पुस्तक परिचय : ग्रीकपुराण
ग्रीकपुराण
लेखिका सुप्रिया सहस्रबुद्धे
रोहन प्रकाशन पुणे
काही दिवसांपूर्वी हे पुस्तक वाचून पूर्ण केले. प्राचीन जगात ग्रीक संस्कृतीचा मोठा प्रभाव होता. त्यातील काही संदर्भ विशेष नामे अजून देखील वापरले जातात. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी पॅंडोरा पेपर्स, पेगासिस सॉफ्टवेअर यांची चर्चा झाली यातील पॅंडोरा, पेगासिस यांच्या कथा प्राचीन ग्रीक साहित्यात आढळतात.
असे अनेक संदर्भ आजदेखील वापरले जातात. अशा संदर्भांची माहिती होण्याच्या दृष्टीने हे पुस्तक चांगले आहे. ज्यामध्ये देवांचा राजा झ्यूस , त्याची भावंडे पॉसिडॉन, हेडीज यांच्या बरोबरच झ्यूसची बहीण आणि पत्नी हेरा , युद्धकौशल्य आणि शहाणपणाची देवताअथीना , प्रेमदेवता ॲफ्रोडिटी, कृषीदेवता डिमीटर, आनंदाचा देव डायोनिसिस उषा अनेक देवदेवतांच्या कथा तसेच वीर व्यक्तींच्या कथा दिलेल्या आहेत.
यातील काही विलक्षण कथा वीर हेरॅक्लीस, अकिलीस, स्वत:चा मुलगा पेलॉप्स याला मारून त्याचे मांस देवांना वाढल्याने झाडाखाली पाण्यात उभे राहून पाणी न पिऊ शकण्याची आणि फळ न खाऊ शकण्याची शिक्षा मिळालेला टॅन्टॅलस, आतिथ्यधर्माचा भंग केला म्हणून डोंगराच्या तळाहून मोठा पाषाण डोंगरमाथ्यावर न्यायचा तिथून लोटून द्यायचा परत वर न्यायचा असं सतत करत राहण्याची शिक्षा मिळालेला सिसिफस, पितृहत्या आणि मात्रागमनाचा शाप भाळी असलेला इडिपस, स्वतःच्याच प्रेमात आकंठ बुडालेला नार्सिसस, मृत पत्नी युरीडीसला अधोलोकातून स्वतःच्या संगीतकौशल्याचा वापर करून परत आणण्याचा प्रयत्न करणारा युरीडीस यांच्या गोष्टी लक्षवेधी आहेत. लेखिकेने अनेक ग्रीक कथांमध्ये आणि भारतीय पुराणकथांमध्ये असणारे साधर्म्य लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाच्या पुढच्या भागात ग्रीक कवी होमर याची महाकाव्ये इलियड आणि ओडिसी याचा परिचय करून दिला आहे. सौंदर्यवती हेलनचे अपहरण ट्रॉयचा राजपुत्र पॅरिस याने केले. तिचा पती मेनेलॉस याने शूर योद्धा अकिलीस याच्या मदतीने आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी मोठा प्रयत्न केला. युद्ध केले, पत्नीला परत मिळवले याचे वर्णन इलियडमध्ये आहे. या युद्धामध्ये भाग घेणारा वीर ओडिसिअस याला विजय मिळाल्यानंतर आपल्या इथाका या राज्यात परतत असताना अनेक हाल अपेष्टा, संकटे यांना तोंड द्यावे लागले त्याचे वर्णन ओडिसीमध्ये आहे. या दोन्हीही महाकाव्यांची गोष्ट सांगताना त्यांची रामायण महाभारत यांच्याशी तुलना करून काही मुद्दे लेखिकेने मांडले आहेत.
टायरेसिअस हा झ्यूस देवाचा पुजारी स्त्री आणि पुरुष या दोन्ही पद्धतीने आयुष्य जगला. झ्यूसपत्नी हेराने त्याचे उत्तर न पटल्याने त्याला अंध केले मग झ्यूसने त्याला भविष्य कथनाची देणगी दिली. याच कथेशी साम्य असणारी भंगाश्वन याची कथा पुराणात आहे. त्याला इंद्राच्या शापामुळे स्त्रीत्व प्राप्त झाले. नंतर साधूशी लग्न केले. स्त्रीरूपात असताना जन्म दिलेल्या पुत्रांना बरोबर घेऊन मूळच्या राज्यात परत गेला. तिथे इंद्राच्या करणीने त्याच्या पुत्रांमध्ये युद्ध होऊन सर्वजण मरण पावले. इंद्राची क्षमा मागून त्यांनी स्त्रीरूपात असताना जन्माला घातलेल्या पुत्रांना जिवंत करण्याचा वर मागून घेतला. या गोष्टीतील साम्य लक्षात येते.
पुस्तकाच्या पुढच्या भागात प्राचीन ग्रीक नाटककार युरिपिडिस , सॉफोक्लीस, एस्किलस यांचा जीवनपट आणि त्यांच्या नाटकांची माहिती दिली आहे.
लेखिकेने ठीकठिकाणी ग्रीक कथा आणि भारतीय कथा यांच्यावर तुलनात्मक टिप्पणी केली आहे. परंतु प्राचीन ग्रीक संस्कृतीचा वारसा सांगणारे सध्या कुणीही नाहीत तर प्राचीन भारतीय परंपरेचा अभिमान असलेला समाज आजदेखील भारतात राहत आहे. हे लक्षात घेता सारे जहाँ से अच्छा गीत लिहिणारे आणि नंतर पाकिस्तानात गेलेले कवी इक्बाल यांच्या ओळी आठवतात.
" युनान(प्राचीन ग्रीक) मिस्र( प्राचीन इजिप्त) रोमां (प्राचीन रोम) सब मिट गए जहाँ से कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी"
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment