मएसो भवन ते राष्ट्रपती भवन भाग १

 "Namaskaram Sir. Hon'ble Vice President of India can give time for the ceremony tomorrow or day after tomorrow. Please discuss with your office bearers and tell me immediately. " मा.उपराष्ट्रपती यांचे खाजगी सचिव श्री.चैतन्य यांचा रविवार ६ फेब्रुवारी २०२२ ला दुपारी ३:३० च्या सुमाराला मला फोन झाला आणि एकच धावपळ सुरू झाली. हा फोन झाला त्यावेळी मी संघाच्या एका बैठकीसाठी मएसो भवनात  गुरूवर्य प्र.ल. गावडे सभागृहात होतो.

        हा फोन झाल्यावर नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीवजी यांना फोन केला. ९ फेब्रुवारीपासून मा. उपराष्ट्रपती सुमारे महिनाभरासाठी दिल्लीबाहेर जाणार ही चैतन्य यांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊनकार्यक्रम ८ फेब्रुवारीलाच करूया असे त्यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाच्या तयारीसाठी सुमारे तासाभरात राजीवजी, विजयराव भालेराव, बाबासाहेब शिंदे, भरत व्हनकटे सर, संतोष देशपांडे सर, सचिन आंबर्डेकर, श्रीहर्ष थत्ते आणि मी असे संस्थेच्या कार्यालयात भेटलो. आधी केलेल्या नियोजनाला उजाळा दिला. आधी तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत आवश्यक ते बदल नक्की केले. पुण्यातील कार्यक्रमाचे नियोजनाची चर्चा करून त्याची जबाबदारी विजयराव, बाबासाहेब, देशपांडे सर, आंबर्डेकर यांच्यावर सोपवली.

    ( दिल्लीच्या विमानात, माझा पहिला अनुभव )

   तशी तर संस्थेच्या इतिहास ग्रंथाबाबतची तयारी गेल्या ३-४ वर्षांपासून सुरू होती. ऐतिहासिक परंपरा असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा २०२० मधील शतकोत्तर हीरकमहोत्सव ही एक संधी समजून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत कृतीला सुरूवात केली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीवजी सहस्रबुद्धे यांनी ही कल्पना सर्वांसमोर मांडली. संस्थेच्या नियामक मंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष मा.संजयजी इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली संपादक मंडळ तयार करण्यात आले. प्रत्यक्ष ग्रंथ लेखनाची जबाबदारी संस्थेच्या तत्कालीन आजीव सभासद आणि म.ए.सो.गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या उपप्राचार्या डॉ.केतकी मोडक यांना देण्यात आली. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे माजी सचिव प्रसिद्ध शिक्षणतज्ञ कै.डॉ.प्र.ल.गावडे प्रा.र.वि.कुलकर्णी, प्रा.वि.ना.शुक्ल , संस्थेतील माजी मुख्याध्यापक आणि राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त श्री.श्री.वा.कुलकर्णी आणि अन्य सदस्यांचे मंडळ तयार झाले. संस्थेच्या स्थापनेपासूनचे संस्था कार्यालयात उपलब्ध असलेले‌ दस्तऐवज, पुण्यातील विविध वाचनालयातील तत्कालीन ‌कागदपत्रे, संदर्भ ग्रंथ, माजी पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती, तज्ञ माहितगारांच्या भेटी, इंटरनेट अशा विविध मार्गांनी प्रचंड माहिती गोळा करून ग्रंथ सिद्ध झाला.  डॉ.केतकी मोडक यांनी प्रवाही पद्धतीने त्याचे लेखन केले.

         केवळ भारतीयांनी सुरू केलेली आणि आजही वर्धिष्णू असलेली अशा दोन विशेषणांनी वर्णन केले तर त्यानुसार बहुधा भारतातील सर्वात जुनी असलेली शैक्षणिक संस्था म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. अशा ऐतिहासिक परंपरा असलेल्या संस्थेच्या इतिहास ग्रंथाचे प्रकाशन तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तिच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. प्रत्यक्ष शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष १९ नोव्हेंबर २०१९ ला सुरू झाले. आणि काय‌ दुर्दैव! मार्च २०२० पासून भारत जगाबरोबर कोव्हिड-१९ च्या आपत्तीत ओढला गेला. अर्थातच त्यावेळी प्राधान्य या महामारीच्या आपत्तीला शक्य तेवढ्या चांगल्या पद्धतीने तोंड देण्याला. संस्थेने आपत्तीनिवारणाचे शक्य ते प्रयत्न केले. त्यामुळे पुस्तक प्रसिद्धीच्या प्रयत्नांचा वेग स्वाभाविकपणे मंदावला.

     जसजशी पहिली लाट ओसरू लागली तसा दिल्लीतील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाला. विविध मार्गांनी, विविध व्यक्तिंच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते.‌ पण मग परत कोव्हिड-१९ ची दुसरी लाट, ऑनलाइन ‌,नंतर‌ परत ऑफलाईन या सगळ्यात कार्यक्रम पुढे पुढे जात होता.‌

ऑक्टोबर २०२१ मध्ये श्री.सतीशजी वेलणकर यांच्या माध्यमातून मा.उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाशी संपर्क झाला. सतीशजींच्याच मदतीने मा.उपराष्ट्रपती यांनी संस्थेची विनंती तत्वतः मान्य केली. त्यानंतर औपचारिक प्रक्रियेला सुरूवात झाली. पुस्तकाची प्रत अवलोकनार्थ मा.उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाला पाठवण्यात आली. त्यांच्या कार्यालयाने तिचे अवलोकन करून अनुकूल अभिप्राय दिला. मा.उपराष्ट्रपती यांचा दिनांक ५ किंवा ६ जानेवारी २०२२ असा निश्चित होत होता. पण त्यादिवशी ते हैदराबाद येथून कार्यक्रमात सहभागी होतील असे सांगण्यात आले त्यामुळे ते २३ जानेवारी २०२२ नंतर दिल्लीत आल्यावरच कार्यक्रम करावा असे ठरले. दरम्यान कोव्हिड-१९ ची तिसरी लाट येऊन थडकली. आणि २३ जानेवारीला मा.उपराष्ट्रपती हे कोविडने आजारी पडले. त्यामुळे कार्यक्रम अजून पुढे गेला. २९ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. मा.उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध पदाधिकारी असल्याने संसदेच्या अधिवेशन काळात त्यांना वेळ देता येणे अवघड होत होते. पण आमचे प्रयत्न सुरूच होते. आणि अचानक ६ फेब्रुवारी २०२२ ला मा.उपराष्ट्रपती यांनी राज्यसभेच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ८ फेब्रुवारी २०२२ ला वेळ दिल्याचे निश्चित झाले आणि सुरू झाली शेवटच्या टप्प्यातील धावपळ.

   हा कार्यक्रम ऑनलाईन, ऑफलाईन अशा संमिश्र पद्धतीने करण्याचा सराव संस्थेच्या आधीच्या कार्यक्रमातून झाला होताच. तो अनुभव गाठीशी बांधून विविध समित्यांना, व्यक्तिंना विविध कामे वाटली गेली होती. कामांची आखणी झाली होती त्याप्रमाणे निमंत्रण पत्रिका, निमंत्रितांची यादी ऑनलाईन कार्यक्रमाची तयारी,  बॅनर निश्चिती अशी एक एक गोष्ट पूर्ण होत होती. तयारी करत करत तो दिवस प्रत्यक्ष उजाडण्याची आम्ही मिनिटामिनिटाने वाट पहात होतो. संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे नियामक मंडळ अध्यक्ष मा.राजीवजी सहस्रबुद्धे, सचिव डॉ.भरत व्हनकटे, लेखिका डॉ.केतकी मोडक आणि  मी असे आम्ही चारजण विमानाने दिल्लीला ७ फेब्रुवारी २०२२ ला रात्री ९:१५ ला पोचलो. तेव्हा काहीच तास उरले होते त्या  ८ फेब्रुवारी २०२२ या दिवसाला.

सुधीर गाडे, पुणे

Comments

  1. So many efforts behind any good deeds

    ReplyDelete
  2. खरोखर सर, संस्थेच्या कार्यासाठी तुमच्यासारखे नियामक मंडळाचे सदस्य अविरत आणि अफाट कष्ट घेत आहेत त्यामुळेच संस्था नावारूपाला आलेली आहे
    सर्व नियामक मंडळाचे अभिनंदन आणि खूप खूप आभार

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख