जनजागृतीची आवश्यकता

 पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागात प्राध्यापक असलेला माझा मित्र डॉ.संजयकुमार तांबे साधारण ६ वर्षांपूर्वी माझ्याकडे आला. त्याच्या अनुभवावर आधारित त्याला एक पुस्तक लिहायचे होते. त्याचे शब्दांकन मी करावे असे तो म्हणाला. त्याप्रमाणे त्याच्याशी बोलून मी शब्दांकन केले. पुस्तक प्रसिद्ध करताना मात्र काही कारणांमुळे शब्दांकन म्हणून माझे नाव प्रसिद्ध झाले नाही. त्या  ' कुमारी माता : वैद्यकीय व कायदेशीर तरतुदी' या पुस्तकात मी लिहिलेला लेख.

  


आज अल्पवयीन कुमारी मातांचा प्रश्‍न समाजासमोर आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न अधिकच गंभीर होत जाईल असे दिसत आहे; परंतु या प्रश्नाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे असे लक्षात येते. या आधीच्या प्रकरणांमध्ये आपण यासंदर्भातील वैद्यकीय कायदेशीर सामाजिक इत्यादी बाबींची माहिती घेतली; परंतु ह्या गोष्टी ज्यांच्यावर हा प्रसंग येतो त्यांनाच माहिती होतात. इतरांना याबाबत काहीच माहिती नाही असे लक्षात येते.

    साधारणपणे बाराव्या-तेराव्या वर्षी मुलगी वयात येते (म्हणजे तिची मासिक पाळी सुरू होते.) तर मुलगा साधारणपणे पंधराव्या सोळाव्या वर्षी वयात येतो. यानंतर दोघांचाही लैंगिक प्रेरणा जागृत होऊ लागतात. पौगंडावस्थेमध्ये याबाबत काय करावे काय करू नये याची योग्य शिक्षण देण्याची व्यवस्था क्लिनिक, शाळेतील शास्त्रीय व्याख्याने समुपदेशनार्माफत उपलब्ध झालेली आहे. असे शिक्षण न घेतल्यास मुले-मुली याबाबत चाचपडू लागतात. चोरटेपणाने ते काही माहिती मिळवतात; पण बऱ्याच वेळा ती चुकीची असते.

    आपल्या समाजामध्ये लैंगिक गरजा भागवण्याची समाजमान्य पद्धत म्हणजे लग्न; परंतु सध्या मुला मुलींचे वयात येणे व लग्न यामध्ये साधारणपणे सहा ते दहा वर्षांचा काळ जातो. याच काळात अल्पवयीन कुमारी मातांचा प्रश्‍न निर्माण होतो. पूर्वी आपल्याकडे बालविवाहाची पद्धत होती. बालविवाहामुळे पूर्वी वयात येणे व लग्न होणे यामध्ये फार थोडा काळ जात असे; परंतु बालविवाहाचे अन्य दुष्परिणाम अधिक गंभीर असल्याने कायदा जागृती शिक्षण याद्वारे शासनाने विवाहाचे वय मुलींसाठी कमीत कमी १८ वर्षे पूर्ण तर मुलांसाठी कमीतकमी २१ वर्षे असे स्वीकारले.(लेख २०१६ चा आहे.)

      सांस्कृतिक बदलामुळे आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये मुला मुलीच्या आपापसातील संबंधांमध्ये बऱ्याच प्रमाणावर मोकळेपणा आला आणि तो अधिकाधिक वाढतो आहे असे लक्षात येते. याबाबत टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडिया यादी माध्यमांचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. मुला-मुलींच्या विवाहपूर्व लैंगिक संबंधांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे; परंतु पाश्चात्य समाजाने जेवढ्या खुलेपणाने विवाहपूर्व लैंगिक संबंधांना मान्यता दिली आहे तेवढा खुलेपणा आपल्या समाजामध्ये दिसत नाही. विवाहपूर्व लैंगिक संबंध नाकारणे अथवा अशा संबंधांकडे दुर्लक्ष करणे किंवा अशा संबंधांना मधून मुलगी गरोदर राहिली तर तिने आपली प्रतिष्ठा धुळीला मिळवली असे समजून मुलीच्या जीवाचे बरेवईट करणे किंवा बेकायदेशीरपणे गर्भपाताचा प्रयत्न करणे यासारख्या प्रतिक्रिया दिसून येतात. 

     या सगळ्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन कुमारी मातांच्या प्रश्नाबद्दल कोणती भूमिका घ्यायची याबाबत समाजामध्ये खुलेपणाने चर्चा होणे आवश्यक आहे असे वाटते. या प्रश्नाबाबत क्वचित प्रसंगी काही मंडळी बालविवाहाची पूर्वीची पद्धत बरोबर आहे अशी टोकाची व योग्य भूमिका मांडताना दिसतात. तर काहीजण पाश्चात्त्यांचे अनुकरण योग्य आहे असे मानताना दिसतात. या दोन्ही भूमिकांचा टोकांमध्ये ज्या मुलींवर अल्पवयीन मातृत्वाचा प्रसंग येतो त्या लोंबकळत राहतात. अल्पवयीन मुलगी ज्याच्यामुळे कुमारी माता झाली तो मुलगा ही जर अल्पवयीन असेल तर तोही वेगळ्या मानसिक वादळामध्ये सापडतो. या सगळ्यांमधून काहीजण अगदी भरडून निघतात.

      त्यामुळे या प्रश्नाबाबत समाजामध्ये अधिक जागृती होणे गरजेचे आहे. समाजामधील विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन चर्चा घडविली पाहिजे मार्गदर्शन केले पाहिजे व प्रसंगी आपल्या कृतीमधून समाजाला दिशा दाखवून दिली पाहिजे. यातूनच या प्रश्नावर समाजमान्य तोडगा निघू शकेल असे वाटते.

     या प्रश्नाबाबत एक गोष्ट आपण लगेच करू शकतो असे वाटते ते म्हणजे वयात येणार्‍या मुला-मुलींना योग्य पद्धतीने लैंगिक शिक्षण मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणे. यासाठी आईवडिलांनी आपल्या मुला-मुलींशी अधिक मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. मुलामुलींना याबाबतची शास्त्रीय माहिती मिळेल अशी पुस्तके त्यांना स्वतःहून उपलब्ध करून दिली पाहिजेत. शाळांमधून मुला-मुलींना योग्य मार्गदर्शन मिळेल अशी व्याख्याने आयोजित करणे आवश्यक आहे. त्यांच्या आधारावर मुला-मुलींचे गैरसमज दूर करून त्यांना योग्य पद्धतीने वागायला शिकवता येईल.

सुधीर गाडे पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख