मनातलं जनासाठी भाग ५ व्यसनाधीनतेचा प्रश्न

 आज मुर्डी जरा गंभीरच होते. e ग्रुपच्या हाय-हॅलो देखील त्यांनी जेमतेम प्रतिसाद दिला. त्यावेळी निधीने विचारले, " काय अंकल काय झाले?" मुर्डी यांनी तर दिले," अगं, एका गंभीर प्रश्नाचा मी विचार करत होतो तेव्हा मला आठवण झाली ती संत गाडगेबाबांची."



" अंकल हे गाडगे बाबा कोण आणि त्यांनी नेमकं केलं काय?" विजयंत म्हणाला.
मुर्डी सांगू लागले, " मित्रांनो, ज्यांनी महाराष्ट्रात लक्षणीय समाजकार्य केलं अशा महान व्यक्तींच्या नामावळीत संत गाडगेबाबा यांचं नाव आग्रहाने घ्यावं लागेल. प्रचलित शिक्षणव्यवस्थेत शिक्षण न घेताही जीवनाचा खरा अर्थ जगून दाखवणारे गाडगेबाबा हे एक आदर्श व्यक्तीच आहेत.साधारणपणे त्यांची आठवण काढली जाते ती स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने. स्वच्छता हा गाडगेबाबांचा कार्याचा विषय होताच.पण आजकाल त्यांची आठवण मला होते ती त्यांच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा शिकवणुकीमुळे. गाडगेबाबांच्या मोठया मुलीचा जन्म झाला तेव्हा तिच्या बारशाच्या कार्यक्रमात त्यांनी त्यावेळच्या त्यांच्या समाजात रूढ असलेल्या पद्धतीप्रमाणे आलेल्या लोकांना दारू पाजायला ठामपणे नकार दिला. आपल्या समाजबांधवांचा राग ओढवून घेतला.पुढे आयुष्यभर त्यांनी समाजाला दारू आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा कळकळीचा उपदेश केला."
मनोज म्हणाला, "अंकल, एवढं मोठं त्यांचं काम आम्हाला माहितीच नव्हतं. पण आज तुम्ही नेमका कशाचा विचार करताय?"
मुर्डी आधीच्याच गंभीरपणाने पुढे सांगू लागले, "सध्या दिवसेंदिवस समाजात व्यसनांचं प्रमाण वाढ चालल्याचं दिसून येत.याचे वेगवेगळे पुरावे मिळतात.उदाहरण म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्ष साजरं करण्याच्या निमित्ताने किती दारू खपली याचे आकडे पाहिले की ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. पण अडचणीचा मुद्दा असा आहे की दारूचं व्यसनाला तथाकथित प्रतिष्ठा मिळते आहे.प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये शिक्षण , उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक लोकांना दारू पिणं हे प्रतिष्ठेचं लक्षण म्हणजे स्टेटस सिम्बॉल वाटतं.आणि कष्टकरी, कमी उत्पन्न गटात दारू हे शीण घालवण्याचं, दुःख विसरण्याचं साधन मानलं जातं."
" तुम्ही म्हणता आहे त्यात पॉईंट आहे अंकल." सुकेत उद्गारला. " पण अंकल हा प्रकार आपल्याकडे आधीपासून तर चालत आला असणार."
" माझ्याकडे वेगळीच माहिती आहे." मुर्डी सांगू लागले, "मागे एकदा वाचनात आलं होतं की इंग्रजांनी दारूचा खप भारतात वाढावा यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले असताना त्यांनी असे म्हटले की, " भारतात लाखामध्ये एका व्यक्तीला व्यसन असेल." परंतु इंग्रजांनी भारतात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढावे यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले. स्वामीजी याबाबत म्हणाले, " कशाला दारूचा व्यापार करणारे इंग्रज भारतभर आपली माणसे आतापर्यंत पाठवत आलेत? कशासाठी? तर खास तिथल्या लोकांमध्ये नशा आणणाऱ्या मद्यांची आवड निर्माण करण्यासाठी. त्यांना दारूचे धडे देण्यासाठी आणि माझ्या पाहणीनुसार मला तर वाटते हे धडे गिरवण्यासाठी अधिक चांगले विद्यार्थी त्यांना कुठेही मिळणार नाहीत." या पद्धतशीर प्रयत्नांचा परिणाम भारतातील लोकांवर नक्कीच झाला आहे. इंग्रजांनी भारतीयांना शारीरिक/ व्यावहारिक पातळीवर तर गुलाम केलं होतंच पण भारतीयांना मानसिक गुलामगिरीत ठेवण्यासाठीदेखील योजनाबद्ध प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून इंग्रजांच्या दृष्टीने आवश्यक असणारं मद्यपान भारतीयांच्या दृष्टीनेदेखील गरजेचं आणि एका अर्थानं पुढारलेपणाचं लक्षण ठरलं.याचाच परिणाम हळूहळू समाजात दिसू लागला.त्यामुळे दारू हे व्यसन न राहता आता जणू प्रतिष्ठेचं लक्षण बनलंय."
" प्रतिष्ठेचं लक्षण म्हणजे काय अंकल?" रमोलानं विचारलं.
"अगं, प्रतिष्ठेचं लक्षण म्हणजे स्टेटस सिम्बॉल." मुर्डी उत्तरले.
" हं, आता समजलं." रमोला म्हणाली.
" पण हे तर चालत राहणारच," विजयंत म्हणाला.
" चालतच राहणार असा विचार करत असताना काही माहिती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे." मुर्डी पुढे सांगू लागले, "काही संस्थांनी याची पाहणी केली तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य अजून लक्षात आलं. शाळकरी मुलामुलींमध्येही दारूच्या व्यसनाचं प्रमाण वाढत आहे.दुसरा एक निष्कर्ष म्हणजे तरुण मुलांबरोबर मुलींमध्येही याचं प्रमाण वाढत चाललं आहे. एक परिचितांनी त्यांच्या ओळखीच्या समुपदेशकाकडे घडलेला एक प्रसंग सांगितला. एक श्रीमंत उद्योजक त्या समुपदेशकाकडे आले.त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या मुलीला घरी किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशा ठिकाणी दारू प्यावी म्हणून सांगावं यासाठी समुपदेशन करावं.पण त्या समुपदेशकांनी "असं " समुपदेशन करण्याचं नाकारलं. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या वागण्याचा लहान मुलांवर कसा परिणाम होतो हे दुसऱ्या एका ऐकलेल्या उदाहरणावरून लक्षात आलं.एक ओळखीचे प्राध्यापक काही निमित्ताने शेजारच्या घरी गेले.त्या घरातील छोटा मुलगा समोर टीपॉयवर पाण्याची बाटली ठेवून काही खेळ खेळत होता.त्याला विचारलं तर म्हणाला आजोबांसारखं ड्रिंक घेतोय. हा प्रसंग अगदी धक्कादायक असाच आहे. एका ठिकाणी असं ऐकण्यात आलं की बरीच शाळकरी मुलं पहिल्यांदा ३१ डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा दारू पितात."
"हो पण अंकल यावर नेमका उपाय काय?" सानियाने विचारलं.
आता मुर्डी कळकळीने सांगू लागले, "भारतातील अनेक महान व्यक्तिंनी याबाबतीत आपल्या उदाहरणावरून आदर्श घालून दिले असता आजची ही परिस्थिती चिंता वाढवणारीच आहे.एक जागरुक व्यक्ती म्हणून समाजातील सर्वांनी याबाबत कृतीसाठी पुढं यायला पाहिजे. याबाबत सतत संवाद सुरू ठेवला पाहिजे. समाजप्रबोधनाचा हा वसा पुढे चालू ठेवायलाच हवा. "
मुर्डीच्या या कळकळीने सांगण्याचा विचार करत, आपणही काही करूया असा विचार करत सर्व जण आपापल्या घरी गेले.
सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख