जवळचे संबंध

             (२/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)

       ' एखादी गोष्ट तुमची आहे की नाही याची खात्री करायची असेल तर ती सोडून द्या. ती जर परत आली तर ती तुमची आहे. ती


जर परत आली नाही तर ती तुमची कधीच नव्हती.' माणसांच्या बाबतीतही ही गोष्ट सहजच लागू पडेल. पण माणसांशी संबंध जोडत असताना आपले संबंध नक्की किती जवळ आले आहेत याचा अंदाज येतो अवघड आहे. आपण एखाद्याला आपल्या जवळचा समजून काही गोष्ट विचारली तर त्याचं उत्तर येत नाही. मग आपल्या लक्षात येतं ' अरेच्चा आपण समजत होतो इतके काही आपले संबंध जवळचे नाहीत तर.' मग असलेला दुरावा जास्तच जाणवू लागतो आणि त्या व्यक्तिशी आपल्याला जवळचे संबंध ठेवायचे असतील तर जास्तच बोचू लागतो.



     (९/०५/२०२२ रोजी लिहिलेले स्फुट)

       साधारणपणे माणसाला समूहाने रहायला आवडते. त्यामुळे शेजारीपाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी अशा वेगवेगळ्या समूहात माणूस रमतो. असे समूह भावना, मदत , विचार यांच्या देवाणघेवाणीतून तयार होतात. परस्पर सहकार्य करत असताना त्यातून बरेच वेळा निरपेक्ष प्रेम विकसित होते. आपल्या जवळच्या व्यक्तिला चांगले वाटावे, तिला आवडते केवळ यांसारख्या कारणांमुळे अनेक गोष्टी माणूस करू लागतो. यातून हा परस्परातील स्नेहभाव अधिकाधिक बळकट होत जातो. हा स्नेहभाव प्रसंगी रक्ताची नाती, सोयरसंबंध यापेक्षा बळकट होत जातो. यातून तयार होते ती जवळचे संबंध असल्याची भावना! 

       माणसाचे नातेसंबंध काही वेळा गुंतागुंतीचे होत जातात. जवळकीचे संबंध कधीकधी जाचक वाटू लागतात. प्रेमाचा अधिकार कधीकधी दबाव वाटू लागतो. एकमेकांच्या अति जवळिकीने काही माणसांना आपल्या स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे असे वाटू लागते. मग यातून हळूहळू दुरावा वाढू लागतो. काही निमित्ताने हा दुरावा आणखीनच वाढतो आणि मग आता संबंध तेवढे जवळचे राहिले नाहीत याची कधीतरी जाणीव होते. मग या दुराव्यात आणखी भर पडते. अशावेळी बरेचदा अहंकार फणा काढतो. मग बरेचदा वाटू लागते की मीच का सारखा पुढाकार घ्यायचा, मीच का सारखी तडजोड करायची. 

      अजून एक गोष्ट दिसते. ती म्हणजे कोणाला तरी गृहित धरले जाते. कदाचित त्या व्यक्तिला काही वेगळे मत असू शकेल, त्या व्यक्तिशी एकदा बोलून काही ठरवायला पाहिजे हे लक्षात येतं नाही किंवा लक्षात घेतले जात नाही. अशावेळी ज्या व्यक्तिला सतत गृहित धरले जाते ती व्यक्ती सुरूवातीला आपली नाराजी व्यक्त करते. पण समजा अशा नाराजीला नजरेआड केले तर मग संबंध अजून बिघडत जातात. 

     अशा बिघडणाऱ्या संबंधांची लक्षणे ध्यानात घेतली नाहीत तर साचलेल्या भावनांचा स्फोट होतो आणि संबंध तुटतात. अशा रीतीने तुटलेले संबंध बऱ्याचदा परत जुळत नाहीत. जे संबंध परत जुळतात त्यात आधीची तीव्रता राहत नाही. 

     अशा प्रकारची ताटातूट टाळायची असेल तर परस्पर संबंध हे दोन्ही बाजूंनी सारख्याच जवळिकीचे आहेत ना, परस्पर सन्मानाच्या नात्यावर आधारलेले आहेत ना, परस्परांशी होणाऱ्या संवादात दोघांचाही समान सहभाग आहे ना, कोणालाही वारंवार गृहित धरले जात नाही ना, जवळिकीमुळे कुणाला आपल्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असे वाटत नाही ना हे काळजीपूर्वक लक्षात घेऊन वागणूक ठेवली पाहिजे. मग जवळचे संबंध जवळचे राहू शकतील.


सुधीर गाडे, पुणे

Comments

  1. खूप छान..नात्याची गरज ही दोन्ही बाजूने सारखीच असायला हवी.नात्यात आपुलकी आणि आदर असेल तर ते नाते चिरंतन टिकते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख