ट्यूब्ज कापून वापरूया

 


'काय चेंगटपणा चालू आहे'. घरातील संपत आलेली टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, फेस वॉश  इ.च्या ट्यूब्ज कापून वापरायला सुरूवात केली की हे वाक्य काही वेळा ऐकू येतं. असं बोलणाऱ्याला वाटतं की काय हा पैसा वाचवण्याचा प्रकार चालू आहे. पण जरा बारकाईने विचार केला की याचा परिणाम आणि प्रमाण लक्षात येईल. विविध गोष्टींसाठीच्या ट्यूब कापून त्यातील गोष्टी पुढे अनेक दिवस वापरता येतात. यात पैसा वाचतो हे तर सहज लक्षात येतं. पण मुद्दा दृष्टिकोनाचादेखील आहे. भारतीय विचारानुसार एखाद्या गोष्टीचा, वस्तूचा शक्य तितका अधिकात अधिक उपयोग केला पाहिजे. यामागे संसाधनांचा पुरेपूर उपयोग होत असतो.


या दृष्टीकोनाबरोबरच नुकसान किती होतं याचं गणितदेखील पुढे दिलेल्या माहितीवरून सहज लक्षात येईल.आमच्या महाविद्यालयात दैनंदिन जीवनातील वस्तू वापरून वैज्ञानिक प्रयोग/खेळणी बनवण्याचा कार्यक्रम चालू होता. तेव्हा कार्यक्रम घेणाऱ्या व्यक्तिने कापून वापरलेल्या टूथपेस्टच्या ट्यूबपासून प्रयोग करून दाखवताना अचानक विचारले की तुमच्यापैकी कितीजण अशा पद्धतीने ट्यूब कापून वापरतात? या प्रश्नानंतर चार साडेचारशे व्यक्तिंनी भरलेल्या सभागृहात मोजकेच १५-२० हात वर झाले. म्हणजे जेमतेम ५% लोक असं करतात हे लक्षात आले. आपल्या भारताची सध्याची लोकसंख्या १३० कोटींपेक्षा जास्त आहे. एका कुटुंबात सरासरी पाच माणसं आहेत असे गृहित धरले तर भारतात २६ कोटींपेक्षा जास्त कुटुंबे आहेत.  २६ कोटी कुटुंबांपैकी ९५% कुटुंबं ट्यूब कापून वापरत नाहीत असे माझ्या अनुभवावरून गृहित धरले तर २४.७ कोटी कुटुंबे होतात.एका कुटुंबात सरासरी ३ ट्यूब वापरून संपतात असे गृहित धरता येईल. म्हणजे भारतात दर महिन्याला ७४.१ कोटी ट्यूब कापून न वापरता टाकून दिल्या जातात. अशा कापून न वापरलेल्या ट्यूबमध्ये ५% गोष्टी न वापरता  टाकून दिल्या जातात असे समजले तर ३.७०५  कोटी ट्यूब वाया जातात असे म्हणता येईल. यातून होणाऱ्या राष्ट्रीय नुकसानाचा अंदाज येऊ शकतो.

अजून एक वेगळा मुद्दा म्हणजे पैशाचे नुकसान लगेच लक्षात येते पण कोणतीही गोष्ट तयार करताना सध्याच्या उत्पादन प्रक्रियेत पर्यावरणाचेही काही ना काही नुकसान होते. त्यामुळे अशा पुरेपूर न वापर करण्यामुळे पर्यावरणाच्या नुकसानात भर पडते.

ट्यूब कापून न वापरणाऱ्या सर्वांना नम्र आवाहन की कृपया इथून पुढे आपल्या घरातील ट्यूब वापरून संपत आल्यावर कापून ट्यूबमधील गोष्टीचा पुरेपूर वापर करावा.

सुधीर गाडे पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख