कमलाकर पंत गद्रे

पाच फुटांच्या आतबाहेर उंची, गव्हाळ वर्ण, कुरळे केस, खर्जाकडे झुकलेला आवाज अशा शरीरप्रकृतीचे कमालकर महादेव गद्रे हे पंत गद्रे म्हणून संघस्वयंसेवकांना परिचित आहेत. १७/१०/२०२१ रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतनाचा संस्मरणीय कार्यक्रम साताऱ्यात झाला. यावेळी संघशरण कमलाकरपंत गद्रे हे पुस्तक प्रकाशित झाले. यात मी एक लेख लिहिला आहे.

     सातारा शहरात मी १९९० ते १९९४ या काळात शिकायला होतो. या काळात मी दोन वर्षे सेनापती सायं शाखा मुख्य शिक्षक आणि एक वर्ष शहर कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले. याकाळात माझा आणि कमलाकरपंतांचा संबंध आला. ११ सप्टेंबर १९९३ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेतील भाषणाला १०० वर्षे झाल्यानिमित्त देशभर सर्वत्र कार्यक्रम करण्याची योजना केली गेली होती. त्यानिमित्ताने सातारा शहरातदेखील अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होतो. तिथेदेखील  प्राचार्यांच्या परवानगीने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वक्ते म्हणून पंतांना बोलावले होते. या कार्यक्रमात पंतांचे बोलणे नेहमीप्रमाणेच चांगले झाले. ते इतके प्रभावी झाले की त्या कार्यक्रमात आभार प्रदर्शन करणारा आमचा मित्र शांताराम शिंदे हा नि:शब्द झाला. काही वेळाने त्याने आभारप्रदर्शन केले. 


१९९४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर मी सातारा सोडले. त्यानंतर २०१४ पासून प्रांत बौद्धिक मंडळाचा सदस्य झाल्यावर पंतांशी बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संपर्क येऊ लागला. प्रांत बौद्धिक मंडळाच्या बैठकीत पंतांचा सहभाग हा नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरक असतो. चर्चा चालू असलेल्या विषयांबाबत त्यांचे मूलभूत चिंतन ऐकायला मिळते. संघकार्याची धारणा अधिक स्पष्ट होत जाते. कोविड काळात आपल्या सगळ्या बैठका ऑनलाईन होऊ लागल्या. या काळात पंतांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलं. त्यांचं मार्गदर्शन ऑनलाईन बैठकांतदेखील मिळत आहे.


पंतांचा सुरेख अक्षर, उत्तम गीतगायन यांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. कोविड काळात प्रांतातील गीतगायकांचे ऑनलाईन एकत्रीकरण होत असे‌. त्यात पंतांची उपस्थिती नियमित असे. याच एकत्रीकरणात  पंतांनी योजनेनुसार संघगीत उत्कटतेने सादर केले. सहभागी आम्हा सर्वांनाच त्याची संस्मरणीय अनुभव आला. श्रीराम जन्मभूमी मंदीर निधी संकलन अभियानात आपल्या मुंबईतील एका स्वयंसेवकांने जन्मभूमी संघर्षावर एक गीत लिहिले. त्याला प्रांतातील दोघा स्वयंसेवकांकडून चाल लावून घेतली. यापैकी कोणती चाल निश्चित करायची याबाबत पंतांशी बोलणे केल्यावर पंतांनी लगेचच त्याबाबत निर्णय दिला आणि ते गीत सर्वांना पाठवले गेले.

जवळपास सात दशके संघकामात सातत्याने सक्रीय असणारे पंत नेहमी सकारात्मक वृत्तीने काम करत राहिले आहेत.

पंतांना निरामय दीर्घायुष्य लाभावे ही परमेश्वरचरणी प्रार्थना!


सुधीर गाडे, पुणे


Comments

  1. प्रांताच्या एका बौद्धिक विभागाच्या प्रशिक्षण वर्गात पंतांची भेट झाली. प्रशिक्षण ह्या विषयावर पंतांनी घेतलेलं चर्चासत्र अजूनही तसंच डोक्यात आहे. "संघानुकूल जीवन पद्धती" हे दिवाळी स्नेहमीलन मधील त्यांचं बौद्धिक नेहमीच ऊर्जा देणारं आहे. त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा🙏

    ReplyDelete
    Replies
    1. सुबोध मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख