मएसोची १६१ वर्षांची उज्वल परंपरा - भावे प्राथमिक शाळा १२५
संपूर्णपणे भारतीयांनी सुरू केलेली आणि आजही वर्धिष्णू असलेली अशा दोन विशेषणांनी वर्णन केले तर बहुधा भारतातील सर्वात जुनी शिक्षण संस्था ठरेल ती म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही होय. भारतीयांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी पहिलाच संघटित संघर्ष केला सन १८५७ मध्ये. त्यानंतर ३ वर्षांनी सन १८६० मध्ये महागावकर्स इंग्लिश क्लासेस या नावाने सुरू झालेल्या ज्ञानयज्ञाची आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या द्रष्ट्या त्रयींनी पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या नावाने संस्थारूपात स्थापना केली. ब्रिटिशांना सशस्त्र संघर्षाद्वारे उखडून टाकण्याच्या प्रयत्नात सहभागी झालेल्या वासुदेव बळवंत फडके यांनी थोड्याच वर्षांत संस्थेपासून वेगळे होत आपला स्वतंत्र मार्ग निवडला. परंतु भावे आणि इंदापूरकर या दोघांनी एकत्रितपणे अथक प्रयत्न करत या ज्ञानयज्ञाची ज्वाला प्रज्वलित ठेवली.
कालसुसंगत आधुनिक विद्या देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या आणि राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षण देण्याचा वारसा जोपासणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपल्या वाटचालीचा १६१ वर्षांचा टप्पा पार केला आहे. केवळ ब्रिटिशच चांगले शिक्षण देऊ शकतात या तत्कालीन गैरसमजुतीला आव्हान देत स्थापन झालेल्या मएसोने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा आजदेखील अविरत चालवली आहे. १६१ वर्षांच्या दीर्घ प्रवासात अनेक चढउतारांना, आव्हानांना समर्थपणे तोंड देत मएसोची वाटचाल अथकपणे सुरू आहे.
सुरूवातीला खाजगी असलेली संस्था १८८७ मध्ये सार्वजनिक झाली आणि तिची नोंदणी करण्यात आली. तोपर्यंत संस्थेने पुणे शहरात आपला चांगला नावलौकिक मिळवला होता. आजच्या परिभाषेत माध्यमिक शिक्षण देणाऱ्या संस्थेने १८९५ मध्ये महाराष्ट्र कॉलेज या नावाने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण केले. परंतु या महाविद्यालयातील प्राध्यापक शिवराम महादेव परांजपे आणि अच्युत बळवंत साठे यांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे केल्याने हे महाविद्यालय ब्रिटिशांच्या रोषाला पात्र ठरले आणि केवळ तीनच वर्षांत बंद पडले. याच महाराष्ट्र कॉलेजच्या नावाची स्मृती जपण्यासाठी १९२२ मध्ये संस्थेचे 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी' असे नामकरण करण्यात आले.
महाराष्ट्र कॉलेजच्या काळातच १८९६ मध्ये संस्थेने आजच्या परिभाषेतील प्राथमिक शिक्षण देण्यासाठी शाळेची सुरुवात केली. मएसोचा म्हणजे तत्कालीन पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशनचा बोलबाला पाहून केशव पांडुरंग गोडबोले यांनी सिटी स्कूल नावाने प्रसिद्ध असलेली व धोंडो अनंत क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेली शाळा सर्व मालकी हक्कांसह वामन भावे यांच्याकडे सोपविली. पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ब्रॅंच मराठी शाळा असे नाव तिला देण्यात आले. या शाळेचेच १९३१ मध्ये संस्थापकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'भावे प्राथमिक शाळा' असे नामकरण करण्यात आले.
या मराठी शाळेच्या सुरूवातीनंतर मएसोने पुणे शहरात रविवार पेठ, कसबा पेठ, नारायण पेठ, तुळशीबाग अशा विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने जुन्या शाळा ताब्यात घेणे, नवी शाळा सुरू करणे या मार्गांनी आपला विस्तार केला. कर्जत, जेजुरी या गावी सुरू झालेल्या शाळांच्या रूपाने मएसोचा पुणे शहराबाहेर विस्तार सुरू झाला. परंतु काळाच्या आलेल्या ओघात विविध अडचणी, कारणे यामुळे हे सर्व प्रयत्न मएसोला सोडून द्यावे लागले.
पण मएसोचे अन्य ठिकाणचे प्रयत्न स्थिरावले आणि वाढतच गेले. या सुरूवातीच्या प्रयत्नांमध्ये १९०६ मध्ये सुरू झालेली सासवड येथील शाळा ( आताचे मएसो वाघिरे विद्यालय) आणि १९११ मध्ये बारामती येथे सुरू झालेली शाळा (आताचे मएसोचे कै.ग.भि.देशपांडे विद्यालय) यांचा उल्लेख करावा लागेल. क्रमाक्रमाने विविध शाखांच्या माध्यमातून संस्थेचा विस्तार होत गेला. यामध्ये बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता(१९२२), पुणे, मुलींचे भावे स्कूल ( आताचे मएसो रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल १९३५), मएसो डेक्कन जिमखाना भावे स्कूल( आताचे मएसो सौ.विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय १९३६), मएसो आर्टस अॅंड सायन्स कॉलेज ( आताचे मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय १९४५), मएसो कॉलेज ऑफ कॉमर्स ( आताचे मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स १९६७), मएसो बाल विकास मंदिर (१९८५), मएसो बालक मंदिर ( आताचे मएसो सौ.नि.ह.देशपांडे विद्यालय, १९८६) अशा शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणातील अनुदानित शाखांची भर पडली. शिक्षण क्षेत्रात १०+२ चा आकृतीबंध स्वीकारला गेला त्या टप्प्यावर १९७५ ते १९७७ याकाळात मएसोच्या पुणे, सासवड, बारामती येथील एकूण ७ शाखांमध्ये +२ या स्तराचे शिक्षण देण्यास सुरूवात झाली. या शाखांनी मएसोच्या परंपरेची जोपासना करत स्वतःचा नावलौकिक मिळवला आहे.
काळ बदलत असतो तसतशा जनमानसातील संकल्पना, विचार बदलत बदलत असतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची लोकप्रियता वाढू लागली. तसेच सरकारने विना अनुदान तत्वावर शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले. या बदलाला प्रतिसाद देत संस्थेने मएसो बाल शिक्षण मंदिर, इंग्रजी माध्यम (१९७९), मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (१९८३), मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ (१९९६), मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, पिरंगुट (१९९७ ) ही महाराष्ट्रातील मुलींची पहिली सैनिकी शाळा, मएसो ज्ञानमंदिर, कळंबोली (१९९७), मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल (१९९७), मएसो विद्या मंदिर, बेलापूर (२०००) , मएसो दा.शं.रेणावीकर विद्यालय, अहमदनगर आणि मएसो रेणावीकर माध्यमिक विद्यालय, अहमदनगर या शाळांचे हस्तांतरण (२००५), मएसो परशुराम रूग्णालय, लोटे घाणेखुंट, चिपळूण (२००७), मएसो स्कूल ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस, लोटे घाणेखुंट, चिपळूण (२००९), मएसो आयुर्वेद महाविद्यालय, लोटे घाणेखुंट चिपळूण (२०१०), मएसो कॉलेज ऑफ नर्सिंग, लोटे घाणेखुंट चिपळूण (२०१०), मएसो कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय (२०१२), मएसो पब्लिक स्कूल, कळंबोली (२०१५), मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती ( आजचे मएसो ह.ग.देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल , बारामती २०१४), तसेच बेलापूर, अहमदनगर येथे शाळांना जोडून कनिष्ठ महाविद्यालये (२०१५), मएसो प्री प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड (२०१६), मएसो आय.एम.सी.सी. एम.बी.ए.कॉलेज(२०१९), मएसो कॉलेज ऑफ परर्फार्मिंग आर्ट्स (२०१९), मएसो सिनिअर कॉलेज (२०१९) या शाखांचा प्रारंभ केला. या शाखा आता स्थिरावल्या असून आपापला लौकिक वाढवत आहेत.
पारंपरिक शिक्षणासोबतच मएसोने शिक्षणाचा सर्वांगीण विचार करत विद्यार्थीवर्गाच्या विकासासाठी नेहमी विचार आणि कृती करत असते. याचे प्रत्यंतर मएसोच्या विविध वैशिष्ट्यपूर्ण शाखांमधून येते. मएसोच्या सर्वांगीण विचारातूनच सुरू झालेल्या विविध शाखा म्हणजे मएसो रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस (१९८८), मएसो शक्ती जिम्नॅशियम (१९९६), मएसो शिक्षण प्रबोधिनी (२०००), संस्थेचे संस्थापक वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या पत्नीला बंदूक चालवण्याचे शिक्षण दिले होते हे लक्षात ठेवून सुरू करण्यात आलेली मएसो शूटिंग रेंज (२००६), मएसो व्यक्तिमत्त्व विकास केंद्र (२००७), मएसो सरस्वती निवास(मुलींचे वसतिगृह २००७) मएसो क्रीडावर्धिनी (२००७), मएसो कम्युनिटी कॉलेज (२००९), मएसो बालभवन (२०१८), मएसो कलावर्धिनी (२०१९) या आहेत. या शाखांच्या माध्यमातून मएसोचे विविधांगी कार्य चालू आहे.
मएसो मातृभाषेतून शिक्षण, महिला सबलीकरण, उद्योजकता विकास, पर्यावरण, आरोग्य, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात निरंतर कार्यरत आहे. या प्रदीर्घ वाटचालीत संस्थेच्या वेगवेगळ्या काळात असलेल्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या विकासासाठी खडतर परीश्रम केलेले आहेत. संस्थेचे कार्य पुढे नेण्यासाठी या सर्वांनी तनमनधनपूर्वक आपले योगदान दिले आहे. संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, प्राध्यापकांनी आपल्या तळमळीने शिक्षकी पेशाचा सन्मान वाढवला आहे. यातूनच संस्थेला लाभली आहे देदीप्यमान अशी विद्यार्थी वर्गाची मालिका. या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या कर्तृत्वाने स्थानिक पातळीपासून ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रात नावाचा ठसा उमटवला आहे. याचा संस्थेला निश्चितच आनंद आणि अभिमान आहे.
संस्थेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीची सरकार आणि समाजाने यथोचित दखल घेतली आहे. यातूनच मएसोला राज्य सरकारचा समाजभूषण पुरस्कार (२०१५), त्रिदल पुणे संस्थेचा 'पक्के पुणेकर' पुरस्कार (२०१८) यासारखे पुरस्कार मिळाले आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने संस्थेच्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय(२०१२-१३) , मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (२०१३-१४) या दोन्ही महाविद्यालयांना सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला आहे. मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेला महाराष्ट्र राज्य सरकारचा आदिवासी सेवा संस्था पुरस्कार (२०१६) प्राप्त झाला आहे. अशा पुरस्कारांनी संस्थेच्या सर्व घटकांचा उत्साह दुणावला आहे आणि या ज्ञानयज्ञाच्या कार्यात सतत कार्यमग्न राहण्याची प्रेरणा पुन्हा एकदा दृढ झाली आहे.
उच्च शिक्षणात आता महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता देण्याचे धोरण स्वीकारले गेले आहे. संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय यांना २०२१-२२ पासून विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने शैक्षणिक स्वायत्तता देण्यात आली आहे. आता या दोन्ही महाविद्यालयांना शैक्षणिक क्षेत्रातील नवे प्रयोग अधिक मोकळेपणाने करता येतील.
१८९६ मध्ये सुरू झालेल्या भावे प्राथमिक शाळने आपल्या वाटचालीचे रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, अमृतमहोत्सव, शतकमहोत्सव असे टप्पे पार करत शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील वाटचाल पूर्ण केली आहे. या शाळेच्या वाटचालीत सदाशिव रामचंद्र गाडगीळ, वि.ना.उमराणी, वा.शि.ठोसर, ल.ना.भावे, वि.के.खासनीस, वि.दी.जोगळेकर, ग.वा.पेंडसे, वा.प.दातार, पं.वि.चिंचोरे, सौ.विद्यादेवी काणे, सौ.शालिनी मोकाशी, सौ.शैलजा लिमये, सौ.उज्वला गायकवाड, सौ.अलका जोशी हे माजी मुख्याध्यापक - मुख्याध्यापिका आणि सध्याचे मुख्याध्यापक श्री. अनिल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिकशिक्षिकांनी शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा सातत्याने चालू ठेवली आहे. पूर्वी इ.४ थी च्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा होत असे. त्यावेळी चढत्या श्रेणीने शाळेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले. शाळेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा या मुलामुलींना ज्ञानग्रहणाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देत आहेत. क्रमिक पुस्तकांच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थी विकासासाठी शाळेत वृक्षदिंडी, बालोद्यान, उमेद गट, एक मुष्टी धान्य, बाह्य परीक्षा मार्गदर्शन, पालक प्रबोधन, गणित मापन प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, रंगभरण चित्रकला स्पर्धा यासारखे उपक्रम घेतले जातात. त्याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. शाळेत मिळवलेल्या पायाभूत शिक्षणाच्या आधारावर शाळेच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी संशोधन, अभियांत्रिकी, उद्योग, गायन, नृत्य, विज्ञान, वैद्यक, कला, क्रीडा, साहित्य , प्रशासन अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा स्थानिक तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे. या सर्वांचा अभिमान शाळेला आणि संस्थेला निश्चितच आहे.
शाळेच्या प्रगतीसाठी शाळा समितीचे मार्गदर्शनही मोलाचे ठरते. यापूर्वी मा.क.कृ.क्षीरसागर मा.प्रमोदराव गोऱ्हे, डॉ.माधवराव भट या मान्यवरांनी गेल्या काही वर्षांत शाळा समितीचे मा.अध्यक्ष तर प्रा.माणिकताई फुलंब्रीकर यांनी महामात्र म्हणून काम पाहिले आहे. शाळेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात शाळा समितीच्या सध्याच्या अध्यक्ष डॉ.माधवी मेहेंदळे आणि महामात्र प्रा.चित्रा नगरकर, सदस्या डॉ.मानसी भाटे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. (लेख ब्लॉगवर प्रसिद्ध करत असताना नुकत्याच मा.आनंदीताई पाटील अध्यक्षा झाल्या आहेत.) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अमलात आणताना विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान, विज्ञान परंपरेची जाणीव करून देणे, चारित्र्याची जोपासना करण्याचे महत्त्व विद्यार्थी वर्गाला शिकवणे, समर्थ भारत घडवण्यासाठी बालमनांना आकार देणे, त्यांच्यात भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सतत कार्य करत राहण्याचे ध्येय संक्रमित करणे हे शाळेचे काम पुढे चालू ठेवण्यासाठी संस्था, शाळा, पालक, समाज या सर्वांचे एकत्रित आणि समन्वित प्रयत्न आवश्यक आहेत. ते निश्चितपणे होत राहतील याची मला खात्री आहे. शाळेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!
शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने लिहिलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास ग्रंथ 'ध्यास पंथे चालता' याचे प्रकाशन नुकतेच ८ फेब्रुवारी २०२२ रोजी भारताचे मा.उपराष्ट्रपती श्री.वेंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झाले. ज्ञानयज्ञ अविरत प्रज्वलित ठेवण्याच्या हेतूने कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या सर्व घटकांची भावनाच या ग्रंथाच्या लेखिका डॉ.केतकी मोडक यांनी व्यक्त केली आहे.
पाऊले ती धन्य होती, ध्यास पंथे चालता
सार्थक जीवाचे होते, ध्यास पंथे चालता
गौरवान्वित होते संस्था, ध्यास पंथे चालता
उजळते तेज मायभूचे, ध्यास पंथे चालता
( मएसो भावे प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध स्मरणिकेतील लेख ,प्रकाशन ३/०५/२०२२)
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment