भोजनालय
वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या दृष्टीने एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भोजनालय. मी आमच्या वसतिगृहातील तसेच अन्य वसतिगृहांमधील बऱ्याच जणांना विचारलं की भोजनालयातील जेवण कसं असतं. बहुतेक वेळा उत्तर येतं की " ठीक असतं."
म.ए.सो.महाविद्यालयीन वसतिगृहातील भोजनालयदेखील याला अपवाद नाही. इथल्या वसतिगृहात भोजनालय चालवताना अनेक गोष्टी होत गेल्या, होत जातात, होत जातील.
मुख्य गोष्ट म्हणजे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईच्या हातचे जेवण या भोजनालयात मिळत नाही. तसे ते कुठल्याच भोजनालयात मिळू शकत नाही. त्यामुळे भोजन हे 'ठीक आहे' या गटातीलच वाटणार. दुसरी गोष्ट भोजनाच्या बाबतीत कंत्राटदारांचा, त्यांच्या कामगार वर्गाचा आपलेपणा हा नेहमी मर्यादितच राहणार. भोजनाच्या बाबतीत 'संगती दोष' नावाचा एक दोष सांगितला जातो. त्यामध्ये भोजन बनवणाऱ्यांच्या विचारांचा परिणाम भोजनावर होतो असे लक्षात येते. हाच संगती दोष भोजनालयातील भोजनाच्या बाबतीत अनुभवायला येतो. भोजनालयात मध्यम तिखट, मध्यम मसालेदार असे भोजन बनवले जाते. काही मुला मुलींना खूप तिखट खायची सवय असते तर काही जणांच्या घरी याचा वापर अगदी मर्यादित होतो. त्यामुळे सर्वांना आवडेल असे भोजन नेहमी बनवता येत नाही. तसेच भोजनालयातील आचाऱ्याच्या हाताच्या चवीची सवय होते आणि त्यामध्ये तोचतोचपणा वाटतो. मुलांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात तर मुलींच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात.
यात काही वेगळे अनुभवदेखील येतात. काही आचाऱ्याच्या हातचे पदार्थ मुलांना खूप आवडतात. याच पदार्थांची मुले-मुली वारंवार मागणी करतात.काही जणांची मुला-मुलींची जवळीक होते,आपलेपणा वाढतो. त्याचा चांगला अनुभव येतो.
बरेच वर्षे आमच्या म.ए.सो.वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या भोजनालयात भोजन घेणे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे होते. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर गेल्या काही वर्षांपासून वसतिगृहाच्या भोजनालयात भोजन घेणे हे ऐच्छिक ठेवले आहे. तसेच भोजनालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी, सूचना करण्यासाठी, आठवड्याचा बेत ठरवण्यासाठी भोजनालय समिती देखील बनवली जाते. आठवड्यामध्ये भेटून भोजनामध्ये काय त्रुटी राहिल्या, काय असावे याबाबत चर्चा होऊन निर्णय केले जातात. त्याचा परिणाम म्हणून कंत्राटदारावर देखरेख वाढली आहे. परंतु काही वेळा निष्काळजीपणे भोजनाबाबत तक्रारी या उद्भवतातच. भोजनालयाबाबतच्या तक्रारींसाठी काहीवेळा कंत्राटदार अथवा त्यांचे कामगार हे जबाबदार असतात.तर काही वेळा मुला-मुलींचे वागणे , त्यांचे अनाठायी आग्रह जबाबदार असतात. काहीवेळा विद्यार्थी आणि कामगार हमरीतुमरीवर आल्याचे देखील मी बघितले आहे. अशावेळी मार्ग काढणे ही कौशल्याची बाब ठरते.
आमच्या म.ए.सो.वसतिगृहातील भोजनालयाचे कंत्राटदार अनेक वेळा बदलले गेले. प्रत्येकाने आपापल्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला. इतक्या वर्षात भोजनालयाबाबतचे अनेक प्रसंग लक्षात राहिले आहेत. त्यापैकी काही प्रसंग सांगता येतील.
एकदा एक विद्यार्थी माझ्याकडे भोजनालय याबाबतची तक्रार घेऊन आला मी त्याला विचारले ," तुला कोणत्या भाज्या आवडतात ते तू सांग." तो सांगू लागला," एक टोमॅटो.…...". पुढे जवळपास दोन तीन मिनिटे तो शांत उभा राहिला पण त्याला दुसरी आवडती भाजी सांगता आली नाही. अशा मुलाला भोजनालयातील भोजन आवडणार नाही हे तर उघडच आहे. सहा सात वर्षांपूर्वी एकदा भोजनालयातील तक्रारींना कंटाळून एके दिवशी सर्व मुलामुलींनी दुपारच्या भोजनावर बहिष्कार टाकला. संध्याकाळी ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्या वेळचे वसतिगृहप्रमुख डॉ. एन. एस. उमराणी आणि मी मुलांशी बोललो. त्यांची समजूत घातली आणि शक्य त्या सुधारणा केल्या. हा प्रसंग मला भावूक करून गेला होता.
वसतिगृह सोडल्यानंतर विद्यार्थी-वद्यार्थिनींनाइ थल्या भोजनालयाची आठवण येत राहते. सुमारे दोन वर्षांपर्वी आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या काही बैठका घेतल्या. त्यावेळी भोजनालयातच भोजन ठेवले. वसतिगृहाच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींना वसतिगृहात भोजन केल्याचा आनंद पुन्हा एकदा अनुभवता आला.
सुधीर गाडे,पुणे
बरेच वेळा विदयार्थी असताना गेस्ट म्हणून तसेच महाविद्यायातर्फे external examiner म्हणून जेवणाचा प्रसंग आला त्याची आठवण झाली. सुंदर शब्दकन. Dr. V C Kakade T C College Baramati साखरवाडी ग्रुप
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteSaturday ला रात्री आणि Sunday ला सकाळी जेवण करण्याची काय वेगळीच गंमत यायची...
ReplyDeleteया आठवणी सुखावतात.
Delete