काळजी घेऊया धास्ती नको...
" गाडे सर तुमच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर कोविड केअर सेंटर सुरू होते आहे असं ऐकलं." दुसऱ्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या आवारात राहणाऱ्या माझ्या एका परिचितांचा काळजीच्या सुरात साधारण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात फोन आला. मी उत्तर दिलं," तुम्ही चुकीचं ऐकलं. माझ्या घरापासून पाच मीटर अंतरावर हे सेंटर सुरू होत आहे." इथे आम्ही काय काय काळजी घेणार आहे हे मी त्यांना सांगितले. त्यांच्या घरापासून थोड्या लांब अंतरावर सुरू होणाऱ्या प्रस्तावित कोविड केअर सेंटरच्या कल्पनेने थोड्या काळजीत पडलेल्या त्यांना जरा हायसं वाटलं.
कोरोनाचा प्रसार वाढत जाणार हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणा मार्च महिन्यातच कामाला लागल्या होत्या. २१ मार्चलाच मा.जिल्हाधिकाऱ्यांनी वसतिगृह अधिग्रहित केल्याचा आदेश दिला होता. एप्रिल महिन्यात याठिकाणी सेंटर सुरू करण्याबाबत महानगरपालिकेचे मा.उपायुक्त मुठे साहेब स्वतः येऊन पाहणी करून गेले होते. पोलीस खाते,शिक्षण सहसंचालक यांच्या कार्यालयातून देखील दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता वसतिगृह कोविड केअर सेंटर होणार हे लक्षात आले होते. पण कधी एवढाच प्रश्न होता. कोरोनाचा प्रसार सर्वत्र होत होता त्यामुळे इथून दुसरीकडे जावे असे कधीही आम्हा तिघांच्या मनात आले नाही.
२७ एप्रिल ते २४ मे २०२० या दिवसांत पुण्यामधील सर्वाधिक बाधित वस्त्यांमध्ये प्राथमिक सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम सरकारी यंत्रणा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांच्यावतीने करण्यात आला. त्यावेळी डॉक्टर आणि स्वयंसेवक यांच्या निवासासाठी वसतिगृहाचा वापर करण्यात आला.
जून महिन्याच्या शेवटी शेवटी आता कोविड केअर सेंटर सुरू करावे लागणार अशा चर्चा सुरू झाल्या. याठिकाणी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महानगरपालिका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि सह्याद्री रुग्णालय यांच्या समन्वयातून सेंटर सुरू करण्याचा निर्णय झाला. एप्रिल महिन्यात आम्ही वसतिगृहाची खोल्यांतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या साहित्याची काही प्रमाणात आवराआवर करून ठेवली होती. पण आता वसतिगृहाच्या विद्याविहार,विनय विहार आणि वनिता विहार या तीनही इमारती पूर्णपणे ताब्यात द्यायच्या होत्या. त्यामुळे वसतिगृह कर्मचाऱ्यांनी सामान हलवणे, साफसफाई करणे यासारखी सर्व कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण केली. यासाठी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, वसतिगृह समितीचे अध्यक्ष मा. ॲड. धनंजय खुर्जेकर यांचे मार्गदर्शन आणि सूचना मिळाल्या. सेंटरमध्येे काम करणाऱ्या डॉक्टर आणि स्वयंसेवकांच्या निवासासाठी म.ए.सो.च्या आबासाहेब गरवारेेे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.बी. बुचडे यांनी महाविद्यालयातील वर्ग उपलब्ध करून दिले. मुलींचे वसतिगृह आवरताना माझी पत्नी सौ. शैलजा हिने नेहमीप्रमाणेच स्वेच्छेने आणि पुढे होऊन काम केले. आणि आवराआवर पूर्ण होत असतानाच २१ जुलै २०२०ला प्रत्यक्ष रूग्ण यायला सुरुवात झाली.
कोविड केअर सेंटर सुरू झाले तरी वसतिगृहाचे कामकाज सरकारच्या सूचना पाळून सुरूच ठेवायचे होते. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केल्या.
समाजात या रोगाच्या प्रसाराबद्दल असलेली धास्ती, समज गैरसमज हे लक्षात घेता येथील कर्मचाऱ्यांनी अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता होती. यासाठी आवश्यक ती जागृती केली. पद्धती ठरवून दिल्या.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीकडे जागा ,वीज आणि पाणी, पुणे महानगरपालिकेकडे रुग्णांची भोजन व्यवस्था आणि स्वच्छता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीकडे स्वयंसेवकांची व्यवस्था आणि सह्याद्री रुग्णालयाकडे वैद्यकीय व्यवस्था अशा पद्धतीने व्यवस्थांचे वाटप झाले. जबाबदारी निश्चित करण्यात आली. सेंटर चालू असताना अनेक छोट्यामोठ्या अडचणी आल्या. पण त्या त्या वेळेचे सेंटरचे प्रमुख श्री प्रसाद जोग, श्री.दत्तात्रय काळे आणि ॲड.दीपक भोपे यांच्याशी चर्चा करून आणि महाविद्यालयाचे मालमत्ता व्यवस्थापक श्री.नंदन सप्तर्षी यांच्याद्वारे हे प्रश्न सोडविण्यात आले.
२१ जुलै ते २६ ऑक्टोबर या काळात येथे १३८९ रुग्ण येऊन सेवेचा लाभ घेऊन गेले. यामध्ये या सेंटरची प्रशंसा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,सरकारी यंत्रणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, सह्याद्री रुग्णालय यांच्या परस्पर समन्वयाने येथील सेंटर चांगल्या प्रकारे कार्य करू शकले.
पुण्यातील मध्यभागात अन्य काही महाविद्यालयांच्या वसतिगृहात देखील कोविड केअर सेंटर सुरू करण्याची योजना होती. परंतु सर्व जुळवाजुळव झाल्याने तेथे ती कार्यरत होऊ शकली नाहीत.
आज १ नोव्हेंबर २०२० रोजी येथील सेंटरचे काम करणारे शेवटच्या तुकडीतील स्वयंसेवक देखील आपापल्या घरी गेले आहेत. तेव्हा हा प्रवास पुन्हा एकदा आठवला.
सर्व काळजी घेतल्याने कोविड केअर सेंटर असतानादेखील वसतिगृहाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कोविडची बाधा झाली नाही.त्यामुळे कोरोना न होण्याची काळजी घ्यावी धास्ती नको असे वाटते.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment