वय म्हणजे फक्त एक अंक
" गेल्या वर्षी (२०२१ मध्ये) कोरोनाने गंभीर आजारी होतो. पुष्कळ पैसे आहेत. परंतु त्यावेळी आवश्यक वाटलेले रेमडेसिविर हे इंजेक्शन मिळवताना लक्षात आले की पैसे असून फार काही उपयोग नाही." ज्येष्ठ उद्योजक श्री. किशोर देसाई सांगत होते.
( श्री.किशोर देसाई, छायाचित्र इंटरनेटवरून)
पंप्सच्या व्यवसायात जगभर आपला ठसा उमटवणाऱ्या श्री.देसाई यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली. वय वर्षे ६५. काही वर्षांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्यावर्षी कोविडच्या आजारातून वाचले. बरे झाल्यावर त्यांनी पुणे महानगरपालिकेला लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभा करण्यासाठी खूप मदत केली. याशिवाय वेगवेगळ्या कल्पनांवर, उद्योजकता विकास, सामाजिक प्रश्न यावर काम करण्याच्या वेगवेगळ्या कल्पना त्यांनी सांगितल्या. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत.
( श्रीमती अपर्णा डोंगरे, छायाचित्र प्रशांत डोंगरे)
श्रीमती अपर्णा डोंगरे काकू. सध्या वय वर्षे ७२. १९९०-९४ या काळात आम्ही साताऱ्यात शिकत असताना मायेने आम्हा सर्व मित्रांकडे लक्ष देणाऱ्या, वेळोवेळी रुचकर असे पदार्थ आग्रहाने खाऊ घालणाऱ्या डोंगरेकाकू गेली दोन वर्षे टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्राच्यविद्याशास्त्र या विषयात एम.ए. करत होत्या. अचानक कोविडचे संकट ठाकले आणि शिक्षण ऑनलाइन झाले. आपल्या नातवंडांकडून, मुलगा-सून यांच्याकडून शिकून ऑनलाईन शिक्षणाच्या तंत्राशी त्यांनी जुळवून घेतले. या वर्षी त्या उत्तीर्ण झाल्या. एका विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला.
( श्री.वसंत ठकार, छायाचित्र इंटरनेटवरून)
श्री.वसंत ठकार हे पुण्यामध्ये 'सावली' नावाची संस्था विशेष मुलामुलींसाठी (मतिमंद आणि बहुविकलांग) चालवतात. स्वत:च्या मुलीचा सांभाळ करताकरता जवळपास पन्नास-शंभर मुला-मुलींच्या सांभाळण्याची व्यवस्था त्यांनी उभी केली आहे. शासनाकडून एक रुपयाही अनुदान न घेता स्वतः मिळवलेल्या पैशातून तसेच देणग्यांतून ते ही संस्था गेली अनेक दशके चांगल्यारीतीने चालवत आहेत. मध्यंतरी त्यांची भेट झाली त्यावेळी ते म्हणाले, " सध्या माझे वय ८५ वर्षे आहे. मी तीन दिवसात कोविड संपवला. तुम्ही कसे काय आजारी पडू शकता?"
अशा जेष्ठ व्यक्ती बघितल्यानंतर वाटते की 'वय म्हणजे फक्त एक अंक' .
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment