समर्थ भारतासाठी युवाशक्ती
"आपली प्रिय भारत माता पुनश्च एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान होईल आणि जगतास अभय प्रदान करील" स्वामी विवेकानंद यांचे वचन आहे. हे वचन साकार करण्यासाठी युवाशक्ती महत्त्वाची आहे. भारताचे हे ध्येय साकार करण्यासाठी या युवापिढी मध्ये कोणकोणते गुण असावेत याचा आपण विचार करूया.
सर्वात प्रथम राष्ट्र जे घडवू शकतात असे युवक आपापल्या क्षेत्रांमध्ये निष्णात असण्याची आवश्यकता आहे. यासाठी सातत्यपूर्ण कठोर असे परिश्रम करून युवकांनी ही निपुणता मिळवावयास हवी. ही निपुणता मिळवता आला कोणत्याही लघु मार्गाचा (शॉर्टकटचा) अवलंब करून चालणार नाही त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.
ज्या वेळेला समाजाचे व राष्ट्राचे काम करावयाचे असते त्या वेळी कोणा एका व्यक्तिचे परिश्रम त्यासाठी पुरेसे पडत नाहीत. त्यामुळे अशा कर्तृत्ववान व उत्साही व्यक्तींनी एकत्र येऊन समाजाचे काम पुढे नेले पाहिजे. यासाठी या युवकांमध्ये संघभावना असण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. केवळ मीच पुढे होईन वा मीच एकटा सर्व करेन ही भावना सामाजिक कामामध्ये उपयोगाची नसते. त्यामुळे युवकांच्या मनामध्ये ही संघभावना खोलवर रुजण्यासाठी आपणा सर्वांना विचारपूर्वक विविध उपक्रम करावे लागतील.
वरील गुणांबरोबरच तरुणांच्या मनात श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व आपल्याला बिंबवावे लागेल. आज संपूर्ण अवतीभवती पाहतो तेव्हा असे लक्षात येते की शारीरिक श्रमांना गौण लेखले जाते. शारीरिक श्रम करणे म्हणजे आपल्या सामाजिक दर्जाला हानी पोचवणे आहे असा समज अनेकांच्या मनामध्ये असलेला आपल्याला दिसतो. राष्ट्रकार्यार्थ श्रमणारे युवक घडविण्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी दिलेला 'कर्म पूजा हीच ईश्वर पूजा' हा मंत्र आपणाला युवकांच्या मनामध्ये संक्रमित करावा लागेल.
वैयक्तिक निपुणता, संघभावना, श्रमप्रतिष्ठा या गुणांना जोड द्यावी लागेल ती मनोभूमिकेची. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'ही गुणसुमने मी मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे' हे वचन युवापिढीच्या मनावर ठसविले पाहिजे. केवळ व्यक्तिगत वा कौटुंबिक उत्कर्ष एवढे मर्यादित उद्दिष्ट न ठेवता समाजाचा, राष्ट्राचा उत्कर्ष असे भव्य उद्दिष्ट प्रत्येकाने आपल्या डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. अन्यथा समाजामध्ये व्यक्तिगत पातळीवर गुणवान व संपन्न माणसे निर्माण होतील पण राष्ट्राच्या अभ्युदयासाठी त्यांचा पुरेसा उपयोग होणार नाही. यासाठी आपण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांनी दिलेला राष्ट्रीय वृत्तीचा वारसा आपण जोपासला पाहिजे.
राष्ट्रीय वृत्तीचा आणखी एक पैलू म्हणजे राष्ट्रासमोर असणाऱ्या सर्व समस्या, आव्हाने यांच्याबद्दल युवकवर्ग संवेदनशील असला पाहिजे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेली भारतभूमी माझी माता आहे आणि तिच्यावर वास करणारा सर्व समाज हा माझा आहे ही भावना सतत जागी ठेवून देशाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या सर्व घटनांविषयी संवेदनशील असणारे मन घडवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी जाती , भाषा , प्रांत इत्यादी सर्व विसरून भारतमातेचा पुत्ररूप समाज हा माझा बंधू आहे ही भावना जोपासण्याची आवश्यकता आहे. माणसाच्या मनाला वळण लावणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. परंतु ती प्रयत्नपूर्वक साध्य केली पाहिजे. नाहीतर व्यक्तिगत गुणसंपदा, संघभावना यांचा उपयोग फक्त आपल्या जातीचा, भाषेचा, पंथाचा अथवा प्रांताचा उत्कर्ष करण्यासाठी होईल आणि जर या उत्कर्षात अन्य जातीचा पंथाचा अथवा प्रांताचा अडथळा वाटत असेल तर त्यामधून संघर्षाची स्थिती उत्पन्न होईल. त्यामुळे सामाजिक बंधुभाव म्हणजेच समरसता हे सर्वात मोठे मूल्य आपणाला युवा मनावर बिंबवावे लागेल. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील 'स्वातंत्र्य समता व बंधुता' या आपल्या तत्वत्रयीमध्ये बंधुतेला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यांची द्रष्टेपणाची भूमिका हीच आपल्या युवकांची जीवननिष्ठा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
भारताच्या युवा पिढीमध्ये हे सर्व गुण कोण उत्पन्न करणार या प्रश्नाचे उत्तर आपण पालक किंवा शिक्षक किंवा समाज असे कधी कधी देत असतो. परंतु हे केवळ पालक किंवा शिक्षक किंवा समाज यांचे काम नसून सर्वांचे एकत्रित प्रयत्न यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. ही बाब ध्यानात घेऊन आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमध्ये आपण समन्वय ठेवूया आणि स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यासारख्या अनेक द्रष्ट्या व्यक्तिंनी पाहिलेले समर्थ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध होऊया.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment