मृत्यू एक वळण

 ( २२/०२/१९९५ यादिवशी रात्री १०:३० वाजता लिहिलेले स्फुट)



   घाटातून प्रवास करत असताना एखादं वळण असं येतं की त्या वळणापर्यंत पोचेतो त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही आणि वळणापाशी पोचल्यावर पुढचा असा रस्ता दिसतो ज्याची आधी कल्पनाही केलेली नसते. त्या वळणशी पोचेतोपर्यंत तेथे पोचायचे एवढेच एक ध्येय असतं. तिथं पोचल्यानंतर पुढे काय? पण या वळणाशी थांबायचं हे नसतंच कारण आयुष्याचा प्रवाह सदैव पुढं पुढं जात असतो. इच्छा असो अथवा नसो. 

     कल्पना थोडी लांबवली तर ती मृत्यूलाही लागू पडेल. मरणाच्या दारात पोचेतोपर्यंतच काय करायचं ते नियोजन. तिथं पोचल्यानंतर मग काय? माग उरलेला रस्ता नि त्याच्यावरचे पुढं जाणारे सहप्रवासी. पण घाटातलं वळण जसं निश्चित सांगता येईल तसं मृत्यूचं सांगता येईल का? आणि जर समजा सांगता आलं तर त्या वळणापर्यंतचा प्रवास न घाबरता धीरानं पार पाडता येईल का? विचार तसा डोक्याला चालना देणारा आहे. रोजच्या आयुष्यात आपण इतक्या बारीक-सारीक गोष्टींची चिंता करण्यात आणि त्या घडल्या नाहीत 'तर काय ?' असा विचार करण्यात वेळ घालवतो. पण असं करताना त्या अंतिम सत्याचं विस्मरण करतो. बरंचसं नकळत नि थोडसं जाणूनबुजून कारण त्या सत्याची म्हणजेच मृत्यूची कल्पनाच अशी आहे कि जिथे विचाररथाचे घोडे थबकतात,  कल्पनाशक्तीचा लगाम सैल सुटतो नि भयाने डोळे विस्फारले जातात. का? असं का व्हावं? कदाचित आयुष्यात आपल्याला काय साधायचं आहे नि त्यासाठी काय त्यागायचं आहे याचा विचार मनाशी पक्का नसतो. त्यामुळं मरण जेव्हा समोर उभं रहातं तेव्हा आयुष्याचा पट झरकन डोळ्यापुढे फिरतो नि काय करायचं राहिलं? काय गमावलं याचाच विचार मनाला अधिक त्रस्त करत असावा! हो असावाच. कारण मृत्यूसमयी काय वाटतं हे परतून अजून कुणी सांगितलंय? आणि समजा एखाद्यानं सांगितलं तर ते प्रत्येकाला तेवढ्या तीव्रतेने जाणवेल का? त्याच्या कल्पनेला पटेल का?

    हे सगळं लिहायला सोपं आहे. परंतु मृत्यू समोर ठाकला तर निर्भयपणे त्याच्यापेक्षा तृप्त मनानं त्याला सामोर जाता यायला हवं. मन तृप्त व्हायचं असेल तर ते नक्की कशाच्या शोधात आहे याचा विचार पक्का हवा आणि याला समर्थ कृतीचीही जोड हवी. तरच मग सुखानं म्हणता येईल 'आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा'.


(तरुणवयातच असाध्य आजारामुळे लवकरच मृत्यू येणार हे समजलेल्या डॉक्टरच्या प्रतिसादावर आधारित मला आवडलेला तेलगू चित्रपट कलाकार सिद्धार्थ नारायण

https://youtu.be/9KB3DompHn4 )

सुधीर गाडे पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख