वाट
(८/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)
'वाट पहाणं ' हे एक परीक्षा बघणारे काम आहे. कशाच्यातरी वाटेकडे डोळे लागले असतील हातात असलेलं काम नीट पार पडत नाही. मन कावरंबावरं होऊन जातं नि काय करू आणि काय नको असं होऊन जातं. वाट पहाता पहाता बराच काळ निघून जातो नि बहुधा शेवटी थोडक्यासाठी धीर सुटतो आणि घोटाळा होतो.
'वाट चालणं' हे तर माणसाच्या पाचवीला पुजलेलं आहे.कधी कधी वाट चालता आडवाटेचा मोह पडतो नि माणूस राजरस्ता सोडून जंगलात भटकतो. बहुधा आडवाटा माणसाच्या संयमाचा कस पाहतात. तो थोडा जरी सुटला तरी त्या माणसाला रानभैरी करून टाकतात. त्यामुळं वाट चालताना ती ' वाट बिकट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको' असा चपखल उपदेश ध्यानात ठेवायला हवा. भले थोडा उशीर झाला तरी चालेल पण मुक्कामावर पोचण्याची तर खात्री आहे.
( १३/०५/२०२२ रोजी लिहिलेले स्फुट)
' वाट लावणे ' हा शब्द प्रयोग आता बऱ्यापैकी सर्वपरिचित आहे. काही जण स्वत:च्या वागण्याने स्वतःची वाट लावतात. तर काही जण शत्रुत्व, असूया, आकस यामुळे दुसऱ्याची वाट लावण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्याची वाट लावण्यात काही लोक लोक यशस्वीदेखील होतात. तर काहीजण मात्र दुसऱ्याची वाट लावण्याच्या प्रयत्नात स्वतःचीच वाट लावून घेतात.
आयुष्यातील नाक्यावर 'वाट निवडणं' अतिशय महत्त्वाचं असतं. कोणती वाट निवडली जाते यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. बरेचजण रूळलेली वाट निवडतात आणि त्यांच्या आयुष्यात ठराविक टप्पे येत जातात. बऱ्यापैकी अपेक्षित गोष्टी घडत जातात. पण काहीजण वेगळी वाट निवडतात. तिथून पुढे सुरू होतो तो एक प्रकारचा अनिश्चित प्रवास. या वाटेवर काही जण अधेमधे धीर सोडून देतात आणि मग पुढे रूळलेल्या वाटेवर परत येतात. पुन्हा मग अपेक्षित टप्पे. जे वेगळ्या वाटेने तसेच पुढे जात राहतात त्यांच्यापैकी काही जणांना व्यावहारिक अर्थाने अपयश येतं आणि ते अयशस्वी समजले जातात. पण काहीजण मात्र यशाला गवसणी घालतात. स्वतःची वेगळी वाट ते ठळक करतात. अशा तऱ्हेने यशस्वी झालेले माणसांनी घेतलेल्या वाटेवर मग अनेकजण चालू लागतात आणि आतापर्यंत कमी रूळलेली वाट चांगली रूळते. अशा वेगळ्या वाटांवरचा प्रवास हा स्मरणीय होतो.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment