पी.टी.
"आपला पाल्य वसतिगृहातील सक्तीचा व्यायाम करण्यास तयार आहे का?" गेली अनेक वर्षे म.ए.सो.महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रवेश अर्जावर हा प्रश्न लिहिलेला असतो. सर्व विद्यार्थी हो असा पर्याय निवडून प्रवेश घेतात. मग एका नवीन अनुभवाला सामोरे जातात.
साधारण २५-२६ वर्षांपूर्वी त्यावेळचे वसतिगृहप्रमुख प्रा.र.वि.कुलकर्णी सरांनी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम वसतिगृहात सुरू केला. आयुष्याच्या धकाधकीला सामोरे जाण्यासाठी शारीरिक क्षमता प्राप्त करून घेणे अतिशय आवश्यक आहे. या कल्पनेने शारीरिक क्षमता जोपासावी या हेतूने हा उपक्रम सुरू झाला. सकाळी ६ ते ६:३० या वेळात महाविद्यालयाच्या सत्रात अध्यापन सुरू असताना सक्तीच्या व्यायामाचा हा उपक्रम घेतला जातो. याच्या अंमलबजावणीमध्ये मुला-मुलींना सहभागी करून घेतले जाते. मुलांचा आणि मुलींची पी.टी.लीडर यांची निवड केली जाते. त्यांच्यावर पी.टी.घेण्याची जबाबदारी सोपवली जाते. कुलकर्णी सर , उमराणी सर यांच्यासोबत मी आणि आता मी आणि डॉ.विनायक पवार सर मुलांच्या बरोबर मैदानावर असतो. महाविद्यालयाच्या मैदानावर पळत -चालत फेऱ्या मारणे, जलदगतीचे व्यायामप्रकार करून घेणे, काही सोपी योगासने करून घेतली जातात. महत्वाचे म्हणजे दुसऱ्या सत्रात रथसप्तमीच्या आधी सूर्यनमस्कारांचे प्रशिक्षण दिले जाते. रथसप्तमीच्या दिवशी प्रमुख पाहुणे, संस्था, महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संगीताच्या तालावर सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक आयोजित केले जाते. सूर्यनमस्कारांचे प्रशिक्षण देण्यासाठी कै.जयंतराव कवठेकर, श्री.शरदराव गोडसे आणि पहिल्या वर्षापासून सातत्याने श्री.मनोज साळी असे अनेक प्रशिक्षक यात सहभागी झाले आहेत. रथसप्तमीच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील डॉ.जगदीश हिरेमठ, डॉ.के.एच.संचेती, डॉ.मिलिंद मोडक यांच्यासारखे अनेक प्रथितयश डॉक्टर तर सूर्यनमस्काराचा प्रसार करण्यासाठी झटणारे श्री.राज चौधरी, प्रा.राघव अष्टेकर , महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषणजी गोखले (निवृत्त) यांच्यासारखे अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून येऊन गेले आहेत.
(मा. डॉ.नितीन करमाळकर विद्यार्थ्यांसोबत सूर्यनमस्कार घालताना)
१ फेब्रुवारी २०१९ च्या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ.नितीन करमाळकर आले होते. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांबरोबर त्यांनीही सूर्यनमस्कार घातले होते.
रथसप्तमीच्या प्रात्यक्षिकाची तयारी करण्यासाठी आधी काही दिवस रात्री पाणी मारून मैदानावर तयार करणे, आखणी करणे यात मुलांचा आणि गेल्या काही वर्षांपासून मुलींचाही सहभाग करून घेतला जातो. महाविद्यालयीन जीवनात एक वेगळा अनुभव त्यांना मिळतो.
वसतिगृहातील काही मुले मुली मनापासून या प्रशिक्षणात सहभागी होतात. पण गेल्या काही वर्षांत एकूणच समाजाची जीवनशैली बदलली असल्याने , रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय लागलेली मुलेमुली बेशिस्तीबाबतच्या कार्यवाहीला घाबरून उसने अवसान आणून यात सहभागी होतात. जे मनापासून करतात त्यांना त्याचा फायदा निश्चितच होतो.
वसतिगृहात असताना अनिच्छेने सहभागी होणाऱ्या मुलामुलींनी त्यांच्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली की त्यांना याचे महत्त्व जाणवते. असे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी भेटले की उत्सुकतेने विचारतात " सर, अजून पी. टी.चालू आहे का?"
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment