कट्यार काळजात ठसली

  "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट काही वर्षांपूर्वी बघितला. कथा , संगीत, अभिनय, नेपथ्य अशा सर्वच बाबतीत चित्रपट फारच सुंदर व देखणा झाला आहे.

चित्रपटाची पटकथा चांगली बांधली आहे. कथेला कलाटणी देणारे एकाहून एक सरस प्रसंग चित्रपटात आहेत. असा प्रत्येक प्रसंग आधीच्या प्रसंगाच्या तुलनेत कथेला वेगळेच परिमाण देऊन जातो.
संगीताच्या बाबतीत मूळ नाटकाला दिलेले कै.पं.जितेंद्र अभिषेकी यांचे श्रवणीय संगीत आणि शंकर महादेवन यांची त्याच्या तोडीस तोड कामगिरी. यामुळे कान अगदी तृप्त होऊन जातात.
अभिनयाच्या बाबतीत सचिन पिळगावकर यांची अजोड भूमिका. माझ्या मते त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रथमच नकारात्मक छटा असलेली भूमिका केली आहे. त्यांची उर्दूतील संवादफेक लक्षणीय आहे. शंकर महादेवन यांनी पंडितजींची भूमिका ठीकठाक केली आहे. सुबोध भावे यांची भूमिका चांगली वठली आहे. अन्य कलाकारांची कामेही छान झाली आहेत.
ऐतिहासिक काळात घडणाऱ्या या कथेला साजेसे देखणे नेपथ्य साकारले आहे. त्यातून तो काळ हुबेहूब उभा केला आहे. यासाठी विशेष अभ्यास केला आहे असे जाणवते. आणि कुठेही पैशासाठी काटकसर केलेली नाही.
दिग्दर्शनाच्या क्षेत्रात सुबोध भावेंनी टाकलेले पहिलेच पाऊल दमदार आहे. इंग्रजांच्या कूटनीतीचे दर्शन, प्रसंगाच्या चित्रीकरणातून होणारे संकेत हे त्यांच्या शैलीची जाणीव करून देतात.
नाही म्हणायला या देखण्या चित्रपटाला दृष्ट लागू म्हणबन काही खटकणाऱ्या बाबीही आहेत. उदा. सदाशिव १४ वर्षे काय करत होता. काळाबरोबर सर्वांची वये वाढतात पण महाराज, महाराणी कविराज हे मात्र त्याच वयाचे दिसतात.असो.
एकूण काय तर प्रत्येक चित्रपटरसिकाने बघयलाच हवा असा सर्वांगसुंदर चित्रपट. ही कट्यार माझ्या काळजात ठसली. आपणही अवश्य बघा.
सुधीर गाडे, पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख