एका अनुवादाचा प्रवास

    " गाडे सर, पान २५ वर पहा काय लिहिलंय ते." काश्यपदादा साळुंके मला म्हणाले आणि हा प्रवास सुरू झाला. हा प्रसंग १४ एप्रिल २०१८ चा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझे भोर, जिल्हा पुणे येथील राजा रघुनाथराव विद्यालयात भाषण होते. हे भाषण झाल्यानंतर श्री.काश्यपदादा साळुंके यांच्याबरोबर संवाद झाला.


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यांचा परिचय करून घेणे, त्यांना समजून घेणे हा एक पैलू आहे. यानुसार त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य देखील समजून घेतले होते असे निश्चितपणे म्हणता येईल. डॉ. आंबेडकर यांनी संघाच्या शाखेला दिलेल्या भेटी, संघाच्या उन्हाळी प्रशिक्षण वर्गाला दिलेली भेट, तेथे मांडलेले विचार, संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या वेळी झालेल्या भेटी याबद्दल संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी लिहून ठेवले आहे. प्रत्यक्ष भेटींमध्ये वारंवार सांगितलेदेखील आहे. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक आदरणीय कै. दत्तोपंत ठेंगडी, संगमनेरचे कै. अण्णा बागूल, पुण्यातील कै. भास्करराव गद्रे,‌ कै. वासुकाका खाडिलकर, पंढरपूरचे कै. डॉ. हरिभाऊ मोहोळकर, सांगलीचे कै. वसंतराव भिडे, भोरचे कै. नारायणराव मिलगीर, मुंबईचे कै. राजाभाऊ केणेकर, बाबासाहेबांनी सुरू केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ज्यांनी काम केले असे कै. प्रा. ठकार अशा अनेक कार्यकर्त्यांची नावे सांगता येतील. २०१६ मध्ये संघाच्या प्रशिक्षण वर्गात मी श्रद्धेय डॉ. बाबासाहेबांचे चरित्र स्वयंसेवकांच्या समोर मांडले, त्यात बाबासाहेबांच्या संघ शिक्षा वर्गाच्या भेटीचा उल्लेख केला. माझे बोलणे झाल्यानंतर काही स्वयंसेवकांनी प्रश्न विचारला की, "बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांपैकी कोणी याबाबत लिहून ठेवल्याचे आढळते का ?" त्यावेळी मला "नाही" असे उत्तर द्यावे लागले.


दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके हे विद्यार्थीदशेपासूनच बाबासाहेबांच्या कार्याशी जोडले गेले होते. पुण्यातील रात्र शाळा, असंघटित कामगारांची संघटना, पुणे नगरपालिकेतील कामगारांची संघटना, ज्या भोर संस्थानात त्यांचे जन्मगाव होते त्या भोर संस्थानातील राजकीय आणि सामाजिक कार्य यामध्ये बाळासाहेब आजीवन सक्रिय राहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात भोर संस्थानाच्या मंत्रिमंडळात आरोग्य, शिक्षण तसेच अन्य खात्यांचे मंत्री, १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्यावतीने निवडून आल्यानंतर १९६१पर्यंत (मृत्यू १०/०९/१९६१) खासदार म्हणून बाळासाहेबांनी काम केले. दिवंगत बाळासाहेब साळुंके यांचे चरित्र विलक्षण प्रेरणादायक आहे. एका आदर्श लोकप्रतिनिधीचे ते चरित्र आहे. दिवंगत बाळासाहेबांनी आपल्या हयातीत १९५९ मध्ये स्वतःचे संक्षिप्त चरित्र प्रसिद्ध केले. या चरित्रात बाळासाहेबांचे कुटुंबीय, कार्यकर्ते यांच्या लेखांची भर घालून २०१२ मध्ये 'दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके सामाजिक प्रतिष्ठान' यांच्या वतीने "आमचं सायेब" या नावाने विस्तृत चरित्र प्रकाशित करण्यात आले. १४ एप्रिल २०१८ ला ज्यावेळी मला काश्यपदादांनी (दिवंगत बाळासाहेब यांचे सुपुत्र) या पुस्तकातील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२ मे १९३९ या दिवशी पुण्यात झालेल्या भेटीचा आणि त्यानंतर बाबासाहेबांनी संघाच्या उन्हाळी शिबिराला भेट दिल्याचा उल्लेख दाखवला, त्यावेळी मला हा महत्त्वाचा दस्तऐवज मिळाला याचा खूप आनंद झाला.


ही माहिती संघाचे स्वयंसेवक, कार्यकर्ते यांना मी कळवली. काश्यपदादांनी "आमचं सायेब" या पुस्तकाची दिलेली प्रत संघाच्या अभिलेखागारात पाठवून दिली. संघाचे कार्यकर्ते मकरंद ढवळे यांच्याबरोबर काश्यपदादांच्या घरी पुन्हा भेटदेखील झाली. त्यानंतर संघाचे ज्येष्ठ प्रचारक मिलिंदराव ओक आणि रवीजी किरकोळे यांनी या पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद व्हावा अशी कल्पना मांडली. ही कल्पना त्यांनी राज्यसभेचे विद्यमान खासदार राकेशजी सिन्हा यांनादेखील सांगितली. २९ ऑगस्ट २०१९ या दिवशी राकेशजी पुण्यात आले. सायंकाळी काश्यपदादा साळुंके त्यांचे सहकारी श्री. विलास लोंढे, मिलिंदराव ओक, राकेशजी, मी असे सर्वजण मकरंद ढवळे यांच्या घरी भेटलो. या भेटीत इंग्रजी व हिंदी भाषेत अनुवाद करण्यास काश्यपदादांनी परवानगी दिली. या भेटीत ढवळे यांच्या घरी सहभोजन देखील झाले. 

         ‌‌ ( श्री.मकरंद ढवळे यांच्या घरी)

त्यानंतर या अनुवादासाठी आवश्यक असे संमतीपत्र 'दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके प्रतिष्ठान' यांच्याकडून मिळाले. काही कारणाने हे काम सुमारे वर्षभर लांबले. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये संघाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांची भेट झाली आणि पुन्हा या कामाला चालना मिळाली. दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांची जन्मशताब्दी २०१९-२० अशी होती, या काळात या पुस्तकाच्या अनुवादाचे प्रकाशन व्हावे अशी आम्हा सर्वांची इच्छा होती. पुण्यातील हिंदी व मराठी भाषा जाणणारे श्री. संजय रुईकर यांना हिंदी अनुवादाचे तर हिंदी व इंग्लिश भाषा जाणणारे श्री. सुनील दांडेकर यांना इंग्रजी अनुवादाचे काम देण्यात आले. साधारण डिसेंबर २०२० पर्यंत अनुवादाचे काम पूर्ण झाले. राकेश सिन्हा यांच्या मदतीने दिल्लीतील यश प्रकाशन यांनी पुस्तक छपाई आणि प्रकाशन करण्याचे मान्य केले. राकेशजी यांच्या मदतीने दिल्लीतील राष्ट्रीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद (ICSSR) यांच्या वतीने या अनुवादित पुस्तकांना अनुदानदेखील मिळाले. कोरोनाचा प्रसार भारतात वाढत गेल्याने काम अपेक्षेपेक्षा बरेच लांबत गेले. पण फेब्रुवारी २०२१ मध्ये काम पूर्णत्वास गेले. पुण्यातील भावे हायस्कूल येथे या दोन महापुरुषांची भेट झाली होती. त्याच ठिकाणी २५ मार्च २०२१ या दिवशी पुस्तकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ठरला. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.

 (पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात प्रास्ताविक करताना)

 हा योग ५ ऑगस्ट २०२१ या दिवशी जुळून आला. मुंबई येथील पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी जी, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष मा. विजयजी सांपला, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य मा. सुभाषजी पारधी, काश्यपदादा साळुंके, त्यांचे कुटुंबीय, पुणे आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बंधूभगिनी अशा निमंत्रितांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला आणि हा अनुवादाचा प्रवास पूर्ण झाला. प्रकाशन कार्यक्रमाचा हा दिवस माझ्यासाठी कायम संस्मरणीय राहील.

सुधीर गाडे,

 पुणे


५ ऑगस्ट २०२१ च्या कार्यक्रमाची लिंक


https://youtu.be/hlcD3TpV4DU

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख