चीनचे आव्हान आणि राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान

 २०१७ मध्ये देशभर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान झाले. त्यावेळी भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील माझा लेख.



  ज्या देशाला स्वाभिमानाने आपले अस्तित्व टिकवून प्रगती करायची आहे त्याला आपल्या इतिहासाबरोबरच भूगोलाचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसात डोकलाम (डोंगलांग) येथील चीनच्या हालचाली, भारतीय सैन्याने त्याला केलेला विरोध, चीनने मानससरोवर यात्रेवर घातलेली बंदी या घडामोडींमुळे चीनचे विस्तारवादी धोरण जगासमोर पुन्हा एकदा उघडे पडले आहे. या पार्श्वभूमीवर आपण याबाबतीतला इतिहास आणि भूगोल समजून घेऊया.

      १९४९ मध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली. या क्रांतीनंतर जसजशी साम्यवादी राजवट स्थिरावू लागली तसतसा चीनचा विस्तारवाद सुरू झाला. १९५१ - १९५९ या वर्षांमध्ये चीनने तिबेट हा स्वतंत्र देश बळकावून आपल्या भूप्रदेशास जोडला. यामुळे भारताची सीमा थेट चीनच्या सीमेला भिडली. दुर्दैवाने तत्कालीन भारतीय नेतृत्वाला याचे गांभीर्य लक्षात आले नाही.चीनने तिबेट बळकावल्यानंतर भारताच्या आश्रयाला आलेले दलाई लामा हे तिबेटचे धर्मगुरू आणि राष्ट्रप्रमुख आहेत.परंपरेने त्यांचे हिवाळ्यातील वास्तव्याचे ठिकाण अरूणाचल प्रदेशातील तवांग हे आहे.त्यामुळे तिबेटनंतर चीनने भारताच्या अरूणाचल प्रदेशावरही आपला हक्क सांगायला सुरूवात केली. याचदरम्यान पाकने १९४७ साली काश्मीरवर आक्रमण केले आणि काश्मीरचा १/३ भाग बळकावला. त्यापैकी काही भाग १९६२ नंतर पाकिस्तानने परस्पर चीनला देऊन टाकला. सियाचीनजवळील हा भूभाग अक्साई चीन असून तो आमचा आहे असे चीनने जगासमोर मांडण्यास सुरुवात केली. आजही जवळपास ५५०० चौ.कि.मी. चा भारतीय भूभाग चीनच्या ताब्यात आहे.
       साम्यवादी बनलेल्या चीनच्या महत्वाकांक्षेचा अंदाज त्यावेळच्या भारतीय नेतृत्वाला मुळीच आला नाही.चीनच्या भूलथापांना बळी पडून तेव्हा " हिंदी चिनी भाई भाई" अशा घोषणा उत्साहाने दिल्या जात होत्या.या घोषणा जुन्या व्हायच्या आतच विस्तारवादी चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले. या युद्धात अपुऱ्या तयारीमुळे भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या युद्धात भारताच्या ३०८० सैनिकांचे बलिदान झाले.तसेच भारताचा ४२,७०० चौ.कि.मी. चा भूभाग चीनच्या ताब्यात गेला. यानंतर मुजोरपणे चीनने अरूणाचल प्रदेशाच्या ९०००० चौ.कि.मी. भागावर आपला हक्क सांगितला. आपल्या या दाव्याला बळकटी देण्यासाठी अरूणाचल प्रदेशातील लोकांना भारतीय नागरिक मानण्यास नकार देऊन चीनमध्ये जाण्यासाठी त्यांना चीनकडून स्टेपल्ड व्हिसा देत असतो.
भारताचा सतत द्वेष करणे आणि भारतविरोधी कारवाया करत राहणे हेच पाकिस्तानचे काम आहे. यामुळेच पाकिस्तान गेली अनेक वर्षे भारतात दहशतवादी कारवाया करत आहे.२०१६ मध्ये झालेल्या पठाणकोट आणि उडी येथील हल्ल्यांनी हीच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली. पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र संघात वारंवार मागणी केली आहे. परंतु प्रत्येकवेळी तिथे चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करून भारताची मागणी फेटाळून लावली आहे. पाकिस्तानला दहशतवादाच्या वाढीसाठी प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर चीन मदत करत आहे. असा हा चीन दहशतवादाचा साथीदार आहे. २०१६च्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराची समीक्षा केली तर चीनने जकोबा नदीचे पाणी भारताला देणे बंद केले.यामुळे ईशान्य भारताची जीवनवाहिनी असणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीच्या प्रवाहावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. 
भारत अणुऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी व्हावा या हेतूने भारताने १९७४ मध्ये पहिल्यांदा अनुचाचण्या केल्या. भारताची या क्षेत्रात प्रगती होऊ नये म्हणून त्यावेळच्या अणुऊर्जा तंत्रज्ञान असणाऱ्या देशांनी अण्विक पुरवठादार गटाची स्थापना केली. सध्या या गटाचे ४८ देश सदस्य आहेत. या अण्विक पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) सदस्यत्व मिळू नये यासाठी चीन सतत प्रयत्न करत आहे.भारताला विकसित देश व्हायचे असेल तर आपल्याला ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करावी लागेल.यासाठी अणुऊर्जा हा एक पर्याय आहे.त्यासाठी अणुभट्ट्या चालवण्यासाठी युरेनियमची आवश्यकता आहे.हे युरेनियम भारतात आढळत नाही.त्यामुळे ते अन्य देशांकडून घ्यावे लागते.परंतु भारत आण्विक पुरवठादार गटाचा सदस्य नसल्याने यात खूप अडचणी येतात.अशा रितीने चीन हा भारताच्या विकासामध्ये अडथळे आणतो आहे.
चीनला भारतविरोधी हालचालींसाठी पाकिस्तानची मदत आहे. चीन पाकिस्तान आर्थिक महामार्ग (China Pakistan Economic Corridor) तयार करण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानात आर्थिक गुंतवणूक केली आहे.या योजनेनुसार चीनमधील झिंझांग प्रांतापासून पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत जाणारा १० पदरी महामार्ग चीन बांधत आहे.या महामार्गाच्या आजूबाजूला अनेक गोष्टी निर्माण केल्या जात आहेत. हा महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. या ग्वादर बंदरात चीनचा लष्करी तळ आहे. भारतविरोधी कारवाया करण्यात चीन आणि पाकिस्तान हे एकमेकांचे भागीदार आहेत.
आपल्या विस्तारवादाला भारत पायबंद घालू शकतो हे चीन चांगलेच ओळखून आहे. यासाठी भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचे चीनचे डावपेच आहेत. याच डावपेचांनुसार चीनने भारताच्या सर्व बाजूला आपले लष्करी तळ उभारण्यास सुरूवात केली आहे. असे तळ इतर देशात उभे करता यावेत यासाठी चीनने त्या त्या देशांत खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. श्रीलंकेतील हम्मनटोटा, बांगलादेशातील चितगाव,म्यानमारमधील कोको आयलंड या बंदरांमध्ये तसेच मालदीवच्या बेटांवर चीनने आपले लष्करी तळ उभे केले आहेत. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे तळ अतिशय धोकादायक आहेत.या सर्व तळांच्यामुळे भारताभोवती एक लष्करी साखळीच निर्माण झाली आहे.याला चीनने मोत्यांची माळ(string of pearls) असे गोंडस नाव दिले आहे.मात्र भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा भारताभोवती टाकलेला फासच आहे.यामुळे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याचबरोबर आपण भारताच्या उत्तरेला बघितलं तर लक्षात येईल की चीनने थेट नेपाळपर्यंत रस्त्यांचे बांधकाम केलं आहे.तसेच भारताला विरोध करता यावा म्हणून चीनच्या नेपाळमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाया चालू असतात.गेल्या काही महिन्यांमध्ये भारत, भूतान आणि चीन यांच्या सीमावर्ती प्रदेशातील डोकलाम ( डोंगलांग) या प्रदेशात चीनने मुजोरपणे रस्त्यांचे बांधकाम सूरू केले आहे.याला विरोध करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या अंगाला चिनी सैनिक भिडले.यामुळे या ठिकाणी निर्माण झालेला तणाव अजून निवळला नाही.यासारख्या घटनांमुळे भारताच्या उत्तर सीमेच्या संरक्षणाचा प्रश्न चीनमुळे कसा उग्र बनला आहे हे आपल्या लक्षात येते.
डोकलाम प्रदेशातील हालचालींमुळे निर्माण झालेल्या आगीत तेल ओतावे म्हणून चीनने मानससरोवर यात्रेवर बंदी आणली.मानससरोवर हे कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान आहे.अशा मानससरोवराच्या यात्रेवर बंदी घालून चीनने या श्रद्धेवरच आघात केला आहे.
२१ व्या शतकामध्ये साम्राज्यवाद आर्थिक रूप घेऊन जगात वावरतो आहे. हे ओळखून चीनने गेली अनेक वर्षे पद्धतशीर पावले टाकली आहेत. साम्यवादी हुकूमशाहीच्या जोरावर कामगारांची पिळवणूक, मोठी सरकारी अनुदाने यांच्या जोरावर चीन प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिशय कमी किंमतीमध्ये वस्तू निर्माण करत असतो. मोठ्या प्रमाणात हा माल भारतीय बाजारपेठेत पाठवत असतो. याचा परिणाम भारतीय उद्योगांवर झाला आहे. अनेक माणसांचे रोजगार यामुळे बंद पडले आहेत आणि पडत आहेत.जगातील १९२  देशांशी  आपल्या देशाचे व्यापारी संबंध आहेत. चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार झाला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये संसदेत सादर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातून चीनला वर्षाला ९ अब्ज अमेरिकी डॉलरची तर चीनकडून भारताला ६१.८ अब्ज अमेरिकी डॉलरची निर्यात केली जाते. म्हणजे वर्षाला ५२.८ अब्ज अमेरिकी डॉलरचा तोटा होतो. याची किंमत ३५४२ अब्ज रुपये होते. देशाला होणाऱ्या एकूण विदेशी तोट्याच्या ४४ % तोटा चीनच्या व्यापारातून होतो. पेट्रोलचा व्यापार सोडला तर (जे चीनमधून येतच नाही) हा तोटा ६०% आहे.
सामान्य माणसाला नेहमी चीनमध्ये तयार झालेल्या स्वस्त वस्तूंची भुरळ पडते.चीनला असा माल स्वस्तात निर्माण करणं कसं शक्य होतं. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे चीन हा नावाला साम्यवादी देश आहे.प्रत्यक्षात तिथे हुकूमशाही आहे.या हुकूमशाहीचा वापर करून सर्व सरकारी निर्णय अगदी झपाट्याने अंमलात आणले जातात. सरकारच्याकडून शेतकरी, कामगार यांची पिळवणूक केली जाते.शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव तर कामगारांना किमान वेतनदेखील दिले जात नाही. सर्व उद्योगधंद्यांची मालकी सरकारकडे असल्याने त्यांना भरमसाठ अनुदान दिले जाते.मागणीचा विचार न करता लक्षावधीच्या संख्येने वस्तूंचे उत्पादन केले जाते.या सगळ्यांमुळे चिनी माल अतिशय स्वस्तात तयार होतो.हा स्वस्त माल लोंढ्यासारखा भारतीय बाजारपेठेत ओतला जातो. प्रचंड प्रमाणावर येणाऱ्या चिनी मालामुळे भारतीय उद्योग बंद पडत आहेत.त्यामुळे मोठया प्रमाणावर बेरोजगारी वाढत आहे.
   चिनी मालाची गुणवत्ता हादेखील एक विचार करण्याचा मुद्दा आहे. चिनी वस्तूंमध्ये निकृष्ट दर्जाचा कच्चा माल, घातक रसायने वापरलेली असतात.त्यामुळे अनेक वेळा आपण असं पाहतो, वाचतो की चिनी बनावटीच्या वस्तूचा स्फोट होऊन माणसांना दुखापत झाली. चिनी बनावटचा प्लास्टिक तांदूळ, कोबी यासारख्या गोष्टी स्वस्त मिळतात म्हणून सामान्य नागरिक तो विकत घेतात.पण प्लास्टिकपासून बनलेल्या असे पदार्थ पोटात गेल्याने आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. चिनी बनावटीची खेळणी लहान मुले खेळताखेळता तोंडात घेतात, तसेच त्यांच्या त्वचेचा त्यांच्याशी संपर्क येतो.यामुळे लहान मुले आजारी पडतात.ह्या सगळ्यानंतरऔषधोपचार करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो.
चीन जरी सध्या शक्तीवान देश असला तरी त्याच्या काही दुबळ्या बाजूदेखील आहेत.त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. चीनच्या साम्राज्यवादी, विस्तारवादी धोरणामुळे जगातील अनेक देशांचा चीनवर विश्वास नाही. चीनचा विकासदर गेली काही वर्षे खालावत चालला आहे. 'एक कुटुंब एक मूल' हे धोरण गेली अनेक वर्षे चीनमध्ये कठोरपणे राबवले गेले.त्याचा परिणाम म्हणून चीनचे सरासरी वय वाढत आहे आणि चीनला तरूण मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे.जगामध्ये चलनाचा दर ठरवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या न पाळता चीनने त्याच्या युआन या चलनाचे एकतर्फी अवमूल्यन केले आहे. देशांतर्गत असमान विकास आणि जनजातींवर केले जाणारे अत्याचार चिनी नागरिकांमध्ये मोठया प्रमाणावर असंतोष आहे. चीनचा विचार करताना आपण त्याच्या या कमतरताही लक्षात घेतल्या पाहिजे.
ह्या सगळ्या बाबी विचारात घेतल्या तर चीनचे किती मोठे आर्थिक आणि लष्करी आव्हान भारतापुढे आहे हे लक्षात येईल. हेही लक्षात येईल की ज्यावेळी आपण चिनी वस्तू विकत घेतो त्यावेळी आपण कळतनकळत आपल्याच सैनिकांचे आणि नागरिक बांधवांचे जीव घेणाऱ्या दहशतवादाला हातभार लावत असतो असे वाटते. त्यामुळे सर्वांना नम्र आवाहन की देवदेवतांच्या मूर्ती, तसबिरी,खेळणी, दिव्यांच्या माळा, पणत्या, आकाशकंदील, प्लास्टिक फुले,फोटो फ्रेम यासारख्या चिनी वस्तू विकत घेऊ नका.त्याला पर्यायी असणाऱ्या स्वदेशी वस्तू घ्या.यातून आपल्या भारतीय बांधवांना रोजगार मिळेल आणि भारताच्या प्रगतीला आपला जास्त हातभार लागेल. 
 ह्या गंभीर मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी देशभर स्वदेशी जागरण मंच आणि अन्य संघटनांच्या वतीने राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान चालू आहे.पत्रकवाटप, स्टिकर, फलक, निषेध फेरी, पथनाट्ये या माध्यमातून जनजागृतीचे काम चालू आहे.या अभियानाला सकारात्मक प्रतिसादही मिळतो आहे. कोल्हापूर येथील उद्योजकांनी, तसेच पुण्यातील नारळीकर इन्स्टिट्यूटने चिनी माळांना पर्यायी अशा माळा तयार केल्या आहेत.त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे. मुंबई येथील मुख्याध्यापक संघांनी शाळांच्या परिसरात चिनी वस्तूंच्या विक्रीवर बंदी घातली आहे.अशी अनेक उदाहरणे बघायला मिळत आहेत. आपणही वर्क जबाबदार देशभक्त नागरिक म्हणून या अभियानात सहभागी होऊ.आपल्या प्रिय भारतमातेला स्वावलंबी बनवू, समर्थ बनवू.

सुधीर गाडे, पुणे


Comments

  1. Replies
    1. Very true. If every single person think to stop purchase of Chinese products it can be very big movement

      Delete
  2. अतिशय छान आणि मुद्देसूद लिहिले आहेस सुधीर.
    तुझे कोल्हापूरचे मार्गदर्शन पेंडिंग आहे.. असो, वेळ मिळेल तेव्हा सांग

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख