मनातलं जनासाठी भाग ८ अंगप्रदर्शन की कपड्यांचे स्वातंत्र्य
" अगं, सानिया तिचे बेबी बंप बघितले का? कसे दिसताहेत!" हातातल्या मोबाईलमधला फोटो दाखवत रमोला म्हणाली. " काय!" जवळूनच प्रफुल्ल मुर्डी चालले होते ते उद्गारले.
नेहमीप्रमाणे ई ग्रुप आपल्या कट्ट्यावर बसला होता आणि त्यांची चर्चा चालली होती. जवळून जाणारे मुर्डीदेखील आता यात सहभागी झाले.
" काय अंकल, तुम्ही सोशल मीडिया फॉलो करत नाही वाटतं!" मनोज म्हणाला. " मी सोसेल तेवढा सोशल मीडिया फॉलो करतो." मिश्कीलपणे मुर्डी म्हणाले. ई गृपमध्ये हास्याची हलकीशी लकेर उमटली.
नुकतीच एका चित्रपट अभिनेत्रीने समाज माध्यमांवरती गरोदरपणात आपल्या शरीराचा बराचसा भाग दाखवणारी छायाचित्रे टाकली होती. त्यावरून ही चर्चा सुरू झाली. मुर्डी यांची प्रतिक्रिया ऐकून निधी म्हणाली "काय अंकल , तिचं शरीर आहे किती दाखवायचं आणि काय दाखवायचं हा तिचा निर्णय आहे." " हो ना , बाकिच्यांनी यात बोलण्यासारखे काय आहे?" विजयंत म्हणाला. " आता यात जेंडर डिस्क्रिमिनेशन राहिले नाही. पुरूष कलाकारही अंगप्रदर्शन करू लागले आहेत. त्याची प्रसिद्धी करू लागले आहेत. " मुर्डी पुन्हा गंमतीने म्हणाले. पुन्हा एकदा जरासा हशा पिकला.
" पण आपली काही मोठीमोठी माणसेदेखील मागास मानसिकतेची वाटतात. मध्ये एका सेक्शुअल हरॅसमेंटच्या प्रकारात मुलीने नीट कपडे घातले नाहीत म्हणून तो प्रकार घडला असे म्हटलं गेलं." प्रत्युष गंभीरपणे म्हणाला. आता चर्चा गंभीर वळणावर जाऊ लागली. " अनेक घटना सांगतात की मुलीचे, महिलेचे कपडे , वय यांचा यात काहीही संबंध नसतो. अगदी वाईट मेंटॅलिटी आहे ही." प्रत्युष पुढे बोलला.
" अगदी बरोबर आहे तुझं, प्रत्युष." मुर्डी म्हणाले. " महिलांवरच्या अत्याचाराच्या मागे असते ती वासनांध पुरूषांची विकृत मानसिकता. दुर्दैवाने काही वेळा महिलादेखील या विकृतीची पाठराखण करताना दिसतात. पण हा वेगळा मुद्दा आहे. या बेबी बंपमध्ये मुद्दा आहे सोशल एटिकेटस् यांचा." " समाजमान्य म्हणून काही कल्पना असतात. त्यांचा विचार व्हायला नको का?" आता सानिया बोलू लागली,"पण अंकल कुठल्या गोष्टी सोशली ऑल टाइम ॲक्स्प्टेड असतात? जुनी चित्रे, नॉव्हेल्स काही ठिकाणची स्कल्प्चरमध्ये अशा गोष्टी दिसतात ना?" " हो तुझं म्हणणं अगदी रास्त आहे पण कोणत्या गोष्टी आता समाजमान्य आहेत किंवा व्हायला पाहिजे हे कसं ठरवणार? या कलाकारांनी कलाकारांनी त्यांना स्वातंत्र्य आहे म्हणून हा प्रकार केलाय की यातून त्यांना प्रसिद्धी मिळवून काही फायदा मिळवायचा आहे? " मुर्डींनी उत्तर दिले. आता ई गृप विचारात पडला. " हो अंकल, ह्यांना प्रत्येक गोष्टीतून लाइमलाईट मिळवायचा असतो, पैसाही हवाच असतो" प्रत्युष विचार करत म्हणाला. " अरे, जुना श्लोकच आहे.
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् |
येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत् ||" मुर्डी म्हणाले. " अहो अंकल, प्लीज मराठीत ट्रान्सलेट करा ना," मनोज म्हणाला. " हो सांगतो. या श्लोकाचा अर्थ असा की मडके फोडा , कपडे फाडा , गाढवावर बसा, काहीही करा पण प्रसिद्ध पुरूष व्हा." मुर्डींनी उत्तर दिले. " अंकल पण हा श्लोक जेंडर बायस्ड आहे. " पटकन रमोला म्हणाली. " हे तुझं म्हणणं विचार करण्यासारखा आहे. पण काही वेळा असे उल्लेख जेंडर बायस्ड नसतातदेखील. पण महत्त्वाचा मुद्दा ही कलाकार मंडळी प्रसिद्धीसाठी करतात का हे आपण विचारात घ्यायला पाहिजे." मुर्डींनी उत्तर दिले. " एकूण काय बराच विचार करायला लागेल आणि ठरवायला लागेल. आता एवढा वेळ कुठे घालवायचा. पैसा , प्रसिद्धीसाठी कपडे काढणार ते आणि आपण बसलोय डिस्कशन करत आपला मनी घालवत. कारण, टाइम इज मनी. हो ना . " विजयंत म्हणाला आणि सगळे एकदम हसले. " तुझं म्हणणं बरोबर आहे विजयंत पण हळूहळू गोष्टी कशा बदलत जातात. समाजाचे विचार कसे बदलतात हेही लक्षात घ्यायला हवे. बघूया सवडीने कधीतरी बोलू. मलाही जायचंय माझ्या मनीच्याच कामासाठी म्हणजे मराठीतल्या मनीच्या कामासाठी" मुर्डी म्हणाले. पुन्हा सगळे हसले आणि बाय, सीयू करत हळूहळू सगळे निघू लागले. जाता जाता मनोज मोठ्याने म्हणाला, " लेटस् मीट अगेन." " हो तर, शुअर" असं म्हणत सगळे पांगले.
सुधीर गाडे पुणे
Comments
Post a Comment