काळं काळं मोत्याचं जाळं
"काळं काळं मोत्याचं जाळं ! अरे, सुधीर असं काय करतोस ,अरे आपला रंग पक्का आहे. उन्हामुळे अधिक पक्का होतो." भारतीमावशी मला समजावत होती.
भारतीमावशी दुधाळ ही तशी आमच्या नात्यातील नाही. परंतु आमचे वडील कै. बापू (शिवलिंगशेठ गाडे) यांची तिच्या घरच्यांशी चांगली ओळख होती. मी प्राथमिक शाळेत शिकत होतो तेव्हा ती साखरवाडी येथील सरकारी आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करत असे. आमच्या घराजवळ खोली भाड्याने घेऊन रहात असे. तिचा हसरा, विनोदी, बोलका, स्वभाव परिचितांना लगेच आपलंस करून घेत असे.
मला स्मरतं तसे मी प्राथमिक शाळेत असताना मला माझ्या काळ्या सावळ्या रंगाबद्दल वाईट वाटत असे. कारण माझे दोन्ही भाऊ सचिन आणि संदीप हे रंगाने उजळ आहेत. गंमतीगंमतीत आई मला म्हणत असे की , " तू पोटात असताना मी काळी माती खात होते म्हणून तू काळासावळा झालास." मग मी चिडत असे, बहुधा आरडाओरडाही करत असे की , " तू का काळी माती खाल्लीस?" त्या वयात अनुवांशिकता वगैरे काही समजायची शक्यता नव्हती. पण याच वेळी भारतीमावशी साखरवाडीत आली आणि तिनं मला समजावायला सुरूवात केली, " काळं काळं मोत्याचं जाळं!" केव्हा माझी समजूत पटली हे आता मला निश्चित आठवत नाही. पण भारतीमावशीने एक महत्त्वाचा धडा मला बहुधा तिच्याही नकळत चांगल्याप्रकारे शिकवला होता की जगाने आपल्याला स्वीकारण्यापूर्वी आपण स्वतः स्वतःला स्वीकारलं पाहिजे. हा धडा मला शिकवल्याबद्दल मी भारतीमावशीचा आजन्म ऋणी राहीन. आयुष्याच्या आतापर्यंतच्या अनुभवाने मला शिकवलं आहे की ' देखणं दिसण्यापेक्षा देखणं असणं महत्त्वाचं असतं.' हे देखणेपण कशात असतं हे कविवर्य बा.भ.बोरकर यांनी उत्तमप्रकारे सांगितले आहे.
' देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे,
सावळे की गोमटे त्या मोल नाही फारसे,
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे,
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती,
वाळवंटातून जाता स्वस्तिपद्मे रेखिती'
दुर्दैवाने भारतात माणसांचा जो रंग जास्त प्रमाणात आढळतो त्या काळ्यासावळ्या रंगाबद्दल बऱ्याच लोकांना साधारणपणे अजूनही न्यूनगंड आढळतो. याचा फायदा घेत व्यापारी कंपन्यांनी प्रचंड पैसा आजपर्यंत मिळवला आहे. अजूनही मिळवत राहतील असे वाटते. माझ्या एका मित्राचा रंग माझ्यापेक्षाही गडद होता. त्याला मी म्हणायचो की ," मी सावळा आहे आणि तू काळा आहेस." तो रागावून म्हणायचा, " ज्यांच्या केसांचा आणि कातडीचा रंग सारखाच गडद असतो ते काळे असतात. मी काळा नाही, सावळा आहे!" त्याने बहुधा स्वतःचा रंग स्वीकारला नव्हता.
मध्यंतरी अभिनेता आयुष्मान खुराणा याचा 'बाला' हा चित्रपट येऊन गेला. त्यात अकाली टक्कल पडलेल्या तरूणाची गोष्ट सांगतासांगता समाजाच्या गोरेपणाच्या वेडावरही हसतखेळत भाष्य केले आहे.
आता मात्र मला समजले आहे,
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
सुधीर गाडे, पुणे
Neat and clear writing. Must be read by students it is confidence building lesson.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुरेख लेखन..सर तुम्ही या सगळ्या लेखाचं एक पुस्तक प्रकाशित करा..
ReplyDeleteधन्यवाद सर.
Deleteसध्या ब्लॉगवरच हे लेखन एकत्र करतो आहे.
सुरेख लेखन . भारती मावशीची व्यक्ती रेखा समोर उभी राहते. तुमच्या सर्व लेखांन मधील लेखन सुरेखच आहे.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान मांडणी सर, सुरेख
ReplyDeleteधन्यवाद सर
Delete