बालपणीचा आनंद पुन्हा एकदा
काही दिवसांपूर्वी खरेदीला गेलो असताना ह्या गोळ्यांचे एक पाकिट घेतले. लहानपणी या गोळ्या खूप आवडायच्या. या गोळीला दूध गोळी असे बहुधा म्हटले जायचे. मी शाळेत असताना बहुधा २५ पैशांना ही एक गोळी मिळायची. याबरोबरच आणखी एक गोळी मला आवडायची. ती म्हणजे खोबरा गोळी. त्यावेळी एकूणच गोळ्या बिस्किटे यांचे कमी पर्याय उपलब्ध असायचे. पण बाल वयात तशा एकूणच कमी अपेक्षा असतात आणि त्याकाळी एकूणच समाज म्हणून देखील कमी अपेक्षा असायच्या असे म्हणायला वाव आहे. पण अशा साध्यासुध्या गोष्टीतच आनंद वाटायचा. या दोन गोळ्यांसोबत अजून काही गोळ्या मोठ्या प्रमाणावर मिळायच्या. त्या म्हणजे पेपरमिंट, लेमन अशा. ५ पैसे १० पैसे अशा किमतीत मिळणाऱ्या गोळ्या बालपणी आनंद देऊन जायच्या. मग कधीकधी मित्रांनी एकमेकांना गोळ्या घेऊन द्यायच्या. कुणीतरी आणलेल्या गोळ्या सगळ्यांनी वाटून घ्यायच्या. अशा मित्रांनी वाटून खाण्याच्या अजून बऱ्याच गोष्टी होत्या. असाच एक स्मरणीय कार्यक्रम असायचा तो म्हणजे फोटो काढण्याचा. आजच्या काळात जवळपास सर्वांकडे मोबाईल फोन असल्या...