कै.आबा कुलकर्णी यांचे पुण्यस्मरण
"सुधीर, चहा प्यायला जाऊया." मी साताऱ्यात शिकायला असताना अवचित आबाची हाक यायची. आणि मग चहाच्या निमित्ताने गप्पागोष्टी व्हायच्या. जाड भिंगाचा चष्मा, मोठ्याने बोलायची सवय, खांद्यावर थाप टाकून बोलणे ही त्याची वैशिष्ट्ये. साखरवाडी (ता.फलटण) या गावचा मी मूळचा स्वयंसेवक. शिक्षणाच्या निमित्ताने १९९० ते १९९४ ही चार वर्षे साताऱ्यात राहत होतो.याच दरम्यान माझा कै. विनायक शंकर कुलकर्णी म्हणजेच आबा यांचा परिचय झाला आणि बघता बघता या परिचयाचे दृढ संबंधांमध्ये रूपांतर झाले. या लेखाच्या निमित्ताने विचार करू लागलो की खरंच याचं काय बरं कारण असेल? इतक्या वर्षांनंतर पुन्हा विचार करताना असं वाटतं की माझ्यासारख्या बाहेरगावहून आलेल्या स्वयंसेवकाला आबांनी लावलेला जिव्हाळा वयाचं अंतर बाजूला सारून मी आणि माझे महाविद्यालयातील मित्र यांच्याशी केलेली मैत्री हीच त्याची प्रमुख कारणे असावीत. आबा आणि मी किंवा आबा आणि आम्ही मित्र यांच्या बाबत आठवू लागलो आणि अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. आम्ही शिकत असताना सातारा शहरातील महाविद्यालयीन तरूणांची सहल वासोटा किल्ल्यावर काढली हो...