गाथा गांधारची

        गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्थानची पुष्कळ चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानचे प्राचीन नाव गांधार असल्याचा उल्लेख आढळतो. महाभारतामधील धृतराष्ट्राची पत्नी गांधारी ही याच प्रदेशातली. याच प्रदेशाचे नाव उपगणस्थान असल्याचादेखील उल्लेख आढळतो. या प्रदेशात अनेक शतके हिंदू आणि बौद्ध शासकांनी राज्य केल्याचा उल्लेख इतिहासात आहे.


  सन ६५० मध्ये धर्मांध अरबी मुस्लिमांचे आक्रमण या प्रदेशावर झाले. हा अर रवि इब्न झियाद नावाचा आक्रमक होता. यावेळी सिस्तान येथे राज्य करणारा राजा रणबल याने त्याचा पराभव करून आपली राजधानी जरंग परत जिंकली. परंतु धर्मांध आक्रमकांच्या टोळ्या एकामागून एक येतच गेल्या. 


    नंतरच्या काळात रणबल दुसरा याने अब्दुल्ला, उबैदुल्ला, अब्दुर्रहमान यांचे आक्रमण परतवून लावले. त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. पण नंतर ८७० मध्ये याकूब लईसचा हल्ला झाला. त्यात विश्वासघाताने रणबलचा मृत्यू झाला.


   ८६५ नंतर  लघतुर्माणला कैद करून त्याचा मंत्री कल्लर(लल्लीय) हा राजा झाला. त्याने याकूब इब्न लइसच्या आक्रमणामुळे राजधानी काबूलवरून उद्भांडपूरला नेली. 


८९५ मध्ये कमल वर्मा हा राजा झाला.

९२१ भीमदेव राजा झाला. त्याने भीमकोटची निर्मिती केली.‌ त्यानंतर ९६० मध्ये जयपाल राजा झाला.  


९८६ गजनीवर धर्मांध आक्रमकांचा हल्ला झाला. ज्या सुबुक्तगीन, मुलगा महंमद यांनी हल्ला केला त्यांची मोठी हानी झाली. पण ९९० मध्ये जयपालच्या विशाल सेनेचा सुबुक्तगीनकडून पराभव झाला.  नंतर ९९७ मध्ये महंमद राजा झाला.  त्याने नव्याने १००१ मध्ये आक्रमण केले. त्यात जयपालची संपूर्ण हार झाली. कैद केलेल्या *जयपालची विटंबना करून हत्या* करण्यात आली. 


त्यानंतर जयपालचा मुलगा आनंदपाल राजा झाला. त्याने १००९-१०१३ या काळात आक्रमणाचा प्रतिकार केला. त्याच्यानंतर १०१३-१०२१ या काळात  त्रिलोचनपाल या राजाने पराक्रमाची शर्थ करून प्रतिकार केला. प्रसिद्ध ग्रंथ  राजतरंगिणीमध्ये त्रिलोचनपाल राजाच्या  शौर्य आणि हौतात्म्याची प्रशंसा‌ वाचायला मिळते. 


    १०२१-१०२६ राजा भीमपाल याने आक्रमणाचा प्रतिकार केला पण यश आले नाही. आणि जवळपास ३७५ वर्षांच्या संघर्षानंतर गांधार धर्मांध आक्रमकांच्या ताब्यात गेला. इतिहासात नोंदले गेलेली ही शौर्यगाथा फारशी वाचायला मिळत नाही.


     'एकं सत् विप्रा बहुधाः वदन्ति' म्हणजेच 'सत्य एक परंतु तेच विद्वान अनेक प्रकारे सांगतात' अर्थात 'ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग असून ते सर्व सत्य आहेत' या शाश्वत विचाराचा पराभव होऊन 'आम्ही सांगतो तोच एकमेव सत्य मार्ग'  असे सांगणार्‍या धर्मांधांचा विजय झाल्याने या प्रदेशाला सतत जाच, छळवणूक यांना सामोरे जावे लागत आहे. ही छळवणूक संपेल की नाही, संपली तर ती कशी संपेल हे कदाचित काळच ठरवेल.


( संदर्भ डॉ.शरद हेबाळकर लिखित 'मुस्लिम आक्रमण का हिंदू प्रतिरोध') 


सुधीर गाडे, पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख