मनातलं जनासाठी भाग २
प्रफ्फुल मुर्डींची ओळख झाल्यापासून e गृपही जर त्यांच्यापासून लांब लांबच रहायला बघत होता.पण अखेर त्या मुर्डींचीच मदत घेण्याची वेळ enjo गृपवर आली.रमोला त्या दिवशी घाईतच होती.कारण दुपारी एकची भेटायची वेळ ठरली होती दी मॉलमध्ये.ती निघतच होती घरातून पण तेवढ्यात नेमकी तिच्या मॉमची फ्रेंड घरी आली.मग काय तिच्या तावडीतून निसटता निसटता दीड तास गेला.सारखे गृपचे मेसेजवर मेसेज येत होते.मिस्ड कॉलवर मिस्डकॉल कारण फोन अटेंड केला तरी पंचाईत.म्हणून रमोलानं मेसेज टाकलं " missing today's fun." म्हणून काय ते बघायला मॉलवर पोचलेले सगळेजण माघारी परतले आता रमोलाला घेऊनच जाऊ म्हणून तिला आणायला.
रमोलाने घाईघाईने गाडी काढली आणि गडबडीने ती भजनलाल रस्त्याला लागली.काउंटीच्या पुढच्याच चौकात तिच्या गाडीला एकाचा धक्का लागला आणि तो गाडीसह खाली पडला.लगेच गर्दी गोळा झाली.जो गाडीवरून पडला होता तो जोरजोरात ओरडू लागला.खर तर चूक त्याची होती.अचानक डाव्या बाजूने तो ओव्हरटेक करू पहात होता.त्यामुळे धक्का लागून तो पडला.पण त्याला थोडं लागल्यामुळे जमलेले लोक त्याच्या बाजूनं बोलू लागले. रमोलाला काय करावं काही सुचेना.
तेवढ्यात एकदम फुर्रर..... असा शिट्टीचा आवाज आला आणि मुर्डीकाका पुढे आले.
"चला बाजूला व्हा.बघू किती लागलंय? थांबा पोलिसाला बोलावतो.लायसन्स बघू तुझं." असं बोलू लागले.
पोलीस , लायसन्स म्हणताच त्या पडलेल्या मुलाची गाळण उडाली आणि
" जाऊ दे .आता सोडून देतो." असं बडबडून तो गाडी घेऊन निघून गेला.
आता मुर्डीकाकांनी शिट्ट्या वाजवत, अगदी सहजपणे तुंबलेली वाहने वाटेला लावली. इतक्यात मॉलवरून परतणाऱ्या प्रत्युषने रमोलाची गाडी पाहून आपली गाडी थांबवली आणि तो रमोलाकडे आला. मुर्डीकाकाही आले आणि
म्हणाले " अरे, यंग चॅप्स, तुम्ही बोस्टन काउंटीत राहता ना ?"
" हो, हो आम्ही तिथंच राहतो." आता त्यांची एकमेकांना परत ओळख पटली.
" बरं झालं अंकल तुम्ही आलात.नाहीतर माझ्यावरच ऍक्सिडेंटचा आरोप लागला असता." रमोला म्हणाली.
" पण काय हो काका तुम्ही नेहमीच ही शिट्टी जवळ ठेवता का?"
मुर्डी म्हणाले, " अगं, हो.ह्या गजबजलेल्या शहरात वरचेवर काहीतरी घडत असतं. अशा वेळी ही शिट्टी वाजवताच निम्मं काम होतं. आणि मघाशी मी पोलिसांचं नाव काढताच तो का पळाला माहितीये? कारण त्याच्याकडे लायसन्स नव्हतं, तो रॉंग साईडने घुसत होता आणि आता पकडला गेला असता तर त्याच्याबरोबर त्याच्या पालकांनाही शिक्षा झाली असती.सरकारनं असा आता कायदाच केलाय."
" अरेच्चा, आम्हाला तर माहितच नव्हतं." प्रत्युष म्हणाला." पण अंकल, तुमच्यामुळे आज हे कळालं आणि रमोलाही अडचणीतून वाचली."
" हो ना.भारतात दरवर्षी अनेक कमी वयाची मुलं गाड्या चालवताना पकडली जातात, कधी ती अपघातांनाही कारणीभूत ठरतात.त्यामुळे सरकारने आता जुना कायदा बदलून नवा कायदा आणलाय.अशा कमी वयाच्या मुलांनी गाडी चालवली तर पालकांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल." मुर्डी म्हणाले.
" ओह, गॉड एकदम स्ट्रिक्ट कायदा केलाय सरकारनं." रमोला म्हणाली.
" पण याच्यात काही नाइलाजही असतो पालकांचा. त्यांचे कॉलेजचं,क्लासचं टायमिंग, पालकांच्या ऑफिसच्या वेळा जुळत नाहीत.बसेसही म्हणाव्या तशा वेळेवर मिळत नाहीत. मग देतात नाईलाजाने मुलांना गाडी घेऊन." प्रत्युष म्हणाला.
" पण गैरसोय टाळण्यासाठी, अनेकांच्या जिवाला धोका निर्माण होतं त्याचं काय.केवळ स्वतःची थोडी सोय करण्यासाठी दुसऱ्यांना अडचणीत आणायचं हे काही बरोबर नाही." मुर्डी म्हणाले " यातून मार्ग काढायचा असेल तर लवकरात लवकर बससेवा चांगली करणे, शहरनियोजनाचा विचार अधिक चांगला आणि बारकाईनं करणं आणि तो तातडीने प्रत्यक्षात आणणं ह्या गोष्टी महानगरपालिका, सरकार यांच्या नियंत्रणात आहेत. तर असलेल्या परिस्थितीत नियमपालनाचा आग्रह सगळ्यांनी धरणे, घरातून थोडं लवकर बाहेर पडणं, काही सेकंदांचा, मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी आपली आणि दुसऱ्यांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही याची काळजी घेणं यासारख्या गोष्टी आपल्या हातात आहे.त्यातरी करायला सुरुवात करूया.कारण नियमपालनात सगळ्यांचं भलं आहे."
" हं, अंकल तुम्ही म्हणता त्यात पॉइंट आहे.पण आता मात्र आपण फ्रेंड झालो. कारण friend in need is friend indeed." रमोला म्हणाली आणि तिघेही खळखळून हसले. ही फ्रेंडशिप आता पुढं काय वळण घेणार हे हळूहळू उलगडत जाणार होतं.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment