ज्येष्ठ प्रचारकांचा सहवास

  " सहज बोलणे हाचि उपदेश" असं संतांबद्दल बोललं जातं. संघकार्यात ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारक यांच्या बोलण्याबरोबर वागण्यातूनही मार्गदर्शन होते. माझ्या प्रचारक काळातील अशाच काही आठवणी.


 संभाजीनगरला असताना त्यावेळचे प्रांतप्रचारक कै.मुकुंदराव पणशीकर एका बैठकीसाठी तिथे आले होते.  मोठ्या प्रतिमा उपलब्ध नसल्याने बैठकीच्या ठिकाणी छोट्या प्रतिमा ठेवल्या होत्या. बैठक संपल्यानंतर मुकुंदराव म्हणाले, " प्रतिमा फार आटोपशीर होत्या. " त्यांना मी अडचण सांगितली. नंतर लगेच नवीन प्रतिमा तयार करून घेतल्या.

    संभाजीनगरहून दोन ज्येष्ठ प्रचारकांना स्वतंत्र गाडीने पुण्यापर्यंत सोडण्यास येण्याचा अनुभवदेखील मिळाला. पहिल्यांदा कै.सुरेशराव केतकर यांच्याबरोबर पुण्याला आलो. त्यांचा स्वभाव थोडा गंभीर आणि अबोल होता. त्यामुळे प्रवासात विशेष काही बोलणे झाले नाही. नंतर काही दिवसांनी कै दामुअण्णा दाते यांच्याबरोबर पुण्याला येण्याचा योग आला. दामुअण्णा यांचा स्वभाव बोलका,  त्यामुळे प्रवासात विविध विषयांवर सहज गप्पा झाल्या. तसेच त्यांना संगीताची आवड असल्याने काही काळ गाणीदेखील ऐकली. अशा दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या ज्येष्ठ प्रचारकांसोबत प्रवास करण्याचा योग आला.

कै.प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या निधनानंतर त्यांच्या शोकसभेला त्यावेळचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख श्री.मधुभाई कुलकर्णी यांनी धुळ्याहून निघून संभाजीनगरला जायचे असे ठरले. स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्याचे प्रयत्न केले पण ती होऊ शकली नाही. मधुभाई सहजपणे म्हणाले , " आपण एसटीने जाऊया." कोणत्याही प्रकारचा बडेजाव न माजवता प्राप्त परिस्थितीत पुढे जाण्याचा हा जणू वस्तुपाठच होता. अर्थातच आम्ही एसटीने संभाजीनगरला गेलो आणि शोकसभेत सहभागी झालो. 

 प्रचारक म्हणून काम करणे थांबवल्यानंतर पुण्यात एका कार्यक्रमानंतर त्यावेळचे सरकार्यवाह आणि सध्याचे प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांना स्वतंत्र गाडीने मुंबईला सोडण्याचा योग आला. त्याही वेळी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. मुंबईला दादर येथील कार्यालयात पोचल्यावर मोहनरावांनी मला आणि गाडीच्या चालकाला आग्रहपूर्वक बरोबर बसवून जेवायला लावले आणि त्यानंतर आम्ही परत आलो. 

     हे प्रसंग मला कायमचे स्मरणात राहतील.


सुधीर गाडे,  पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख