रूग्णालयात देखभाल
"सर, अर्जुनच्या पोटात खूप दुखते आहे म्हणून आम्ही त्याला संजीवनी रुग्णालयात घेऊन आलो आहोत. इथल्या डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करून घ्यायला सांगितले आहे. तुम्ही डॉक्टरांशी जरा बोला." साधारण ५-६ वर्षांपूर्वी मला वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा फोन आला.
दरवर्षी साधारणपणे दोन-तीन वेळा असे प्रसंग येतात. वसतिगृहातील मुलाला किंवा मुलीला काहीतरी दुखणे सुरू होते, ते वाढत जाते आणि रुग्णालयात दाखल करावे लागते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वसतिगृह असल्याने आमच्या वसतिगृहाच्या व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी वेगळे मनुष्यबळ नाही. परंतु वर्षानुवर्षांच्या या पद्धतीनुसार दरवर्षी नवीन मुलांच्या सभेमध्ये अशा प्रसंगी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे असे विद्यार्थ्यांना सांगितले जाते. वसतिगृहातील जुनी मुलेमुली अनुभवातून हे करत असतात. तीच पद्धत पुढे चालत आली आहे.
विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर बहुधा वसतिगृहातर्फे आधी फोनवर बोलणे होते.आवश्यक ते उपचार सुरू केले जातात. रूग्णालयात जाऊन विद्यार्थी, डॉक्टर यांना भेट घेतली जाते. पालक, स्थानिक पालक यांना कळवले जाते. वसतिगृहातील विद्यार्थी आवश्यक ती सर्व मदत करतात. प्रसंगी आजारी विद्यार्थ्याचे पालक, नातेवाईक येईतोपर्यंत रुग्णालयात मुक्काम देखील करतात. योग्य त्या उपचारानंतर बरे वाटल्यावर विद्यार्थ्याला रुग्णालयातून सोडले जाते. असा अनुभव मुले आणि मुली दोघांच्याही बाबतीत येतो.
वसतिगृहातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या अर्जुन गुरखुदे याच्या पोटात दुखत होते. त्यामुळे त्याचे जोडीदार सुमित गांधी, विशाल शेळके, वसतिगृहातील वरच्या वर्गाचा विद्यार्थी सागर काळे यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. ॲपेंडिक्सचे निदान झाले आणि शस्त्रक्रियादेखील करावी लागली. त्यानंतर तो बरा झाला. अर्जुनसारखे आणखी काही विद्यार्थ्यांचेही चांगले अनुभव माझ्या लक्षात आहेत.
परस्परांना वेळप्रसंगी मदत करण्याची ही पद्धत, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वेळ प्रसंग ओळखून जबाबदारी घेऊन पार पाडता येते हे लक्षात आणून देते. ही पद्धत चांगल्याप्रकारे चालू आहे याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांनाच आहे.
सुधीर गाडे, पुणे
वसतिगृह एक कुटुंब ....नात्यापलिकडचं सहजीवन
ReplyDeleteहो सर
Deleteविद्यापीठात 6 नंबर होस्टेलला असताना असेच एका मित्राला रात्री 2.30 वाचता किडनी स्टोन ने दुखल्याने स्कुटीवर रत्ना मेमोरियलला नेले होते, त्याची आठवण झाली. ☺️
ReplyDeleteअसे अनुभव कायम लक्षात राहतात.
Delete👍
ReplyDelete