संमिश्र लेखन

 (९/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)

    परिस्थिती बदलायला किती वेळ लागतो? कधी कधी तर काही क्षणात ती इतकी बदलते की थोडा वेळ काही सुचत नाही. आणि सुचलं तर नीट जमत नाही. पण कधी कधी परिस्थिती बदलायला इतका वेळ लागतो की छोट्या छोट्या बदलांसाठीसुद्धा खूप वाट पहावी लागते. वाट‌ पहाता पहाता जेव्हा परिस्थिती खरीच बदलते तेव्हा मात्र तोपर्यंत रचलेले मनाचे मनोरे ढासळतात. हे मनोरे इतके रचले गेलेले असतात की कल्पनेच्या भरारीने भविष्यातला रस‌ इतका शोषून घेतला असतो की वर्तमानात आल्यावर तो चोथ्यासारखा भासतो.


(११/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)

     माणसाची विचारसरणी किती मर्यादित असते. ती बनते कशी? माणूस ज्या परिस्थितीत वावरतो त्यावरून त्याच्या विचारसरणीची मर्यादा ठरते. परिस्थिती व्यक्तिगत स्वरूपाची तर असतेच. त्यामुळे विचारसरणीला व्यक्तिगत दृष्टिकोन मिळतो. पण माणूस जर राष्ट्रीय/बौद्धिक पातळीवर जगत असेल तर विचारसरणी सुद्धा तशीच होणार.


(११/७/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)

    सवय नेमकी कशाची होईल काही सांगता येत नाही. तशी सवय कशाचीही होऊ शकते. एखादी अप्रिय व्यक्ती बरोबर असण्याचीही सवय होते नि प्रिय व्यक्ती दूर गेल्याचीही सवय होते. एखादी आवश्यक गोष्ट न मिळण्याचीही सवय होते आणि एखादी अनावश्यक गोष्ट सतत मिळण्याची सुद्धा सवय होते. त्यामुळं ' मला सवय नाही हो त्याची' हे पालुपद काही दिवसच टिकतं आणि ' आता सवय झालीये सगळ्याची' हे नवीन पालुपद सुरु होतं. त्यामुळे कोणत्याही सवयीची सवय होणं हीच माणसाची सवय आहे.


 (१२/७/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)

    संताप हा हा वणव्यासारखा असतो. जे काही समोर येईल त्याला जाळत सुटतो. मग हे ओलं आहे की सुकं आहे याचा काहीसुद्धा विचार करत नाही. जोरदार बरसणाऱ्या पावसात गरीबाची झोपडी वा श्रीमंताचा वाडा यांच्यात कोणताही भेदभाव न करता बरसतात. त्याप्रमाणे संतापाच्या भरात तो समोर येईल त्याच्यावर बरसतो.

(१३/२/२०१२ रोजी लिहिलेले स्फुट) 

चालताना रस्ता ओलांडण्याची वेळ बरेच वेळा येते. हा रस्ता ओलांडत असताना सखेसोबती बरोबर असतात. रस्त्यापर्यंत पोचेतोपर्यंत सगळे बरोबरच. पण एखादे वेळी रस्ता ओलांडताना एखादा पुढे जातो तर कुणी मागे राहतो. मग पुढे गेलेल्या व्यक्तीला इतरांची वाट पाहात थांबावे लागते किंवा मागे पडलेल्या तिला लगबग करून सर्वांच्या बरोबर यावे लागते. आयुष्याच्या प्रवासातदेखील कधी कधी असं होतं. आता आतापर्यंत बरोबर असणाऱ्यात कुणी पुढं जातं तर कुणी मागं राहतं. आयुष्याच्या गतिमान प्रवाहात थांबायला वेळ आणि कदाचित धीरही नसतो. त्यामुळे पुढे गेलेला अधिक पुढे जातो. मागे पडलेला अधिकच मागे राहतो. भेट झाली तर होते ती कुणीतरी थांबल्यावरच!

सुधीर गाडे,  पुणे




.

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख