे अनुभव मला आले आहेत. ज्या मुला-मुलींना जबाबदारीची जाणीव राहत नाही ते आकर्षणाने, सोबत्यांच्या आग्रहाने व्यसनांच्या मार्गाला लागतात.
सुरूवातीला जो प्रसंग लिहिला आहे तो एका अतिशय हुशार विद्यार्थ्याबाबतचा आहे. साहिल हा कोकणातला, दहावीला ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेला विद्यार्थी. पण पुण्यात आल्यानंतर त्याला दारूचे व्यसन लागले आणि त्याची अधोगती सुरू झाली. ज्यावेळी हे लक्षात आले त्यावेळी आम्ही त्याला वसतिगृहातून काढून टाकायचे ठरवले. त्याच्या वडिलांना बोलावले. ज्यावेळी मुलाच्या व्यसनाबद्दल त्यांना सांगितले त्यावेळी त्यांचा विश्वासच बसला नाही. नंतर साहिल बारावीची परीक्षा जेमतेम उत्तीर्ण झाला. ज्या आत्मविश्वासाने साहिलच्या वडिलांनी साहिलने चांगल्या गुणांनी पदवी मिळवल्याचे सांगायला येतो असे सांगितले, ते प्रत्यक्षात आले नाही.
दारूच्या व्यसनाबरोबरच, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांच्या आहारी गेलेली मुले-मुलीदेखील आम्ही बघितली आहेत. एका मुलीच्या वडिलांना त्यांची मुलगी दारू पिते हे सांगितल्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. पण खात्रीपूर्वक माहिती असल्यानेच आम्ही तिला पुढील वर्षी प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला.
चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिका, वेब सिरीज यातून व्यसनांचे उदात्तीकरण होताना आपल्याला दिसते. तसेच समाजात व्यसनांचे प्रमाण वाढते आहे, त्याचबरोबर व्यसनांची स्वीकारार्हता वाढली आहे, काही प्रमाणात व्यसन हे दूषण नसून भूषण आहे असेदेखील समाजाला वाटते. या सगळ्याचा परिणाम मुला-मुलींवरही होत असतो. त्यामुळे मुळात समाजाच्या विचारांच्या आणि आचारांच्या पातळीवर सुधारणा होणे आवश्यक आहे असे वाटते.
अशी व्यसनांच्या आहारी जाणारी मुलेमुली लक्षात आल्यानंतर एवढेच वाटते, बोलले जाते," नका रे....."
सुधीर गाडे, पुणे
खरंय सर.
ReplyDeleteदुर्दैवी परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे.
Deleteजळजळीत सत्य नेमक्या शब्दात 👍
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसमाज माध्यमातून व्यसनाच अनाठायी उदात्तीकरण होत आहे
ReplyDeleteहो
Delete