सहल
" तुमच्या दृष्टीने मौजमजेला प्राधान्य तर आमच्या दृष्टीने सुरक्षिततेला प्राधान्य." दरवर्षी निघणाऱ्या वसतिगृहाच्या सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जातात.
वसतिगृहातील उपक्रमांमध्ये सहलीची प्रतीक्षा अनेक विद्यार्थ्यांना असते. दरवर्षी साधारण जानेवारी महिन्यात वसतिगृहाची सहल शिवनेरी, लेण्याद्री, रायगड, महाबळेश्वर, पाचगणी, दिवेआगर, आक्षी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जात असते. याच्या नियोजनात विद्यार्थी प्रतिनिधींचा सहभाग असतो. कामे वाटून दिली जातात. जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. इच्छुक मुलेमुली उत्साहाने सहभागी होत असतात. जाता येताना गाण्यांच्या भेंड्या, आरडाओरडा, दंगामस्ती असा सहभाग मुला-मुलींचा असतो. परंतु अशा या आनंदाच्या प्रसंगी सुरक्षितता राखणं महत्त्वाचं असतं. कारण उत्साहाच्या भरात एखादा प्रसंग ओढवू शकतो. त्यामुळे सहलीपूर्वी सभा घेऊन मुला-मुलींना तपशीलवार सूचना दिल्या जातात. त्यांच्या उत्साहात मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत इकडे लक्ष दिलं जातं. सुदैवाने आजपर्यंतच्या सहली चांगल्या पद्धतीने पार पडल्या आहेत.
अशा सहलींमधील अनेक प्रसंग मला आठवतात. २००८ मध्ये वसतिगृहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त निवासी सहल दिवेआगर, मुरूड, जंजिरा येथे काढण्यात आली होती. पहिल्या दिवशी दिवेआगरला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी मुलेमुली जंजिरा किल्ल्याकडे निघाले. पण एक विद्यार्थिनी मागे राहिली. तेव्हा दिवेआगरचे वसतिगृहाचे नेहमीचे स्नेही बापट यांनी स्वतःची गाडी काढून त्या मुलीला काही किलोमीटर अंतरावर बसमध्ये आणून सोडले.
सुमारे सहा वर्षांपूर्वी सहल रायगडावर गेली होती. मुलामुलींचा एक गट तेव्हाचे वसतिगृहप्रमुख डॉ.एन.एस.उमराणी यांच्याबरोबर गडाच्या पायऱ्यांच्या मार्गाने निघाला. तर मी दुसऱ्या गटाबरोबर रोपवेने निघालो. आमचा मुलगा चि.शंतनू त्यावेळी ६वीत होता. तो उत्साहाने उमराणीसरांबरोबर निघाला. उत्साहाने न थांबता तो सगळ्यात पुढे गेला. उमराणीसर आणि बाकीची मुले मुली मागे राहिले. थोड्या वेळाने फोन झाला तेव्हा शंतनू उमराणी सरांच्या बरोबर नाही हे समजलं. मी आणि शैलजा दोघंही बेचैन झालो. एकामागून एक मुलामुलीला फोन सुरू झाले. थोड्या वेळाने वसतिगृहातील केरळचा विद्यार्थी के.रोहित याच्यासोबत शंतनू आहे हे समजले. रोहितशी मी बोललो. तोपर्यंत ते दोघे गड फिरून खाली उतरू लागले होते. रोहितने शंतनूकडे लक्ष दिले.गडाखाली उतरल्यावर त्याला जेवू घातले. आम्ही गड फिरून खाली पोचलो.शंतनूला प्रत्यक्ष बघून आमचा जीव भांड्यात पडला. हा प्रसंग आम्ही दोघे कायम लक्षात ठेवू.
Comments
Post a Comment