मएसो भवन ते राष्ट्रपती भवन भाग ३

 दुसऱ्या दिवशी ९ फेब्रुवारीला नाष्टा करून राजीवजी, मोडक मॅडम आणि मी दिल्लीतील योगी अरविंद यांच्या आश्रमाकडे निघालो तर व्हनकटे सर विद्यापीठ अनुदान आयोगात गेले.  मोडक मॅडम अरविंद आश्रमाच्या वतीने निघणाऱ्या मराठी नियतकालिकाच्या संपादनाचे काम करतात. त्यांच्या आग्रहाने आम्ही आश्रमात पोचलो. तेथे आमचे आत्मीयतेने स्वागत झाले. आश्रमाच्या विविध उपक्रमांची माहिती मिळाली. निसर्गसुंदर, पवित्र आश्रमाचा फेरफटका मारता आला. तेथील ध्यानमंदिर आणि योगी अरविंद यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करता आंतरिक शांततेचा अनुभव आला. आश्रमाच्या प्रमुख तारादीदी यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी व्यस्ततेतून थोडा वेळ काढून आमच्याशी संवाद साधला. ' मएसोबरोबर काम करायला आवडेल.' असे त्या म्हणाल्या. ' तुम्ही निवृत्त झाल्यावर इथे येऊन काम करायचे आहे ' असे त्यांनी आग्रहाने मोडक मॅडमना सांगितले. आश्रमातील भोजनाचा लाभ घेऊन राजीवजी आणि मी विमानतळावर पोचलो. प्रवासात असताना सतीशजींचा मा.राष्ट्रपतींना भेटीची वेळ मागण्यासाठी  इमेल पाठवण्याचा व्हॉट्स अप संदेश आला होता. त्याप्रमाणे संस्था कार्यालयातून इमेल पाठवण्याची व्यवस्था केली. विमानतळावरील सोपस्कार पूर्ण करून आम्ही विमानाची वाट पाहत बसलो होतो. तेवढ्यात सतीशजींचा फोन आला की कुठे आहात? मा.राष्ट्रपतींनी दुसऱ्या दिवशी १० फेब्रुवारीला सकाळी १०:१५ वाजता भेटण्याची वेळ दिली आहे. शक्य आहे का? राजीवजींशी बोलून त्याला होकार दिला. काय चक्रे फिरली ते आम्हाला माहिती नव्हते पण वेळ मिळाली होती. विमानतळावरील विमानकंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना एका अर्थाने भांबावलेल्या स्थितीत उत्तरे देत आम्ही बाहेर पडत होतो. तेवढ्यात मा. राष्ट्रपतींचे स्वीय सहाय्यक श्री.अमरजित यांचा फोन आला की उद्याच्या भेटीसाठी येण्यापूर्वी कोविड चाचणी करून या. आता दिल्लीत कुणाला विचारायचे? पुन्हा सतीशजींना फोन. त्यांच्या संपर्कातून संबंधित डॉक्टरांचा फोन आला. व्हनकटे सर त्यांचे काम संपवून हॉटेलकडे निघतच होते. मोडक मॅडमना ताबडतोब हॉटेलकडे निघायला सांगितले. विमानतळावरून गाडीने परत येताना यासंबंधीचे फोनवर फोन सुरू होते.  कोविड चाचणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आमचा लाळेचा नमुना घेतला आणि एक-दोन मिनिटांत मोडक मॅडम आल्या. त्यांचाही नमुना घेतला गेला. आता सुरू झाली प्रतीक्षा. तपासणीचा निकाल काय येतो याची. थोडी अनिश्चितता वाटत होती कारण काही वेळा कोविड झाला तरी लक्षणे दिसत नाहीत. 

     या अनिश्चित मनस्थितीतच राजीवजी त्यांच्या खोलीत गेले तर मोडक मॅडम आणि मी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो. व्हनकटे सर त्यांचे दुसरीकडील काम संपवून आम्हाला येऊन भेटले. आदल्या दिवसापासून राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली का असे सतीशजींनी २-३ वेळा विचारले होते. असलेल्या वेळेचा उपयोग करून आम्ही गुगलबाबाने सांगितले की स्मारक उघडे आहे म्हणून तिथे सातच्या सुमारास पोचलो. पण गुगलबाबा चुकला होता. स्मारकात सायंकाळी पाचनंतर प्रवेश नसतो आणि आतील सर्वांना सहा वाजता बाहेर पडावे लागते. मग काय बाहेरून पाहूनच माघारी फिरलो. 

     परतत असताना परत राष्ट्रपती भवनातून दुसऱ्या दिवशीच्या तयारीबाबत फोन आला. 

     रात्रीचे जेवण करून आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. कोविड चाचणी करणाऱ्या डॉ.राकेश यांनी सांगितले होते की रात्री बारा वाजेपर्यंत अहवाल येतील. त्यामुळे आम्ही आपापल्या खोलीत गेलो. दिवसभराच्या धावपळीने आमचा डोळा लागला. रात्री ११:३० च्या सुमाराला राजीवजींना जाग आल्यावर तपासणीचा संदेश मोबाईलवर आल्याचे कळाले. त्यांनी मला आणि मी व्हनकटे सरांना त्यांच्या खोलीत बोलावले. चौघांचे अहवाल पाहिले. हुश्श...! सर्वांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले होते. मोडक मॅडमना व्हॉट्स अपवर कळवले. आता पुढची तयारी सुरू झाली. सकाळी काय करायचे याचे नियोजन केले. आता परतीच्या विमानाचे तिकीट काढायचे पण ते लवकर निश्चित होईना. शेवटी रात्री एकच्या सुमाराला व्हनकटे सरांनी मी करतो असे सांगितले. आम्ही आपापल्या खोल्यात बिछान्यावर पडलो. पण सगळ्यांनाच अगदी थोडा वेळ झोप लागली.  सर्वांनाच प्रत्यक्ष भेटीची उत्सुकता होती.

     ठरवल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता नाष्ट्याला भेटलो.  प्रत्यक्ष भेटीत काय करायचे , कसे करायचे याची परत एकदा उजळणी झाली. बाहेर पडलो. तेवढ्यात राष्ट्रपती भवनातून कोविड चाचणी अहवाल पाठवण्यासाठी फोन आला. त्यांना अहवाल पाठवला. हॉटेलमधील कर्मचाऱ्याला विचारून जवळच्या एका फुलांच्या दुकानात भरभर जाऊन मी पुष्पगुच्छ घेऊन आलो. व्हनकटे सरांनी ठरवलेली गाडी आली आणि आम्ही त्यात बसून निघालो. चालक आणि गाडी दिल्लीबाहेरचा असल्याने एकदोन ठिकाणी रस्ता चुकला. वेळ हाताशी होता पण शेवटच्या क्षणी उशीर नको असे वाटून थोडी अस्वस्थता वाढत होती. शेवटी पोलिसांना विचारत विचारत, राष्ट्रपती भवन कार्यालयाशी संपर्क साधत त्या भव्य प्रांगणात प्रवेश मिळाला. 

      राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रासादात प्रवेश केल्यावर आम्ही नेलेल्या बॅगांची, भेटवस्तूंची तपासणी झाली. बॅग, मोबाईल जमा करून घेतले गेले. भेटवस्तूंना लेबलं लावून त्या आम्हाला परत मिळाल्या. त्या भव्य प्रासादाच्या कॉरिडॉरमधून प्रतीक्षा कक्षात नेऊन बसवण्यात आले. तेथील कर्मचारी आम्हाला काय हवे नको विचारू लागले. थोड्याच वेळात केक, वडे असे आमच्या समोर आणल्या गेल्या. मोडक मॅडम काय बोलायचे याची तयारी करत होत्या. लिहून घेत होत्या. आम्ही तिघांनी केकचा आस्वाद घेतला. तेवढ्यात चहा आला. त्याचाही आम्ही अस्वाद घेतला. भारताचे प्रथम नागरिक असलेल्या मा. राष्ट्रपतींच्या निवासात भारताचे राजचिन्ह असणाऱ्या कप बशी यातून अल्पाहाराचा आनंद घेत असताना विलक्षण आनंद होत होता. (आदल्या दिवसापासून थोडे पित्त झाल्याने मी त्यादिवशी फक्त राष्ट्रपती भवनातीलच चहा प्यालो.🙂) मा. राष्ट्रपती यांचे स्वीय सहाय्यक अमरजित येऊन आम्हाला भेटून गेले. त्यांच्याशी काही मिनिटांचा संवाद झाला. तेव्हा त्यांनी सांगितले की स्वतः राष्ट्रपतींनी मुंबई ऐवजी दिल्लीतच भेट व्हावी असे सुचवले त्यामुळे आदल्या दिवशी निरोप देण्यात आला. आम्हाला आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्काच बसला.

                            

         प्रत्यक्ष भेटीसाठी जाण्यापूर्वी आम्ही आणलेल्या भेटवस्तू सॅनिटाइज करून आम्हाला परत देण्यात आल्या आमचे हात सॅनिटाइज करण्यात आले नवीन मास्क आम्हाला घालण्यासाठी देण्यात आला. आणि अखेर ती वेळ आली. आम्हाला मा. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी बोलावणे आले. 

      त्या भव्य कॉरिडॉरमधून जात असताना भिंतींवर स्तंभांवर लिहिलेल्या संस्कृत श्लोकांकडे लक्ष जात होते. मनात आनंदाचे, अभिमानाचे तरंग उमटत होते. मा. राष्ट्रपती कावेरी दालनात आसनस्थ होते. दरवाजा उघडताना तेथील कर्मचाऱ्यांनी आमच्या भेट वस्तू आमच्या हातात दिल्या. आता प्रवेश करताना राष्ट्रपतींना आम्ही नमस्कार केला त्यांनीही सौजन्यपूर्वक आम्हाला नमस्कार केला. त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांनी स्वतः सांगितले की फक्त फोटो काढताना मास्क काढून ठेवा. राजीवजींनी मा.राष्ट्रपती श्री.रामनाथजी कोविंद यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार केला.  नंतर संस्थेचा इतिहासग्रंथ 'ध्यासपंथे चालता' भेट दिला. या प्रसंगांची छायाचित्रे घेऊन झाल्यावर राष्ट्रपतींसोबत आम्ही आसनस्थ झालो. तेव्हा मा. राष्ट्रपतींनी स्वतः सांगितले की मुंबईला येण्याचा फेरा आम्हाला पडू नये म्हणून त्यांनी स्वतः सूचना देऊन कार्यक्रमात बदल केला आणि दिल्लीत आम्हाला भेटण्याची वेळ दिली. केवढा हा मनाचा मोठेपणा!

    




        त्यानंतर सुमारे १५ ते २० मिनिटे त्यांनी आमच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यांची डिसेंबर महिन्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी पुण्यात भेट झाली होती. तेव्हाच्या त्यांच्या इच्छेनुसार इतिहासग्रंथाची पहिली प्रत भेट देण्याचा योग जुळून आला होता. त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेचे अभिनंदन केले. पुणे शहराने शैक्षणिक कार्याने देशभरात आपला नावलौकिक मिळवला आहे. देशाला प्रेरणा दिली आहे. यात मएसोचे योगदान आहे असे कौतुक केले. आम्हाला धन्य धन्य वाटले. इतिहासग्रंथाच्या आरंभीच्या पृष्ठावरील असणाऱ्या काव्यपंक्तींचा अर्थ समजून घेतला. या पंक्ती त्यांच्या १२ फेब्रुवारीच्या अंबवडे या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वजांच्या गावी होणाऱ्या कार्यक्रमातील भाषणात वापरणार आहे असे त्यांनी सांगितले. हा अजून एक आनंदाचा धक्काच होता. भेट संपवताना त्यांनी स्वतःहून त्यांच्या निवासातील कर्मचाऱ्यांना आम्हाला राष्ट्रपती भवन दाखवण्यास सांगितले. हा तर सौजन्याचा कळसच होता! त्यांना नमस्कार करून आम्ही भारावल्या स्थितीतच पुन्हा प्रतीक्षा कक्षात आलो. तेथे परत अमरजित यांची भेट झाली. आम्ही त्यांच्यासाठी आणलेले पुस्तक त्यांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांचे आभार मानले.

         राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी मार्गदर्शक महिलेची (गाईडची) व्यवस्था केली. पुढचा सुमारे तासभर आम्हाला राष्ट्रपती भवन फिरवून दाखवण्यात आले. बॅंक्वेट हॉल, अशोक सभागृह, दरबार सभागृह, राष्ट्रप्रमुख यांच्या भेटीचा कक्ष,  राज्यपाल , कुलगुरू यांच्या बैठकीचा कक्ष , ज्यांनी नवी दिल्लीचे नगरनियोजन केले, राष्ट्रपती भवनाची वास्तुरचना केली त्या ल्यूटन यांचा अर्धपुतळा असे सर्व आम्हाला बघायला मिळाले. सोबत त्याची माहितीदेखील मिळत होती. आता अजून एक आनंदाचा धक्का बसणार होता. 

      दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये राष्ट्रपती भवनातील मुगल गार्डन नागरिकांसाठी खुले केले जाते.  आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली त्याच दिवशी सकाळी मा. राष्ट्रपतींनी यावर्षीसाठी हे मुगल गार्डन नागरिकांसाठी खुले करण्याच्या कार्यक्रमात त्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर ते नागरिकांसाठी खुले झाले होते. आम्ही परवानगी घेऊन आमचे मोबाईल फोन परत घेतले आणि या मुगल गार्डनला भेट दिली. यावर्षी या गार्डनला भेट देणारे आम्ही पहिलेच नागरिक होतो. विविध रंगाच्या, आकारांच्या, प्रकारांच्या फुलांनी, झाडांनी सौंदर्याची नयनमनोहर अशी उधळण झाली होती. साधारण पंधरा-वीस मिनिटे आम्हाला ते गार्डन पाहण्यासाठी वेळ मिळाला. 

           


        आता परत जायची वेळ झाली होती. अमरजित यांनी गाडीची व्यवस्था केली. एक ऐतिहासिक, अविस्मरणीय असा प्रसंग अनुभवून आम्ही राष्ट्रपती भवनातून बाहेर पडत होतो.

   


      आम्ही गाडीतूनच सतीशजींना फोन केला त्यांचे आभार मानले. गाडीने हॉटेलवर आल्यावर साहित्य घेऊन आम्ही विमानतळावर निघालो. विमानतळावर पोचल्यावर सुरक्षिततेचे सर्व सोपस्कार पार पाडून भोजनाचा आनंद घेतला आणि विमानाने पुण्याला पोहोचलो तेव्हा तो ऐतिहासिक दिवस मावळत होता. पुण्याच्या विमानतळावरून बाहेर पडत असताना मला पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनातून फोन आला. त्यांच्या सूचनेनुसार सकाळी मा. राष्ट्रपतींनी ज्या काव्यपंक्तीचा अर्थ विचारला होता तो मी त्यांना व्हॉट्सअपद्वारे लगेच कळवला. या प्रवासात सतीशजी वेलणकर यांची खूपच मदत झाली. पुण्यात पोचल्यावर रात्री त्यांनी स्वत:हून संदेश पाठवून आम्ही कुठे आहोत याची चौकशी केली. केवढी ही आपुलकी !

ही दिल्लीवारी आमच्या कायम स्मरणात राहील. अशा रीतीने मएसो भवन ते राष्ट्रपती भवन हा प्रवास पूर्ण झाला.

ता.क. मा.राष्ट्रपतींनी बोलल्याप्रमाणे १२ फेब्रुवारीच्या भाषणात इतिहास ग्रंथांतील काव्यपंक्तींचा उल्लेख केला.

 सुधीर गाडे,  पुणे

Comments

  1. अप्रतिम अनुभव

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख... सारं चित्र डोळ्यासमोर उभे राहिले....

    ReplyDelete
  3. शब्दातीत वर्णन. लेख वाचताना आम्हीच राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेत आहोत असे वाटत होते. खूपच सुंदर. धन्यवाद सर.

    ReplyDelete
  4. आयुष्यभर लक्षात राहील असा नितांतसुंदर अनुभव मिळाला तुम्हाला सगळ्यांना, आणि सर तुमच शब्दांकन पण खूप छान आहे .

    ReplyDelete
  5. खूप छान शब्दांकन

    ReplyDelete
  6. खरेच खूप छान शब्दांकन.राष्ट्रपती भवनाला प्रत्यक्ष भेटीचा अनुभव आला.☺️🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख