मनातलं जनासाठी भाग ७ शहरीकरण
" वैतागलो या ट्रॅफिक जॅमला...! " प्रत्युष उद्गारला. " अरे पाच किलोमीटर यायला दीड तास लागला. काही अर्थ आहे का याला! " नेहमीप्रमाणे ई ग्रुप कट्ट्यावर जमला होता. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे जिकडेतिकडे हीच परिस्थिती होती. " हो ना! " रमोलाने दुजोरा दिला. " आम्हाला तर ८ किलोमीटर यायला दोन तास लागले."
" हे तर काय आपल्या शहरात नेहमीचंच झालंय." मनोज म्हणाला. " काय मुर्डी अंकल? तुम्ही कुठे गेला होता की नाही?" समोरून येणाऱ्या प्रफुल्ल मुर्डी यांना पाहून सानियाने विचारले. " नाही रे मित्रांनो. माझं काही कुठेही महत्त्वाचं काम नव्हतं त्यामुळे मी आपला बाहेरच पडलो नाही." मुर्डी म्हणाले. " हो ना तुमचं बरं आहे काही महत्त्वाचं काम नाही त्यामुळे बाहेर पडण्याचा प्रसंगच येत नाही. त्यामुळे ट्रॅफिक जॅमचाही प्रश्नच नाही." निधी म्हणाली.
आता हाच विषय पुढे सुरू झाला. मुर्डींनी विचारले, " महत्वाची कामं कोणती रे?" " अहो अंकल असं काय करता कॉलेजला, ऑफिसला जाणं हेच महत्त्वाचे काम." विजयंतने सांगितले. मग मुर्डींनी विचारले, " असं बघा, आपल्या शहरातील माणसांना कॉलेज,ऑफिसला जायला आणि परत यायला सरासरी किती वेळ लागत असेल?" आता ई गृप विचार करू लागला.आपापल्या अनुभवाप्रमाणे माहितीप्रमाणे मनातल्या मनात गणित करू लागला. प्रत्येकाच्या माहितीत असे बरेच जण होते की ज्यांना याच्यासाठी सरासरी अर्धा तास, एक तास , दीड तास दोन तास , क्वचित प्रसंगी अडीच तासापर्यंत वेळ लागत असे. प्रत्येकाने उत्तर दिले. " मग याचं ॲव्हरेज कसं काढायचं?" निधीने प्रश्न विचारला. " आपणच ठरवूया." मुर्डी म्हणाले. " चला दीड तास धरूया." विजयंतने जणू फायनल निर्णयच दिला. हो, हो म्हणत बहुतेकांना ते पटलं. " आता २४ तासांपैकी दीड तास म्हणजे किती टक्के वेळ रे?" लगेच मुर्डींचा पुढचा प्रश्न. गणितात हुशार असलेली सानिया पटकन म्हणाली, " जवळपास ६ पर्सेंट!" "बघा, म्हणजे आपल्या कामाच्या दिवसांमधला जवळपास पाच ते दहा टक्के वेळ हा रस्त्यावर जातो. मग तुम्ही कोण आहात , कोणत्या पदावर काम करता यांनी काहीही फरक पडत नाही. तुम्ही बसमध्ये वेळ घालवता किंवा स्वतःच्या लक्झुरिअस कार मध्ये!" मुर्डी यांचे म्हणणे आता सगळेजण अधिक लक्षपूर्वक ऐकू लागले.
" आता इतका वेळ का लागतो?" मुर्डींचा पुढचा प्रश्न आला. लगेच मनोज म्हणाला, " अहो अंकल पॉप्युलेशन किती वाढलंय." " अरे व्हेईकल्सदेखील किती वाढली आहेत. आपल्या शहरात लाखांच्या संख्येने टू व्हीलर आणि फोर व्हीलर आहेत." रमोलाने माहिती पुरवली. " पार्किंगला जागा मिळायलाही प्रॉब्लेम होतो." निधी बोलली. " हो आणि काही जणांना ट्रॅफिक रूल्स पाळायला नकोत." प्रत्युष जरा विचारपूर्वक म्हणाला. मुर्डींनी पुढचा प्रश्न विचारला, "पण शहरात गर्दी का वाढली?" " अंकल, अहो उत्तर सिम्पल आहे इथे बेटर अपॉर्च्युनिटीज आहेत ना?" विजयंत बोलला. " अगदी बरोबर! शहरात नोकरी व्यवसायाच्या, शिक्षणाच्या, आरोग्याच्या जास्त चांगल्या संधी आहेत. त्यामुळे शहरातील लोकसंख्या गेली अनेक वर्ष वाढतच आहे. पण पूर्वी मात्र असं नव्हतं." मुर्डी म्हणाले. " मग कसं होतं?" मनोजचा प्रश्न. मुर्डी पुढे सांगू लागले, " ऐतिहासिक काळात गावे ही स्वावलंबी होती. गावच्या गरजेच्या गोष्टी गावातच तयार व्हायच्या. रोजगाराच्या ही संधी गावातच उपलब्ध व्हायच्या. मग हळूहळू यांत्रिकीकरण वाढत गेले." " यांत्रिकीकरण म्हणजे?" रमोलाने विचारले. " यांत्रिकीकरण म्हणजे मोठे मोठे कारखाने तयार झाले ते स्वयंचलित पद्धतीने वस्तू बनवू लागले." मुर्डींचे उत्तर. " म्हणजे इंडस्ट्रियलाझेशन आणि ऑटोमेशन. पण अंकल याचा फायदा किती होतो." विजयंत म्हणाला. " हो ना. यामुळे माणसांचे कष्ट कमी झाले. सोयी वाढल्या. सुख मिळू लागले." मुर्डी बोलू लागले. " पण या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने शहरांमध्येच उपलब्ध होऊ लागल्यामुळे गावांमधले छोटे छोटे उद्योग कमी होऊ लागले आणि शहरांमध्ये गर्दी वाढू लागली. आपण देश म्हणूनही शहरीकरणावर भर दिला. पण त्याचे नियोजन प्लॅनिंग यामध्ये मात्र पुरेसे चांगले प्रयत्न झाले नाहीत. काही जणांचे स्वार्थी हितसंबंध म्हणजे व्हेस्टेड इंटरेस्टस् यात गुंतलेले असल्यामुळे समतोल निर्णय घेण्याऐवजी ठराविक लोकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले. त्यात भर पडली ती ज्यांना या शहरांच्या सोयीसाठी स्वतःची जागा, घरे, गावे द्यावी लागली त्यांच्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था चांगली व्हावी यासाठी उत्तम प्रयत्न झाले नाहीत. यातून हा प्रश्न आता खूपच गुंतागुंतीचा झाला आहे. त्याला जागा, पाणी याची अपुरी उपलब्धता, वाहनांच्या गर्दीमुळे कामाचे तास वाया जाणे, वाहने बराच वेळ चालू राहिल्याने प्रदूषणात अजून वाढ असे अनेक पैलू आहेत." " अरे बापरे! आता याला सोल्युशन काय?" प्रत्युषने विचारले. " यावर वेगवेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल." मुर्डी सांगू लागले. " सर्वांच्या भल्यासाठी सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. गावांची स्थिती सुधारेल यासाठी अजून चांगले प्रयत्न करावे लागतील. समाजाने आपली विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले तर हा प्रश्न हळूहळू का होईना पण निश्चितपणे सुटेल." मुर्डींच्या बोलण्यावर विचार करत करत ई ग्रुप पांगला.
सुधीर गाडे, पुणे
स्व.अटलजींनी सांगितलेले जय किसान जय विज्ञान यांची सांगड घारणे गरजेचे आहे.
ReplyDeleteहोय सर.
DeleteNeed to change mindset of village people
ReplyDeleteहोय मॅडम. सगळ्यांच्याच मानसिकतेत बदल आवश्यक आहे.
Delete