सरसकट विशेषण


  " जेवण काय सुंदर झाले."  माझ्या परिचयातील एकजण म्हणत होता. हल्ली बरेच वेळा ' सुंदर ' हे विशेषण सरसकटपणे वापरले जाते असे माझ्या लक्षात आले आहे.


    बरेच जण म्हणत असतात. " भाषण फार सुंदर झाले." " लेख अतिशय सुंदर होता. ", " सुंदर प्रसंग" ,  "सुंदर सहल झाली." अशी काही उदाहरणे सांगता येतील. पण योग्य त्या ठिकाणी योग्य ते विशेषण वापरणे आवश्यक आहे असे वाटते.

    जेवणाबाबत बोलायचे असेल तर  ' चविष्ट' , 'रूचकर' ही विशेषणे अनुरूप आहेत. भाषण लेखन याबाबत 'प्रभावी' , ' माहितीयुक्त', ' प्रेरणादायक '  अशी विशेषणे वापरता येतील. ' सुंदर ' हे विशेषण चित्र, छायाचित्र, व्यक्ती यांच्यासाठी वापरणे योग्य राहील असे वाटते. यात एक छोटी गोष्ट करता येते ती म्हणजे ' छान' , ' मस्त' ही विशेषणे मात्र सगळीकडे वापरता येऊ शकतात.

     सरसकट एकच विशेषण सगळीकडे वापरण्याचे कारण म्हणजे भाषा चांगल्या पद्धतीने समजलेली ( अवघड शब्द ' आत्मसात केलेली ' ) नसणे हे आहे असे मला वाटते. तसेच भाषेचा वापर फक्त कार्यालयीन उपयोगापुरता करण्याची सवय झालेली असते. दैनंदिन जगण्याशी त्याचा फार संबंध राहिलेला नसतो. मराठी भाषेवर शिक्षण, व्यवसाय यामुळे इंग्रजीचा तर चित्रपट, मालिका यामुळे हिंदीचा पगडा जास्त पडलेला दिसून येतो. त्यामुळे बोलण्यात इंग्रजी, हिंदी शब्द, वळण जास्त दिसून येते. 

    आपण थोडे जागरूक राहिलो तर असे सरसकटीकरण नक्की टाळता येईल असे वाटते.


सुधीर गाडे पुणे 

Comments

  1. अत्यंत समर्पक.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर आहे आपले निरीक्षण!
    एका दृष्टीने भाषेचा सर्वांगीण विकास झालेला नसल्याने असे घडते. शब्दभांडार परिपूर्ण नसल्याने असे घडते . विविध शब्दांमध्ये जो सामाईक भाव असतो तो वापरण्याची प्रवृत्ती असल्याने असे घडते . जसे 4, 8, 12, 20 , 24......या सर्व संख्यांऐवजी त्यांचा म. सा.वि. 4 हा त्या सर्वांचे प्रतिनिधीत्व करु शकत नाही तसेच आपण निर्देशित केलेल्या विविध विशेषणांमध्ये 'सुंदर' हा भाव समाईक असला तरी तो त्या सर्व विशेषणांचा पर्याय असूच शकत नाही.
    विविध विशेषणे योग्य जागीच शोभतात व अपेक्षित परिणाम साधतात.
    या अल्पसंतुष्ट असण्याने भाषेच्या सौंदर्यावर मर्यादा येतात.
    हाच आचरटपणा / कोतेपणा गणितातही बोकाळलेला आहे .कसे ते पहा :
    -4 , -(-4) , 7-4 या तीन उदाहरणांमध्ये जी एक आडवी रेषा ( वास्तविक रेषा नसून रेषाखंड ) चिन्ह म्हणून येते तिचा संदर्भानुसार अर्थ बदलतो व त्या अर्थानुसार तिचे वाचन बदलणे संयुक्तिक होय.तथापि सर्वजण ( तथाकथित विद्वानही ) तिचे वाचन वजा ( minus)असे करतात व तसे करण्याने मूळ संकल्पनेपासून फारकत होते व गणित गूढ बनते. वास्तविक अंतर्भूत संकल्पनांचा आदर करण्यासाठी वरील राशींचे वाचन खालीलप्रमाणे करणे आवश्यक आहे :
    ऋण चार ( negative four ), विरुद्ध ऋण चार / ऋण चारचा विरुद्ध ( opposite of negative four ), सात वजा चार ( seven minus four) !!!
    परंतु आम्हाला जिभेचे अति लाड करण्याच्या प्रयत्नात संकल्पनापासूनच दूर जातो.

    ReplyDelete
    Replies
    1. वेगळ्या पद्धतीने चांगले लिहिले आहे. मूलभूत संकल्पनांची स्पष्टता सगळीकडेच आवश्यक आहे.

      Delete
  3. अगदी बरोबर आहे.

    ReplyDelete
  4. सध्या बऱ्याच लोकांना एक ओळ सुद्धा एकाच भाषेत बोलत येत नाही आहे

    ReplyDelete
    Replies
    1. ही दुःखदायक वस्तुस्थिती आहे.

      Delete
  5. मला सुद्धा हे अगोदर वाटायचं की आपण सर सकट विशेषण वापरतो हे कुठेतरी चुकतंय आपल्या लिहिण्याने नेमकेपणा आला. प्रयत्न करू.

    ReplyDelete
    Replies
    1. चांगली सुरूवात होईल. जब जागे वही सवेरा|

      Delete
  6. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात बोकाळलेला इंग्रजीचा प्रभाव कमी करून मातृभाषेला महत्व देणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
    Replies

    1. अहो, ही मंडळी तिथेही , आंग्लभाषेत , हेच उद्योग करतात
      elegant,exquisite, glorious, magnificent , resplendent,
      splendid , pretty, attractive ,cute, stunning, charming,fascinating, superb, perfect ......असे एवढे शब्द कोण लक्षात ठेवणार ?

      वास्तविक यातील प्रत्येक शब्दाचा उद्देश निराळा आहे , उपयोजन निराळे आहे. तथापि या सर्व शब्दांचे , सुधीरजी म्हणतात तसे, सरसकटीकरण करुन beautiful ( सुंदर ) असा शब्द वापरुन मोकळेवहोतात .
      सुरेश देशपांडे

      Delete
  7. समाजाचे एकत्रित प्रयत्न हवेत. आपल्याला शक्य आहे ते आपण करत राहू.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख