संभाजीनगर: काही आठवणी

      मराठवाड्यातील संभाजीनगर (प्रचलित नाव औरंगाबाद) इथे १९९७ ते १९९९ अशी दोन वर्षे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून काम केले. त्या कालावधीतील हे काही अनुभव.

        


   पुण्यातून दुपारी बाराच्या सुमाराला सुटणाऱ्या गाडीने निघून मी सायंकाळी सहाच्या सुमाराला संभाजीनगर येथे पोहोचलो. रस्ता विचारत त्यावेळी लोकसेवा मंडळ, खडकेश्वर येथे असणाऱ्या कार्यालयात पोचलो. हनुमान सायं शाखेत गेलो. नंतर रात्री त्यावेळचे प्रांत सहसेवाप्रमुख श्री.गिरीशराव कुबेर यांच्याबरोबर ज्येष्ठ स्वयंसेवक श्री.पी.एस. उर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांच्याकडे जेवायला गेलो. मराठवाडी पाहुणचाराचा अनुभव घेण्याचा तो माझा पहिला प्रसंग. हा अनुभव सातत्याने येत राहिला सातत्याने येत राहिला आणि याचा परिणाम चार-पाच महिन्यानंतर दिसला. माझ्या वजनात जवळपास १५ किलो वाढ झाली. त्यावेळी गमतीने एका बैठकीत त्यावेळचे प्रांत प्रचारक श्री.सुहासराव हिरेमठ म्हणाले, " हा सुधीरचा मोठा भाऊ नाही तर सुधीरच आहे!"

            संभाजीनगरमध्ये त्यावेळी माजी मा. प्रांत संघचालक प्रल्हादजी अभ्यंकर राहत असत. प्रल्हादजी वेळेचे अगदी पक्के होते. एके दिवशी ते दुसऱ्या दिवशी ज्यांच्याबरोबर जायचे होते त्या  स्वयंसेवकांना म्हणाले, " उद्या सकाळी बरोबर सात वाजता आम्ही गाडीतून तुमच्या घरी येऊ. तुम्ही दरवाजा उघडून गाडीत बसण्याच्या तयारीत राहा. प्रल्हादजी येतील. त्यांना चहा विचारू, पाच मिनिटे थांबू, असे मुळीच होणार नाही " आणि दुसऱ्या दिवशी तसेच झाले.  मराठवाडा मुक्ती संग्रामाचा सुवर्ण महोत्सव १९९८ मध्ये साजरा झाला. त्याचा एक कार्यक्रम हॉटेल वेदांतमध्ये होता. त्यावेळी सभेचे अध्यक्ष असलेले प्रल्हादजी टेबलवरील काचेच्या पेल्यांवर आवाज करून बोलणाऱ्या वक्त्यांना वेळ संपल्याची जाणीव करून देत होते. समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेण्यासाठी पत्र पाठवून त्यांचे कौतुक करणे, छोटेखानी समारंभात अशा व्यक्तिंचा सत्कार करणे अशा गोष्टी ते करत असत. अशा ५० व्या व्यक्तिच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहिल्याचे मला आठवते. अनेक घरात जादाच्या चपला बूट पडलेले असतात. ते गोळा करून गरजू माणसांना देण्याचा उपक्रम त्यांनी केला. श्रीराम सायं शाखेचा त्यावेळचा कार्यवाह असलेल्या ज्ञानेश देशपांडे याने जवळपास एक पोते भरून चपला बूट गोळा केल्याचे आठवते. 

        संभाजीनगरजवळ साधारण २५ किमी अंतरावर रत्नपूर ( प्रचलित नाव खुलताबाद) येथे झोपलेल्या अवस्थेतील मारूतीचे मंदीर "भद्रा मारूती" या नावाने आहे. चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीच्या आदल्या रात्री संभाजीनगर शहरातून चालत त्या मंदिरापर्यंत हजारो लोक जातात. १९९८ मध्ये काही तरूण स्वयंसेवकांच्या बरोबर मी देखील चालत मंदिरापर्यंत गेलो. दुरून कळसाचे दर्शन घेऊन बसने परत आलो.

     संघकार्यासाठी अधिकाधिक वेळ देण्याची प्रेरणा अनेक जणांच्या मनात रूजते. स्वतःचे घर सोडून काही काळ दुसरीकडे राहून संघकाम करणाऱ्याला विस्तारक म्हणतात. संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक श्री सुधीर उर्फ आबासाहेब देशपांडे यांचा छोटा मुलगा (मराठवाड्याच्या भाषेत लहाना मुलगा) चि.वेदांत सातवी आठवीत असतानाच आठवडाभर शहरातील कौस्तुभ जोशी यांच्या घरी राहून विस्तारक म्हणून काम करून आला. संघकार्यासाठी अधिकाधिक वेळ देण्याबरोबरच सातत्य हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यावळचे जिल्हा व्यवस्था प्रमुख श्री.सुधाकरराव नेवपूरकर हे बोलताना एकदा म्हणाले, " गेली सलग ५० वर्षे माझ्याकडे संघाची कोणती ना कोणती तरी जबाबदारी आहे. एकदाही यात खंड पडला नाही." अजून एक उदाहरण म्हणजे केशवराव डोंगरे हे ज्येष्ठ स्वयंसेवक. सरकारी खात्यातून निवृत्त झाल्यावर वय झाले म्हणून स्वस्थ न बसता केशवराव संघकामासाठी खूप खटपट करत. दिनदर्शिका छापून त्यामाध्यमातून निधीसंकलन करण्याचे काम ते करत असत.

    संभाजीनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे डॉ. हेडगेवार रुग्णालय हा एक विलक्षण प्रयोग गेली सुमारे चार दशके अविरत चालू आहे. समाजसेवेचे एक अनुपमेय उदाहरण या प्रयोगाने घालून दिले आहे. केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे तर वस्तीविकास, ग्रामविकास, शिक्षण अशा अनेक बाबींवर संघटितपणे काम चालू आहे. या रूग्णालयाशी संबंधित सर्वांशी परिचय झाला सर्वांचे प्रेरणादायक आयुष्य जवळून पाहता आले.

   १४ ऑगस्ट १९९७ च्या मध्यरात्री स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दुचाकी वाहन फेरी काढण्यात आली होती. त्यात अनेक तरूण स्वयंसेवक सहभागी झाले होते.

   त्यावेळी नुकतेच ईशान्य भारतातील मेघालय राज्यातील शाळकरी वयातील मुलांना पालकांच्या अनुमतीने शिक्षणासाठी संभाजीनगर शहरात आणून त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू केले होते. शहरातील स्वयंसेवक आणि त्यांचे कुटुंबीय आपुलकीने या वसतिगृहातील मुलामुलींकडे लक्ष देत असत. हिंदी भाषेचा फारसा सराव नसलेली या वसतिगृहातील मुले जेव्हा "सच्चा वीर बना दे माॅं " हे गीत म्हणत त्यावेळी वेगळीच गोडी वाटत असे. मेघालयात प्रचारक असलेले श्री.सुनील देवधर यांचा विशेष प्रवास त्यावेळी महाराष्ट्रात चालू होता.

      एक वैयक्तिक नोंद म्हणजे मला या काळात मुतखड्याचा त्रास झाला. आयुर्वेदाचार्य डॉ.संतोष नेवपूरकर यांच्या उपचारांनी गुण आला. दुखणे बरे झाले. नंतर त्यांच्या सल्ल्यानुसार मी लंघन म्हणून सोमवारचा उपवास करणे सुरू केले. बरेच वर्षे मी हा उपवास करत असे. साधारण ६-७ वर्षांपूर्वी मी तो बंद केला.

       एके दिवशी मी शहरातील ज्येष्ठ स्वयंसेवक श्री.मामा शिवनगीकर यांच्या घरी गेलो होतो. बाहेरच्या खोलीत एकटाच बसलो होतो. त्यांच्या घरातील दांडगा कुत्रा अचानक माझ्या जवळ आला. तो मला हुंगून, चाटून पाहू लागला. अशा वेळी माणसाने स्वस्थ बसायचे असते असे मी आधी कुठेतरी वाचले होते. त्यामुळे मी शांत बसून राहिलो. जवळपास दोन मिनिटांनी कुणीतरी आलं आणि त्याला घेऊन गेलं. हा एक वेगळाच अनुभव होता.

      दुसऱ्या वर्षी मला संभाजीनगर शहरातील एक भाग आणि ग्रामीण तालुक्यातील एका भागाचे काम देण्यात आले. याकाळातील एक गंमतीदार अनुभव म्हणजे त्यावेळचे देवगिरी विभागाचे प्रचारक श्री.विजयराव पुराणिक यांचा एकदा तालुक्यात प्रवास होता. त्यावेळचे मा.तालुका संघचालक अण्णासाहेब पाटील दांडगे हे शेंद्र्याजवळ वरूड या गावी राहत होते. दुपारी जेवायला येणार असा निरोप दिला होता. पण आम्ही पोचलो आणि आमच्या समोरच त्यांनी "आता स्वयंपाकाला लागा "असं घरच्या मंडळींना सांगितले. साधारण तासाभराने आम्ही जेवायला बसलो. नंतर लक्षात आलं की न सांगता थेट जेवणाच्या वेळी पोचलो असतो तर लवकर जेवायला मिळालं असतं. 

   संभाजीनगर शहरातील, तालुक्यातील स्वयंसेवक, त्यांचे कुटुंबीय यांनी जो स्नेह दिला त्याबद्दल मी सदैव सर्वांचा ऋणी राहीन.


सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख