मनातलं जनासाठी भाग ४ स्वामी विवेकानंद
" अरे चला लवकर, उशीर होतोय." मनोजनं सगळ्या e गृपमेम्बर्सना हाका मारल्या. सगळे उत्साहाने बाहेर पडले पण वाटेत त्यांना एक मिरवणूक दिसली. कोणातरी भगवी कपडे घातलेल्या साधूचा पुतळा घेऊन शिस्तीने मिरवणूक चालली होती.
ती बघताना सुकेतनं विचारलं " अरे हा कोणाचा पुतळा आहे आणि ही कशाबद्दल मिरवणूक आहे?"
" अरे हा तर स्वामी विवेकानंदांचा पुतळा. पण मिरवणूक कशाबद्दल ते मात्र माहित नाही." सानिया म्हणाली.
"पण ही मिरवणूक जायला वेळ लागेल तोपर्यंत आतच थांबूया." निधीनं सुचवल्याप्रमाणे सगळे आत येऊन थांबले.
एवढ्यात त्यांना प्रफ्फुल मुर्डी दिसले." हाय अंकल ." सगळे म्हणाले .
" काय e गृप बाहेर निघालाय वाटतं." मुर्डींनी विचारलं.
" हो ना, जायचंय बाहेर.पण कसलीशी मिरवणूक निघालीय.त्यामुळे रस्त्यावर गर्दी आहे." विजयंत म्हणाला."आणि स्वामी विवेकांनंदांचा पुतळाही आहे मिरवणुकीत."
" अरे आज राष्ट्रीय युवा दिन म्हणजे स्वामी विवेकानंदांची जयंती."मुर्डी बोलू लागले, " तुम्हाला माहिती असेलच ना त्यांच्याबद्दल."
" हो. कधीतरी ऐकलं होतं ते अमेरिकेत गेले आणि म्हणाले ' my sisters and brothers of America' आणि मग त्या लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या होत्या." सानिया म्हणाली. " पण याच्यापुढे काहीच माहिती नाही."
" अरे, स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे शिष्य.पश्चिमेचं विज्ञान आणि भारताचं अध्यात्म यांच्या समन्वयाने जगाचं कल्याण व्हावं अशी इच्छा असणारे प्रखर राष्ट्रभक्त . प्राचीन भारतीय हिंदू तत्वज्ञानाचे प्रतिनिधी म्हणून १८९३ ला शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेला गेले आणि तिथं तू सांगितलंस ते वाक्य म्हणाले.हे एवढं माहिती आहे तुला.पण विज्ञानाची आणि वैज्ञानिकांची चांगली माहिती होती त्यांना."
" काय सांगताय अंकल? ते तर संन्यासी होते ना?" सुकेत म्हणाला.
" हो ते संन्यासी होते." मुर्डीअंकल पुढे बोलू लागले " पण अमेरिकेला जाताना, जहाजाच्या प्रवासात त्यांची आणि जमशेदजी टाटा यांची प्रदीर्घ चर्चा झाली.त्यातून बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची सुरुवात झाली.पुढे अमेरिकेत गेल्यावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आले.स्वामीजींच्या मानवकल्याणाच्या दृष्टिकोनाचा टेस्लावर चांगला प्रभाव पडला होता. "
" अंकल, ही नवीनच माहिती तुम्ही सांगताय." रमोला म्हणाली.
" रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरू शिष्यांच्या जोडीने भारतात एक नवा मार्ग दाखवला. रामकृष्ण म्हणत ' शिवभावे जीवसेवा ' केली पाहिजे म्हणजे माणसं ही ईश्वराचे अंश आहेत हे लक्षात घेऊन त्यांची सेवा म्हणजे ईश्वरपूजा समजली पाहिजे. आपल्या गुरूचा उपदेश लक्षात घेऊन ' दरीद्रीनारायण देवो भव ' असं म्हणत आपण सुरू केलेल्या ' रामकृष्ण मठाचं ' बोधवाक्य ' आत्मनो मोक्षार्थं जगद् हिताय च 'म्हणजेच स्वतःच्या मोक्षाबरोबरच जगाचे कल्याण असं ठेवलं. या मठाच्या माध्यमातून अनेक प्रकारची सेवेची कामं केली." मुर्डी म्हणाले.
" अरे, हा तर वेगळाच पैलू सांगितला तुम्ही अंकल ", मनोज म्हणाला.
" हो तर.स्वामीजींच्या गुणांचे कितीतरी पद्धतीने वर्णन करता येईल.पण स्वामीजी त्यांच्या शिष्या जोसेफाईन मॅकलाउड यांना म्हणाले ' माझ्यासाठी एकच करा ते म्हणजे भारतावर प्रेम करा.' भारतच जगाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवू शकतो याच्यावर त्यांचा पक्का विश्वास होता.यासाठी संपूर्ण जगावर अध्यात्मिकतेच्या आधारावर विजय हेच भारताचे उद्दिष्ट असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं."
" हो अंकल, म्हणजे हे Vision 2020 सारखं आहे ना?" निधी म्हणाली.
" होय तर.भारत सामर्थ्यसंपन्न होणार याची उद्घोषणा त्यांनी साधारण १२० वर्षांपूर्वी स्पष्ट शब्दात केली. सामर्थ्यसंपन्न भारताचं उद्दिष्ट प्रत्यक्षात आणायचं तर त्यासाठी युवा पिढीनं विशेष प्रयत्न केले पाहिजे हे त्यांचं आग्रहाचं म्हणणं होतं. आपण सर्वजण दैवी अंश आहोत, आपण परमेश्वरासारखं निर्भय झालं पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, बळकट शरीराचे तेजस्वी विचारांचे निर्मळ मनाचे आणि उदार अंतःकरणाचे तरुण तरुणीच भारताचे भविष्य घडवतील असं ते म्हणायचे." मुर्डी सांगत होते.
" पण हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणायचं तर त्यांचे विचार आपण चांगले समजून घेतले पाहिजे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर म्हणाले तुम्हाला भारत समजावून घ्यायचा असेल तर विवेकानंद समजावून घ्या.कारण त्यांच्या विचारात सकारात्मकता आहे." मुर्डी म्हणाले.
" हो ना अंकल.एवढे स्वामीजींचे विचार आजही प्रेरक वाटतात म्हणूनच त्यांचा जन्म दिवस हा आपला राष्ट्रीय युवा दिन म्हणजे नॅशनल युथ डे म्हणून साजरा केला जातो. आम्ही देखील त्यांचे विचार समजावून घेऊ आणि प्रत्यक्ष काही करण्याचा प्रयत्न करू. हो की नाही?" मनोज म्हणाला.
" हो तर नक्कीच." सगळे एकदम एका सुरात म्हणाले. सर्वांच्याच चेहऱ्यावर एक निश्चय दिसत होता. त्याच निश्चयाने सर्वांनी पुढे जाऊन मिरवणुकीतील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला नमस्कार केला.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment