भोरजवळील आंबवडे

 



मार्च २०१५ मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या सहलीच्या निमित्ताने भोरजवळील आंबवडे गावी जाण्याचा योग आला. भोरपासून १० किमीवर हे गाव आहे. भोरहून गावाकडे जाताना वाटेत लाल रंगांची फक्त फुले असणारी सुईरीची अनेक निष्पर्ण झाड सध्या लक्ष वेधून घेतात. गावात पोचल्यावर समोर येतो तो १९३७ साली भोरचे तत्कालीन संस्थानिक पंतप्रतिनिधी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला झुलता पूल. ( Suspension bridge) . हा पूल तिथल्या ओढ्यावर बांधला आहे. पूल ओलांडून साधारण १५ पायर्या चढून नंतर ३० पायर्या उतरलो की आपण पोचतो ते नागेश्वर मंदिराच्या परिसरात. हे भगवान शंकराचे ऐतिहासिक दगडी मंदीर आहे. या दगडी मंदिरात उन्हाळ्याच्या दिवसातही चांगला गारवा जाणवतो. मंदिराच्या परिसरात असलेल्या गोमुखातून बाराही महिने पाणी समोरच्या कुंडात पडते. हे पाणी कोठून येते ते सांगता येत नाही असं गावकरी म्हणाले. हे गोमुख पांडवकालीन आहेे असे त्यांचे म्हणणे आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला छोटा धबधबा आहे. मंदिराभोवती झाडी आहे. या मंदिराशेजारी लग्नकार्यासाठी मंडप आहे. तसेच पूूल ओलांडल्यानंतर पंतप्रतिनिधी घराण्याचे संस्थापक तसेच घराण्यातील अन्य दिवंगत व्यक्तींच्या समाध्या आहेत. छोट्या सहलीसाठी हे ठिकाण छान आहे.

"माणसे हवी आहेत."
वनवासी कल्याण आश्रमाच्या या सहलीत सहभागी होत असताना स्वामी विवेकानंदांचे हे शब्द आठवले. या सहलीमध्ये बहुतेक सगळे ज्येष्ठ नागरिक होते परंतु तरूणांच्या उत्साहाने वावरत होते. मनात विचार आला या कामाला मनाने तरूण असणार्यांबरोबर शरीराने तरूण असणार्यांची आवश्यकता आहे. " वनवासी नगरनिवासी आम्ही सारे भारतवासी" हा विचार घेऊन वनवासी कल्याण आश्रम काम करतो. महाराष्ट्रामध्ये वसतिगृहे,शाळा,रोजगार प्रशिक्षण केंद्र, आरोग्य रक्षक,खेलकूद प्रकल्प यासारख्या विविध आयामांद्वारे लाखो वनवासी बांधवांच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्याचे काम अनेक कार्यकर्ते करत आहेत. वनवासी बांधवांच्यामधूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवलेले चैत्राम पवार, लिंबाराम, ठमाताई पवार यांच्यासारखे कार्यकर्ते पुढे आले आहेत. या कामामध्ये आपणही आपला वाटा उचलू शकतो. आठवड्यातील काही तास प्रत्यक्ष कामासाठी देणे, वाढदिवस ,घरातील मंगलप्रसंग यानिमित्ताने देणगी देणे, निधीसंकलनासाठी प्रयत्न करणे, वनवासी मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे यासारख्या विविध पद्धतीने यात सामील होऊया.


संपर्क 020 24460944 ,
श्री.विनायक खाडे 942010453
"भारताचिया महारथा या सारे मिळूनी ओढूया".
१७/३/२०१५




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख