बदललेल्या पद्धती

          नुकताच एका कार्यक्रमात सहभागी झालो. कार्यक्रमातील व्यक्तीचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थितांपैकी बऱ्याच जणांनी पुष्पगुच्छ आणले होते. बोलताना सहज लक्षात आले की पूर्वी एखाद्याचे अभिनंदन करायचे असेल तर पुष्पहार घालून अभिनंदन केले जायचे. आता मात्र बहुतेक सगळ्या ठिकाणी पुष्पगुच्छ हाच दिला जातो. अपवादानेच एखाद्या ठिकाणी पुष्प हार घातला जातो. या बाबतीतली समाजातील पद्धत आता बदलली आहे.

   


          मध्यंतरी एक संदेश आला, ' संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!' त्यावेळी देखील मनात आले पूर्वी साधारणपणे दिवाळीला नववर्षाला शुभेच्छा देण्याची पद्धत होती. आता होळी, एकादशी , जयंती, जन्मदिन, विशेषदिन अशा सर्व प्रसंगी शुभेच्छा देण्याची पद्धत पडली आहे. मी विचार करू लागलो की असे का झाले असेल. तर यात व्यापारी कंपन्यांचा त्यांच्या जाहिरातीचा मोठा परिणाम असावा असे वाटते. आपल्या उत्पादनांचा खप वाढावा ती जास्त वापरली जावीत या उद्देशाने अशा प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये रुजवल्या गेल्या आहेत. 

        अशीच एक पद्धत एका दैनिकाच्या संपादकांच्या कल्पनेने आता चांगली रूढ झाली आहे. ती म्हणजे देवीच्या नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसण्याची. महिलावर्गात अजूनही मोठ्या प्रमाणात साडीचे आकर्षण असल्यामुळे याला भरभरून प्रतिसाद मिळतो. आता तर अनेक दैनिके आपापले वेगळे रंग जाहीर करत असतात आणि त्याला महिला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. अर्थातच त्या त्या दैनिकात त्याची प्रसिद्धीदेखील केली जाते त्याचे देखील आकर्षण असते.

         अजून एक पद्धत बदलली आहे ती म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्याची. साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी लहान मुलांचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धत होती. पण आता सर्व वयोगटातील वाढदिवस साजरे होत असतात. तसेच विवाहितांच्या लग्नाचे वाढदिवस देखील साजरे होत असतात. अगदी ज्येष्ठ मंडळींना देखील केक कापणे हा वाढदिवसाचा अनिवार्य भाग आता वाटू लागला आहे. काही ठिकाणी औक्षण करणे यामध्ये केक कापण्याची भर पडली आहे. पण एकुणात अशा कोणत्याही प्रसंगी केक ही आवश्यक गोष्ट आता मानली जाते. माझ्या आमच्या एका मित्राने त्याच्या मुली लहान असताना त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला त्यावेळी त्याने आपल्या मुलींना व्यवस्थित समजावून सांगितले आणि औक्षण करून वाढदिवस साजरा केला. 

     या केक कापणे प्रकारात तरुण मुला-मुलींनी अजून एक भर घातली आहे. ती म्हणजे केक खाण्याऐवजी तो तोंडाला फासणे. ही पद्धत युवा वर्गात मोठ्या प्रमाणात दिसते. बहुधा त्यांना फेस वॉशपेक्षा केक चांगला असे वाटते की काय कोण जाणे. ज्या प्राचीन संस्कृतीत अण्णा अन्न हे पूर्ण ब्रम्ह मानले गेले आहे त्या संस्कृतीच्या वारसदारांचे असे वागणे मनाला दुःख देऊन जाते.

       पूर्वी भेटल्यावर एकमेकांना 'राम राम' म्हणायची पद्धत होती.  विशेषतः ग्रामीण भागामध्ये तर ही पद्धत अगदी सर्रास होती. परंतु आता याची जागा मोठ्या प्रमाणावर गुड मॉर्निंग,  गुड आफ्टरनूनने घेतली आहे आणि समाज माध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांना गुड मॉर्निंग गुड नाईट याचे संदेश पाठवत असतात. ( एखाद्याने मला गुड मॉर्निंग म्हटले की शक्यतो गुड मॉर्निंग आणि नमस्ते देखील म्हणतो.)

    पोषाखाबाबतही असे झाले आहे. आपला पोषाख आता पाश्चात्य पद्धतीचा झाला आहे. याबाबत स्वामी विवेकानंद यांचा एक प्रसंग वाचल होता. ते आपल्या एका मित्राला घरी भेटायला गेले तेव्हा तो पाश्चात्य पद्धतीच्या पोषाखात बसला होता. त्यावेळी विषय निघाल्यावर तो म्हणाला कामावर असताना नाईलाजाने असा पोषाख घालावा लागतो. तेव्हा स्वामीजी म्हणाले की घरी असताना तरी आपल्या पद्धतीचा पोषाख घालता येईल ना? सध्या सण, वार, मंगल प्रसंगीदेखील भारतीय पद्धतीचा पोषाख घातलेला आढळत नाही. विशेषतः पुरुषांच्या बाबतीत असे जास्त प्रकर्षाने जाणवते. आपण ठरवू शकतो की अशा मंगल प्रसंगी आपण भारतीय पद्धतीचा पोषाख घालू शकतो.

     असाच एक बदल लक्षात येतो तो म्हणजे हस्तांदोलन करण्याचा. हस्तांदोलन केले नाही तर काहीतरी कमतरता राहिली आहे असे बहुधा वाटत असावे. भारतीय पद्धतीने हात जोडून नमस्कार केला तर काही जणांना त्याबाबत अवघडल्यासारखे वाटते. 

        समाजजीवन हे प्रवाही असते. त्यात काळाबरोबर काही ना काही बदल होत असतात. परंतु असे होणारे बदल , त्यांचे नेमके काय परिणाम होत आहेत, ते समाजाची परंपरा, प्रकृती यांना किती साजेसे आहेत याचा विचार होत राहणे आवश्यक आहे असे वाटते.

सुधीर गाडे, पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख