धुळे : काही प्रसंग, काही व्यक्ती
धुळे जिल्ह्यात आणखीनही काही प्रसंग, व्यक्ती मनात घर करून राहिलेल्या आहेत. त्यापैकी हे काही प्रसंग.
२००१ मध्ये महाराष्ट्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी समाजाला मदत करण्याच्या हेतूने धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून जनावरांसाठी चारा छावणी उभे करण्याचे ठरले. योग्य जागेची पाहणी करत असता दोंडाईचा या गावाजवळील मालपूर याठिकाणी पुरेसे पाणी आहे; तेथे ही छावणी उभी करता येईल असे ठरले. त्याची तयारी सुरू झाली आणि काही दिवसात सुमारे ५० जनावरांसाठी पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था असणारी छावणी सुरू झाली. याकामी मालपूर गावामधील स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन ही सगळी व्यवस्था केली. काही महिने ही छावणी चांगल्या प्रकारे कार्यरत होती. या काळात तिथे अनेक वेळा जाणे झाले. त्यावेळी एके दिवशी घोंगडीच्या गादीवर झोपण्याचा प्रसंग आला.
२००० मध्ये राष्ट्रजागरण अभियानाच्या दरम्यान त्यावेळचे मा. प्रांत संघचालक पद्मभूषण डॉ. अशोकराव उपाख्य काका कुकडे यांचा धुळे शहरात प्रवास झाला. त्यांच्या उपस्थितीत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका ठरवलेल्या होत्या. त्यापैकी एक बैठक धुळे औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी श्री. सुभाषभाई कांकरिया यांनी ठरवली होती. या बैठकीला जाण्यासाठी त्यावेळचे मा. तालुका संघचालक कै. अण्णासाहेब देशपांडे यांची चार चाकी गाडी ठरवली होती. आयत्यावेळी चालकाची काहीतरी गडबड झाली आणि पर्यायी व्यवस्था होत नव्हती. त्यावेळी काका यांनी स्वतः गाडी चालवली आणि गाडी चालवता येत नसल्याने मी त्यांच्या शेजारी बसून बैठकीला गेलो. स्वतःच्या पदाचा अभिनिवेश न बाळगता वेळ प्रसंगी पडेल ते काम केले पाहिजे हे मला शिकायला मिळाले.
प्रतिकूल परिस्थितीत काम कसे करावे याचे उदाहरणदेखील अनेक कार्यकर्त्यांकडे बघून लक्षात येत गेले. आधीच्या लेखात दोंडाईचा शहरामधील हिवाळी शिबिराचा उल्लेख केला आहे. ते शिबिर ज्या महाविद्यालयात होते त्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन त्या ठिकाणचे एक प्रसिद्ध राजकीय नेते करत होते. त्या महाविद्यालयात प्रा.मधुकर पांडे हे संघाचे स्वयंसेवक नोकरी करत असत. त्या महाविद्यालयात विविध कारणे काढून प्राध्यापकांकडून पैसे गोळा केले जात असत. शिबिर ठरवायचे झाल्यानंतर मी पांडे सरांना भेटलो. त्यावेळी ते म्हणाले की, "आता त्या नेत्यांचा वाढदिवस लवकरच आहे. त्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची सक्ती होत आहे. आजपर्यंत अशा कोणत्याही कारणासाठी मी पैसे दिले नाहीत पण शिबिरासाठी महाविद्यालय मिळावे म्हणून पैसे ते द्यावेत की काय अशा विचारात मी आहे." नंतर परवानगी मिळाली शिबिर झाले आणि पांडेसरांना मी विचारले, "सर तुम्ही यावेळी पैसे दिले का?" ते म्हणाले, " नाही, मी माझ्या आधीच्या मतावर ठाम राहिलो."
शिरपूर शहरात संघाचे काम अतिशय कमी झाले होते. तेथील स्थानिक प्रभावी नेत्याने संघ स्वयंसेवकांसमोर अनेक अडचणी उभ्या केल्या होत्या. त्यामुळे बरेचसे स्वयंसेवक कामातून दूर झाले होते. पण अप्पा धर्माधिकारी हे शिरपूरमधील ज्येष्ठ स्वयंसेवक बँकेमधून निवृत्त झाले होते आणि त्यानंतर ते याच नेत्याच्या पतपेढीत काम करू लागले होते. एकदा मी त्यांना विचारले," हे कसे काय?" अप्पा म्हणाले, " या पतपेढीत काम करण्यास संमती देण्यापूर्वी मी दोन अटी सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे मला माझ्या कामात पूर्ण स्वातंत्र्य मिळावे आणि दुसरी अट म्हणजे संघकामामध्ये मला कोणताही अडथळा नको. या दोन्ही अटी मान्य झाल्या म्हणूनच मी या ठिकाणी काम स्वीकारले आहे."
या दोन्हीही उदाहरणातून प्रतिकूलतेत काम कसे करावे याचा वस्तुपाठच मला मिळाला.
एक दुःखद प्रसंग देखील माझ्या कायम स्मरणात आहे. साक्री येथील महाविद्यालयात डॉ.विनोद जहागीरदार हे संघाचे स्वयंसेवक प्राध्यापक म्हणून काम करत होते. आपल्या विषयासोबतच त्यांचे होमिओपथीचे ज्ञान खूप होते. त्याचा उपयोग करून ते अनेकांना औषधे देत असत. कौटुंबिक परिस्थितीमुळे ते आणि त्यांची वृद्ध आई असे दोघेच त्यांच्या घरी राहत असत. त्यांना जलोदराचा विकार जडला होता. त्यामुळे त्यांचे पोट खूप मोठे झाले होते. दरवेळी प्रवासात गेलो की त्यांची भेट, प्रसंगी घरी मुक्काम, चौकशी होत असे. एके दिवशी मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळी त्यांची आई खूप आनंदात होती. त्यांनी सांगितले कालच त्यांची बेंबी फुटून जवळपास बादलीभर पाणी बाहेर पडले. आता पोट एकदम सपाट झाले आहे. त्यामुळे त्या आनंदात होत्या. पण नंतर मी गावातील दुसऱ्या एका प्रसिद्ध डॉक्टरांना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितले, ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले पाहिजे. ही गोष्ट विभाग प्रचारक रवीजी किरकोळे यांच्या कानावर घातली आणि त्यांच्या अनुमतीने डॉ. विनोद यांच्या भावाला बोलावून घेतले आणि दुसऱ्या दिवशी गाडी करून आम्ही त्यांना संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. साथ दिवसातच डॉ. विनोद यांचे निधन झाले.
धुळे जिल्ह्यात अनेक वेळा मी एसटीनेच प्रवास करत असे. या प्रवासात अनेक पुस्तके माझी वाचून झाली शेषराव मोरे यांचे मुस्लिम मनाचा शोध हे पुस्तक त्याच काळात मी वाचले. या विषयाचे आकलन होण्यास खूप मदत झाली. आपटे यांचे बौद्धपर्व , दिलीप कुलकर्णी यांचे निसर्गायण अशी अनेक पुस्तके देखील बहुधा मी एसटीच्या प्रवासातच वाचून पूर्ण केली.
धुळे जिल्हा प्रचारक म्हणून नियुक्ती झाली तेव्हा माझ्या पुष्कळ आधी ज्यांनी जुन्या धुळे जिल्ह्याचे ( आजचा धुळे आणि नंदुरबार जिल्हा) प्रचारक म्हणून काम केले ते ज्येष्ठ प्रचारक श्री विजयराव पुराणिक म्हणाले, "धुळे जिल्ह्यात ३६५ पैकी ३६६ दिवस तूरडाळ तांदळाची खिचडी खाण्याची तयारी ठेव." हे वाक्य धुळे जिल्ह्यात रोज रात्री आठवत असे कारण सर्वांच्याच घरी अशी खिचडी करत असत. काही कारणाने एखाद्या रात्री घरी आलेल्या पाहुण्यांना खिचडी खायला देऊ शकले नाही तर पाहुणचारात काही कमतरता राहिली असे गृहिणीला वाटत असे.
धुळे जिल्ह्यातील आठवणी मला दीर्घकाळ स्मरणात राहतील.
सुधीर गाडे, पुणे
Sir namaskar, Atishay chhan athavani. Ferguson college made service karanya adhi mi varsha bhar Shahada college yethe Jr. College made CHB mhanun nokari keli hoti. Tya mule mazya tethil athavani jagya zalya. Thithe khalleli khichadichi chav aajahi laksyat aahe. Karan tashi khichidichi chav part kadhicha chakhavayas milali nahi. Dhanyawad.
ReplyDeleteनमस्कार
Deleteसुधीरजी, सुंदर अनुभव आहेत, आमचे मूळ गाव पिळोदे ता.शिरपूर असल्याने खुप आपले पणा जाणवतो आहे....
ReplyDeleteनमस्कार
Delete