मएसो भवन ते राष्ट्रपती भवन भाग २

        अखेर ८ फेब्रुवारी २०२२ हा दिवस उजाडला. सकाळी हॉटेलमध्ये नाष्ट्याच्या वेळी आम्ही चौघे जण एकत्र आलो. आता दिल्लीत कोणकोणती कामे करणे बाकी आहे याचा आढावा घेऊन चर्चा सुरू झाली. तेवढ्यात माननीय उपराष्ट्रपती यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या भाषणाचा मसुदा आम्हाला बघण्यासाठी पाठवण्यात आला. त्यामधील काही वस्तुस्थिती दर्शक छोटे बदल आम्ही सुचवून तसे त्यांच्या कार्यालयाला कळवले. 

       आदल्या दिवशी कार्यालयाकडून कार्यक्रमाच्या वेळी लावण्याच्या बॅनरबद्दल सूचना आली होती. पण आम्ही पाठवलेल्या बॅनरला त्यांच्याकडून मान्यता आली नव्हती. त्यामुळे बॅनर पुण्यातून घेऊन जाणे शक्य झाले नव्हते. आता मान्यता आली की बॅनर दिल्लीतून प्रिंट करून घ्यायचा या उद्देशाने आम्ही एका जवळच्या दुकानात गेलो आणि चौकशी केली. दरम्यान सकाळचे साडेदहा वाजले तरीदेखील बॅनरला मान्यता आली नव्हती. त्यामुळे त्याचा पाठपुरावा सुरू झाला. अखेर साडेअकराच्या सुमाराला बॅनरला मान्यता आली. आम्ही बॅनरचा आकार आठ × चार फूट गृहित धरला होता. पण दुकानदाराने सांगितले की या आकाराचा बॅनर छापायला किमान चार ते पाच तास लागतील. आता काय करायचे? मग दुकानदाराच्या सूचनेनुसार आठ × तीन फूट आकाराचा बॅनर नक्की केला. 

       तो बॅनर घेण्यासाठी मी त्याच दुकानात थांबलो. तिथे थांबलो असताना मला प्रत्यक्ष कार्यक्रमात करायच्या सूत्रसंचालनाची तयारी करत होतो. त्यासाठी आमच्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या निवृत्त विभागप्रमुख डॉ.नीला बोरवणकर यांना फोन केला. मी दुकानात थांबलो असताना राजीवजी व्हनकटे सर आणि मोडक मॅडम बाहेर पडून मा.उपराष्ट्रपतींना द्यायचा पुष्पगुच्छ, त्यांचे स्वीय सहाय्यक चैतन्य यांना देण्यासाठी पुस्तक यांच्या खरेदीसाठी बाहेर पडले. मी बॅनर ताब्यात घेऊन पुस्तकाच्या दुकानात त्यांना जाऊन भेटलो. पुस्तक खरेदी होईतोपर्यंत दुपारचे साडेबारा वाजले होते. त्यानंतर जेवताना लक्षात आले की राजीवजी आणि माझे दुसऱ्या दिवशीचे सकाळी ९ वाजताचे विमान रद्द झाले असून आम्हाला ४:३० च्या विमानाचे तिकीट मिळाले आहे. व्हनकटे सर आणि मोडक मॅडम त्यांची कामे आटोपून दुसऱ्या दिवशी रात्रीच्या विमानाने पुण्याला येणार होते. जेवून हॉटेलातील खोलीवर जाऊन, कपडे बदलून दोनच्या सुमाराला मा. उपराष्ट्रपती यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी आम्ही निघालो.

          उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी पोचल्यानंतर दरवाजावरती सुरक्षा अधिकाऱ्यांना निमंत्रितांच्या यादीत आमच्या नावाचा कागद लवकर सापडेना. मग परत फोन करून संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांचे बोलणे करून दिले आणि आम्ही निवासस्थानात पोचलो. ज्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात कार्यक्रम होणार होता तेथे आम्ही पोचलो. तिथे आत पोचल्यावर आमचे मराठीतील बोलणे ऐकून बीव्हीजी कंपनीतील तेथील कर्मचारी आमच्याशी मराठीत बोलू लागला तेव्हा कळाले की तो साताऱ्याचा होता. 

         आता आमची तयारी सुरू झाली. बरोबर आणलेल्या बॅगमधून मा. उपराष्ट्रपती यांना देण्यासाठी आणलेल्या भेटवस्तू, प्रकाशित करायच्या पुस्तकाच्या प्रती, लेखिका डॉ.मोडक यांच्या सत्काराचे साहित्य हे सगळे बाहेर काढून ठेवू लागलो. आम्ही पोचलो त्याचवेळी या कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग करणारी आणि त्याचे प्रक्षेपण करणारी टीम तिथे पोचली. त्यांचेही काम सुरू झाले. ते पुण्यातील टेक्निकल टीमच्या संपर्कात होते. 

        पण यादरम्यान अचानक एक अडचण समोर आली. बॅनर सॉफ्ट बोर्डवर लावण्यासाठी पिन्स किंवा तो चिकटवा लागेल या तयारीने आम्ही डबल साइडेड टेप घेऊन गेलो होतो. पण...... पण तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की बॅनर लावण्यासाठी फ्रेम घेऊन यायची असते. ही सूचना आम्हाला त्यापूर्वी स्पष्टपणे मिळाली नव्हती आणि आमच्याही लक्षात आली नव्हती. आता काय करायचे? 

        याची चर्चा सुरू होती एवढ्यात उपराष्ट्रपतींचे स्वीय सहाय्यक चैतन्य तिथे आले. आमचे फोन, व्हॉट्स अपवर अनेकवेळा बोलणे झाले होते पण प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच झाली. त्यांनी अतिशय आपुलकीने आमची चौकशी केली मी त्यांना सर्वांची ओळख करून दिली. त्यांनी कर्मचाऱ्यांना सर्व ते सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. ते कर्मचारी काही पर्याय मिळतोय का म्हणून कामाला लागले. चैतन्य पुढच्या कामाला निघून गेले. नंतर त्यांनी आमच्यासाठी चहा, पाणी , बिस्किटे पाठवली. आम्ही त्याचा आस्वाद घेतला. तेवढ्यात तिथला कर्मचारी मला सांगत आला की बॅनर लावण्यासाठी जुनी चौकट सापडली आणि तो बॅनर घेऊन गेला. चला एक काम मार्गी लागले असे वाटले पण काहीच मिनिटांत तो सांगायला आला की बॅनर बसत नाही बघायला चला. मी बघायला गेलो आणि लक्षात आले की ती चौकट ६×४ फूट मापाची आणि बॅनर ८×३ फूट मापाचा आहे. आता काय करायचे म्हणून मी राजीवजी सहस्रबुद्धे यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो. तेव्हा तो कर्मचारी म्हणाला की त्याच्याकडे फक्त कटर आहे ते वापरून ६×४ ची चौकट, ६×३ ची करता येईल. त्यावर एका बाजूला घडी करून बॅनर लावता येईल. पण त्यात बॅनरवरचा काही मजकूर दुमडला जात होता. त्यावर आर्किटेक्ट असलेल्या राजीवजींनी सुचवले की कापलेले पाइप वापरून लांबी एक फूट वाढवता येईल. तेवढ्याने बॅनर थोडा दुमडून काम भागेल. झाले पाइप कापले. बाइंडिंग वायर वापरून एक फूट लांबी वाढवण्यात आली. सोबतच्या फोटोत लक्षात येईल. एक प्रश्न सुटला होता. आम्ही परत सभागृहात आलो. पुढच्या तयारीला लागलो.

   



      तेवढ्यात मा.उपराष्ट्रपतींच्या भेटीला येऊन बसलेल्या माणसांकडे माझे लक्ष गेले. आणि आनंदाचा धक्का बसला कारण त्यांच्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते श्री.सुरेशराव कुलकर्णी होते. त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी आणि त्यांच्या सोबत असलेल्या भगवान सहायजी आणि सूर्यनारायणराव त्यांच्याशी बोललो त्यांची राजीवजी, व्हनकटे सर आणि मोडक मॅडम यांच्याशी ओळख करून दिली.  

   त्यांच्याशी दोन तीन मिनिटे बोलून आम्ही पुढच्या कामाला लागलो. आता एक छोटा प्रश्न होता तो म्हणजे सत्काराचे साहित्य असलेला ट्रे कोण घेऊन जाणार. मा.उपराष्ट्रपती कार्यालयातील अधिकारी म्हणाले त्यांच्या कार्यालयातील सेवक हे काम करेल आणि तो प्रश्न सुटला.

     कार्यक्रम रेकॉर्ड करणाऱ्या टीमला सांगून मा.उपराष्ट्रपती यांना पुण्यातील सभागृहात असणारे निमंत्रित दिसावेत याच्यासाठी चैतन्य यांना सांगून तेथील व्यासपीठासमोर मॉनिटर लावून घेतला. दरम्यान चार वाजत आले. तांत्रिक चाचणी पूर्ण झाली होती. पुण्याशी संपर्क झाला होता. दिल्लीतील सभागृहात पार्टिशन लावून ते छोटे करण्यात आले. इतक्यात सूचना आली की मा.उपराष्ट्रपतींचे शेजारच्या दालनात आगमन झाले आहे. ते त्यांच्या नियोजित निमंत्रितांना भेटत आहेत. 

        इकडे पुण्याचा कार्यक्रम काही अडचणींमुळे काही मिनिटे उशीरा सुरू झाला. तो आम्ही लावलेल्या मॉनिटरसमोर बसून पाहू लागलो. पुण्यातील कार्यक्रम पुढे जाऊ लागला तसतशी मा. उपराष्ट्रपतींच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची लगबग सुरू झाली. त्यांच्या वेगवेगळ्या सूचना सुरू झाल्या. भेटवस्तूंचे ट्रे इकडून तिकडे, तिकडून परत इकडे असे हलवले गेले. गोंधळ नको म्हणून मा. उपराष्ट्रपती यांना भेट देण्याचे पुस्तक बाजूला काढायला लावले. फक्त इतिहास ग्रंथ टीपॉयवर ठेवायला लावला.

          पुण्यातील कार्यक्रम नियोजनापेक्षा थोडा लांबतो आहे असे लक्षात येताच आमचे तिथून पुण्याला फोनवर फोन सुरू झाले. मा. उपराष्ट्रपती यांच्या आधीच्या भेटी थोड्या लवकर संपल्या. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कार्यक्रम वेळेवरच सुरू करा, सुरू करा अशा सूचना सुरू केल्या. पुण्यातील कार्यक्रम संपवून मध्ये तांत्रिक जोडणीसाठी थोडा मोकळा वेळ गृहित धरला होता. तोही वेळ पुण्यातील कार्यक्रमात संपू लागला. पण ५ वाजायच्या काही मिनिटे आधीच पुण्याचा कार्यक्रम संपला. आमच्या फोनच्या माऱ्याचा उपयोग झाला होता. दिल्लीत आम्हाला हुश्श झाले.

                       

          मा. उपराष्ट्रपती यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार राजीवजी आणि व्हनकटे सर मा. उपराष्ट्रपती यांना शेजारच्या दालनातून कार्यक्रमस्थळी घेऊन येण्यास गेले आणि मी सूत्रसंचालक म्हणून ध्वनीवर्धकासमोर उभा राहिलो. कार्यक्रमाच्या स्थळी येत असताना मा.वेंकय्याजी नायडू यांनी सांगितले की मएसो सारखी १६० वर्षांची परंपरा असणारी, चांगले काम करणारी संस्था असल्यानेच मी हा कार्यक्रम स्वीकारला आहे. मा. उपराष्ट्रपतींचे वेळेवर आगमन झाले. दिल्लीतील कार्यक्रमापूर्वी आम्ही सर्वांनी आपापला सराव अनेक वेळा केला होता. त्यामुळे आमचे सर्वांचे बोलणे ठरलेल्या वेळेतच संपले. मा. उपराष्ट्रपतींचे भाषणही प्रेरणादायक, विचारप्रवर्तक, मार्गदर्शक असे झाले. भाषणात त्यांनी मएसोचे केलेले कौतुक, अभिनंदन ऐकताना अभिमानाने मन भरून येत होते. मराठी भाषेतील काही वाक्ये सुरूवातीला बोलून त्यांनी सर्वांची मने जिंकली. अतिशय अविस्मरणीय असाच तो प्रसंग होता.

      दिल्लीतील कार्यक्रम संपल्यावर आम्ही आवराआवरीला सुरूवात केली. चैतन्य यांचा पुस्तक देऊन सत्कार केला. तेवढ्यात लक्षात आले की मा. उपराष्ट्रपती यांना भेट देण्यासाठी आणलेले पुस्तक द्यायचे राहून गेले आहे. म्हणून ते चैतन्य यांना देण्यासाठी मी शेजारच्या दालनात गेलो. तेव्हा चैतन्य म्हणाले शेवटची नियोजित भेट संपतच आली आहे. तुम्ही स्वतःच पुस्तक द्या. एकदोनच मिनिटात आधीची व्यक्ती बाहेर पडली आणि मला एकट्याला मा. उपराष्ट्रपतींना पुस्तक भेट देता आले. हा अविस्मरणीय क्षण माझ्या वाट्याला आला.

     आवराआवरी पूर्ण करत असताना सतीश वेलणकर यांना फोन केला. त्यांनी भेटायला वेळ दिली. आम्ही त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी आपुलकीने आमचे स्वागत, आदरातिथ्य केले. बोलताना विषय निघाला की मा.राष्ट्रपतींनी पुण्यातील भेटीदरम्यान ग्रंथाची पहिली प्रत प्रकाशनानंतर भेट द्यायला सुचवले आहे. याबाबत काय करता येईल. सतीशजींनी मा. राष्ट्रपती यांचे स्वीय सहाय्यक अमरजीत यांना फोन लावला. त्यांनी सांगितले की मा. राष्ट्रपती १० ते १२ फेब्रुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तेव्हा भेट होऊ शकते. पण मनोमन आमची इच्छा अशी होती की मा.राष्ट्रपतींची भेट दिल्लीतच मिळावी. त्यात जास्त औचित्य होते. दिल्लीतील भेट ही जास्त सविस्तर व सुलभ होईल असे वाटत होते.  पण सतीशजींना अमरजीत यांनी सांगितलेले उत्तर ऐकून आम्ही बाहेर पडलो. 

  


        हॉटेलमध्ये जाऊन कपडे बदलून जेवायला गेलो. जेवताना या अविस्मरणीय कार्यक्रमाची चर्चा सुरू होती. दुसऱ्या दिवशी परत पुण्याला यायचे नियोजन सुरू झाले होते. एक अविस्मरणीय दिवस संपत होता पण दुसऱ्या दिवशी काय घडणार याची आम्हाला कल्पना नव्हती.


सुधीर गाडे, पुणे


Comments

  1. खुपच छान ओघवते वर्णन.. कधी संपले कळलेच नाही. पुढच्या भागाची वाट पहात आहे. खूप सुंदर अनुभव👌👌👌 अभिनंदन तुमचे💐💐

    ReplyDelete

Post a Comment