कार्यक्रमांच्या व्यवस्थेतील अनुभव
वक्त्यांनी पाणी पिण्यासाठी तांब्यावरील भांडे उचलले आणि पाणी ओतून घेऊ लागले तर तांब्या रिकामाच होता. आमच्या मएसो महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहाच्या एका कार्यक्रमातील काही वर्षांपूर्वीचा हा अनुभव.
कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा त्याचे नियोजन करताना सर्व लहानसहान बाबींचा विचार करून योजना करावी लागते काम वाटून घ्यावे लागते आणि काम करून घ्यावे लागते. गरजेप्रमाणे जागेवर दुरुस्ती करावी लागते सातवा बदल करावा लागतो. काहीवेळा तपशीलवार विचार केला असला तरी अतिशय गमतीदार अनुभव येतात त्यापैकीच हे काही अनुभव.
आमच्या वसतिगृहात दरवर्षी अनेक कार्यक्रम होत असतात. कार्यक्रमापूर्वी सर्व सूचना दिल्या जातात. पण तरीही एकदा वर सांगितल्याप्रमाणे अनुभव आला. रिकामा तांब्या बघितल्यानंतर मग विद्यार्थ्यांनी धावपळ करून पिण्याचे पाणी आणून दिले ते वक्ते प्याले आणि मग कार्यक्रम पुढे सुरु झाला. या अनुभवानंतर मी कार्यक्रमापूर्वी सूचना देताना वक्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या आणि भांडे तयार ठेवायचे अशी सूचना देत असतो. अनुभवातून आलेलं शहाणपण..!
मी संभाजीनगरला १९९७ ते १९९९ या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होतो. तिथे एके वर्षी आम्ही विजयादशमीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली. त्याकाळी वीज वारंवार जात असे. त्यामुळे जनरेटर आणून ठेवायचा अशी चर्चा झाली. जनरेटर आणून ठेवला गेला. कार्यक्रम सुरू झाला. थोड्याच वेळात वीज गेल्याने जनरेटर सुरू करावा लागला. तो काही मिनिटे चालला आणि लगेच बंद पडला. नंतर चौकशी केल्यानंतर समजले की त्यामध्ये पुरेसे डिझेल नव्हते संबंधित कार्यकर्त्यांनी बारकाईने विचार केला नसल्याने असे घडले आणि गैरसोय व्हायची ती झालीच. तिथून पुढे कार्यक्रमात जनरेटर आवश्यक असेल तर यामध्ये डिझेल आहे की नाही हे बघून घ्यावे ही सूचना मी देत असतो.
नंतर १९९९ ते २००१ या काळात मी धुळ्याला जिल्हा प्रचारक होतो. जिल्ह्यामधील विजयपूर (सध्या प्रचलित नाव निजामपूर) या ठिकाणी शाखेचा वार्षिक उत्सव होता. त्यासाठी मी वक्ता म्हणून उपस्थित होतो. वक्त्यांसाठी म्हणून कार्यक्रमात कॉर्डलेस माइक होता. शाखेतील स्वयंसेवकांची प्रात्यक्षिके झाल्यानंतर मी बोलायला सुरुवात केली. थोड्या वेळाने लक्षात आले की माईक वरून बोलले तरी आवाज त्याचा उपयोग होत नाही. पण मी तसेच बोलणे चालू ठेवले. थोड्या वेळने माईक चालू झाला. काही वेळाने परत बंद पडला. परत चालू झाला. असे तीन-चार वेळा तरी झाले. कार्यक्रम संपल्यानंतर चौकशी केली तेव्हा समजले की त्या माईकच्या सिस्टीममध्ये चार्जेबल सेल होते. ते सुरुवातीला पुरेसे चार्ज नव्हते म्हणून माईक बंद पडला. सेल काढले गेले पण बोलणे चालू होते. म्हणून काही मिनिटे सेल चार्ज करून लावले गेले. ते परत डिसचार्ज झाले. परत चार्ज केले. परत लावले. असे वारंवार घडले. आता या स्पष्टीकरणावर काय करणार!
२०१० मध्ये मएसोच्या बारामती येथील विद्यालयाला संस्थेचे माजी विद्यार्थी कै. हरिभाऊ देशपांडे यांनी भरघोस देणगी दिली. त्याचा कार्यक्रम संस्थेचे माजी विद्यार्थी आणि त्यावेळचे केंद्रीय मंत्री मा.शरद पवार यांच्या उपस्थितीत होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांनी सरस्वतीच्या मूर्तीला फुले वाहून अभिवादन करायचे होते. पण ज्यावेळी सर्वजण मूर्तीपाशी गेले. त्यावेळी तिथे फुलेच नव्हती. प्रसंगावधान राखून पवार साहेबांनी हात जोडून नमस्कार केला आणि वेळ साधून नेली. नंतर लक्षात आले की ज्या ट्रेमध्ये फुले ठेवली होती तो ट्रे सरस्वतीची मूर्ती ज्या चौरंगावर ठेवली होती त्याच्या खाली गेला होता.
अशा गमतीदार गोष्टी आपल्या अनुभवात भर घालतात. त्याचा पुढील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपयोग होतो. कार्यक्रमाचे नियोजन करताना कल्पना येणे सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत म्हणजे तपशीलवार नियोजन करणे शक्य होते. यातून काही घडले तर अनुभवात ती भर!
बारामतीच्या या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे. सदरहू कार्यक्रमाला मी उपस्थित होतो परंतु प्रचंड गर्दी असल्यामुळे आमच्या हे लक्षात आलेच नाही.
ReplyDeleteमलाही हे नंतर समजले.
Delete