स.प. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील आठवणी

 

१९८८-९० या वर्षांमध्ये ११वी१२वीला शिकत असताना पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या वसतिगृहात रहात होतो.१ल्या वर्षी डॉ.वीरेंद्र घोगरे हा माझा रूमपार्टनर होता.(दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी वीरेंद्रचं हृदयविकाराच्या झटक्यांनं निधन झाले.) २ऱ्या वर्षी डॉ.विजय साठे हा माझा रूमपार्टनर होता. विजयची आणि बाकिच्यांची महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने १/०५/२०१६ ला भेट झाली.तेव्हा डॉ.वैभव मेहता याने आमचा हा फोटो काढला.

मनात विचार आला. शिकतानाचे दिवस म्हणजे स्टेडियममधल्या गोल ट्रॅकवर पळण्यासारखं आहे तर नंतरचं आयुष्य विस्तीर्ण जंगलात आपापल्या वाटा धुंडाळण्यासारखं आहे. स्टेडियममधले ट्रॅक वेगवेगळे असले तरी आपण एकमेकाला दिसतो.भेटीगाठीदेखील सहज होतात.पण आयुष्याच्या वाटा वेगवेगळया झाल्या की आपण एकमेकांना सहज दिसतही नाही आणि भेटही होत नाही. ठरवल्याशिवाय भेटी अवघडच.महाकवी ग.दि.माडगूळकरांच्या शब्दात थोडा बदल करून म्हणावसं वाटतं
सागरात होते दोन ओंडक्यांची भेट
एक लाट तोडी दोघा "आता ठरवून भेट"

या वसतिगृहातील अनेक आठवणी माझ्या मनात कोरल्या गेल्या आहेत. प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात घरची आठवण सारखी यायची. रोज सहा वाजता स्वारगेट येथून सुटणाऱ्या गाडीने घरी जावे असे वाटायचे. पण निग्रहाने मी मी दोन-तीन महिने घरी गेलो नाही. त्यानंतर मात्र वसतिगृहाची सवय झाली. त्यानंतर मित्रांच्या ओळखी वाढत गेल्यानंतर गप्पाटप्पा वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद, संध्याकाळी जाऊन अमृततुल्यमध्ये चहा पिणे, कधीमधी बादशाहीत जेवायला जाणे, सकाळी अंघोळीला तर जेवणाच्या वेळी भोजनालयात चाव्या ठेवून ठेवून क्रमांक लावणे, वसतिगृहाच्या आवारात रिंग खेळणे, वसतिगृहाच्या स्नेहसंमेलनाच्या झालेले कार्यक्रम, स्पर्धा, बालगंधर्व रंगमंदिरात बघितलेला 'घाशीराम कोतवाल' नाटकाचा प्रयोग, त्यावेळी तिथे आलेल्या एका परदेशी पर्यटकाशी केलेला संवाद या आणि इतर अनेक गोष्टी सदैव स्मरणात राहतील.
सुधीर गाडे पुणे





Comments

  1. मी सुद्धा १९६८ ते १९७० यादरम्यान एम ई एस कॉलेजच्या वसतिगृहात रहात होतो. त्यावेळचे आमचे रेक्टर श्री एस. बी.गोगटे सर यांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यावेळेस मला सीनियर असलेले परंतु सर्वांशी उत्तम संबंध ठेवणारे मनमिळाऊ सहकारी श्री सुभाष तांबे हे सुद्धा दोन महिन्यापूर्वी आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यानंतर काही कारणामुळे वसतिगृहातील त्यावेळच्या अनेक जणांची ५० वर्षांनी संपर्क झाला. चंदु देसाई, गावंड, रवींद्र इंगोले हे सीनियर व सुषमा कुंटे, रोहिणी भिडे, उदय सोहोनी हे सहाध्यायी यांच्याशी फोनवरून संपर्क झाला. करोनाच्या भीतीमुळे प्रत्यक्ष भेट घेता आली नाही. बाकी त्यावेळच्या अनेक जणांशी अजूनही संपर्कात आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. वसतिगृहातील आठवणी कायम स्मरणात राहतात.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख