जनजागृतीची आवश्यकता
पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागात प्राध्यापक असलेला माझा मित्र डॉ.संजयकुमार तांबे साधारण ६ वर्षांपूर्वी माझ्याकडे आला. त्याच्या अनुभवावर आधारित त्याला एक पुस्तक लिहायचे होते. त्याचे शब्दांकन मी करावे असे तो म्हणाला. त्याप्रमाणे त्याच्याशी बोलून मी शब्दांकन केले. पुस्तक प्रसिद्ध करताना मात्र काही कारणांमुळे शब्दांकन म्हणून माझे नाव प्रसिद्ध झाले नाही. त्या ' कुमारी माता : वैद्यकीय व कायदेशीर तरतुदी' या पुस्तकात मी लिहिलेला लेख. आज अल्पवयीन कुमारी मातांचा प्रश्न समाजासमोर आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न अधिकच गंभीर होत जाईल असे दिसत आहे; परंतु या प्रश्नाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे असे लक्षात येते. या आधीच्या प्रकरणांमध्ये आपण यासंदर्भातील वैद्यकीय कायदेशीर सामाजिक इत्यादी बाबींची माहिती घेतली; परंतु ह्या गोष्टी ज्यांच्यावर हा प्रसंग येतो त्यांनाच माहिती होतात. इतरांना याबाबत काहीच माहिती नाही असे लक्षात येते. साधारणपणे बाराव्या-तेराव्या वर्षी मुलगी वयात येते (म्हणजे तिची मासिक पाळी सुरू होते.) तर मुलगा...