स्वामी विवेकानंद यांचे कालजयी विचार

    भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद हे खऱ्या अर्थाने जगाचे मार्गदर्शक होत. जगामध्ये दोन प्रकारच्या विचारधारा आढळून येतात. त्या म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चात्य. आपापल्या विचारधारेला अनुसरून त्या त्या देशातील माणसांनी आपापले आयुष्य व्यतीत केल्याचा वर्षानुवर्षांचा इतिहास आढळून येतो. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दोन्ही विचारधारानुसार जगणाऱ्या माणसांची गरज ओळखून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन केले. या निबंधाच्या मर्यादेत आपण स्वामीजींनी पौर्वात्य विचारधारेनुसार जगणाऱ्यांना म्हणजे प्रामुख्याने आपणा भारतीयांना जे मार्गदर्शन केले त्याचा विचार करूया. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेमधील आपल्या ११ सप्टेंबर १८९३ च्या भाषणाने स्वामीजी एका अर्थाने जगद्विख्यात झाले.  त्यानंतर सुमारे तीन ते साडेतीन वर्षे स्वामीजींनी पाश्चात्य देशांमध्ये भ्रमण केले. हे भ्रमण संपवून स्वामीजी ज्यावेळी भारतामध्ये परत आले त्यावेळी त्यांचे सर्वत्र अभूतपूर्व असे स्वागत झाले. या स्वागताला उत्तर देताना स्वामीजींनी जी व्याख्याने दिली त्या व्याख्यानांच्या आधारे त्यांचा आपणा भारतीयांना कोणता उपदेश आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया.




      स्वामीजींच्या उपदेशपर विचारांमध्ये सगळ्यात पहिला क्रमांक कोणत्या विचाराचा लावावा असा विचार करत असताना असे वाटते की त्यांच्या 'निर्भय व्हा!' याच विचाराचा क्रम पहिला लावला पाहिजे. स्वामीजी असे म्हणतात की, '' जगात उपनिषद हे एकच वाॾमय असे आहे की जात तुम्हाला अभि: ( भयशून्य ) हा शब्द अनेकदा योजलेला आढळेल. जगातील अन्य कोणत्याही धर्मग्रंथात हे विशेषण ईश्वराला किंवा मानवाला लावलेले दिसून येणार नाही.'' व्यक्तीच्या मनामध्ये विविध गोष्टींबद्दल भय वास करत असते. त्यामुळे तिच्या हातून अनेक चुका,  अपराध घडत असतात. ज्यावेळी हे भय काढून टाकून एखादी व्यक्ती स्वतःची प्रगती करू पाहील त्यावेळी तिच्यामध्ये वाटेतील अडचणींवर मात करण्याचे बळ उत्पन्न होईल. स्वामीजींच्या जीवनामध्ये त्यांच्या निर्भयतेचे दाखले देणारे अनेक प्रसंग आढळतात. त्यापैकीच एक प्रसंग आपण उदाहरणादाखल बघूया. परिव्राजकावस्थेत भ्रमण करताना स्वामीजी जेव्हा म्हैसूरच्या राजांच्या संपर्कात आले त्यावेळी स्वामीजींची निर्भयता त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वामीजींना विचारले , "आपणास प्राणांची भीती वाटत नाही का?" त्यावेळी स्वामीजी उत्तरले, " प्राणांची भीती मी काय म्हणून बाळगावी?" अशी निर्भय वृत्ती असल्याने स्वामीजी अलौकिक असे कार्य करू शकले.

     निर्भय बनण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता स्वामीजींनी प्रतिपादन केली आहे. त्या गोष्टी म्हणजे शारीरिक सुदृढता आणि आत्मश्रद्धा. या दोनही गोष्टी जिच्याकडे आहेत अशीच व्यक्ती निर्भय बनू शकते.

     आपल्या मद्रास (चेन्नई) येथील व्याख्यानात स्वामीजी असे म्हणतात की, " गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल. " स्वामीजी असे म्हणतात की , " आपल्याला हवे आहेत लोखंडी स्नायू , पोलादी मज्जातंतू." सुदृढ शरीर हे आपल्या कार्यातील अडथळ्यांवर मात करून पुढे जाण्यास सहाय्यभूत ठरते. त्यामुळे स्वामीजींचा हा आग्रह आपण आचरणात आणला पाहिजे.  सुदृढतेचा उपदेश देणारे स्वामीजी लहानपणापासूनच खेळ, कुस्ती, लाठीकाठी इ.मध्ये प्रवीण होते. याच शारीरिक सुदृढतेच्या जोरावर त्यांनी आपल्या प्राणप्रिय मातृभूमीवर अनर्गल टीका करणाऱ्या टीकाकाराच्या बखोटीला धरले. अनेक तर्कसंगत उत्तरे देऊनही ती मान्य न करणारा तो टीकाकार या सामर्थ्य प्रदर्शनानंतरच शांत बसला. 

     बळकट शरीराबरोबरच स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे असे स्वामीजींचे सांगणे आहे. ते म्हणतात, " नवा धर्म म्हणतो ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक." आत्मश्रद्धा असणारी व्यक्तीच आपले अंगिकृत कार्य पूर्ण करण्यास पात्र ठरते. या आत्मश्रद्धेच्या बळावर तिचा मार्ग प्रकाशमान होत जातो आणि तिला पुढची वाटचाल कशी करायची याचे ज्ञान होते. भारतीय प्राचीन तत्वज्ञानाचा दाखला देऊन स्वामीजी सांगतात की प्रत्येकामध्ये अनंत शक्ती विद्यमान आहे. याच शक्तीवर भरवसा ठेवा असे ते म्हणतात. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेसाठी मुंबई येथून प्रयाण करताना स्वामीजी आपले गुरुबंधू तूरीयानंद यांना म्हणाले, " हे (सर्वधर्मपरिषदेचे) जे आयोजन होते आहे ते याच्यासाठीच (माझ्यासाठीच)!" स्वामीजींच्या या उद्गारांमधूनच त्यांची आत्मश्रद्धा दिसून येते. ही आत्मश्रद्धा अधिक बळकट करूनच आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल.

       निर्भयता शारीरिक सुदृढता आणि आत्मश्रद्धा या गुणांचा संचय असणाऱ्या व्यक्तीने यानंतर लक्ष पुरविले पाहिजे ते आपल्या शिक्षणाकडे. शिक्षण ही व्यक्तीच्या विकासासाठी महत्त्वाचे साधन आहे असे स्वामीजींचे सांगणे आहे. स्वामीजींचे शिक्षणाविषयक विचार अभ्यासताना त्याचे दोन पैलू लक्षात घेणे आवश्यक आहे. पैकी पहिला पैलू म्हणजे शिक्षणामुळे व्यक्तीला स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच्या कष्टावर व कौशल्यावर करता आला पाहिजे. यासाठी कौशल्य विकसित करणाऱ्या शिक्षणावर स्वामीजींचा भर आहे. याच बरोबर शिक्षणाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे व्यक्तीच्या आंतरिक पूर्णत्वाचे प्रगटीकरण होय. स्वामीजींच्या मते तत्त्वतः प्रत्येक व्यक्ती अंतर्यामी परिपूर्ण असते आणि याच परिपूर्णतेचे प्रगटीकरण म्हणजे शिक्षण होय. यामुळेच स्वामीजी पुस्तकांचे केवळ पाठांतर करण्याला शिक्षण मानत नाहीत. तर ते म्हणतात, " इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ज्याद्वारे नियंत्रणात येतात आणि फलद्रूप होतात असे तंत्र शिकणे म्हणजे शिक्षण होय." अनेकदा व्यक्तिला आपल्या इच्छाशक्तीवर नियंत्रण मिळवता येत नाही. त्यामुळे तिच्या विकासात बाधा येते. काही वेळा इच्छाशक्तीचा बेबंद प्रवाह व्यक्तीचे अधकपतन घडवतो. तसेच अन्य व्यक्तींच्या त्रासाचे कारण बनतो. यामुळे समाजामध्ये प्रश्नही निर्माण होतात. हे सर्व लक्षात घेऊन आपण व्यक्तीच्या योग्य प्रकारच्या शिक्षणाकडे लक्ष पुरविले पाहिजे. स्वामीजींचे चरित्र अभ्यासताना या दोनही पैलूंचे दर्शन त्यांच्या जीवनात घडते. परिवराज अवस्थेमध्ये भारत प्रमाण करत असताना त्यांनी पोरबंदर येथे श्री शंकर पंडित यांच्याकडे काही महिने निवास केला व प्राचीन संस्कृत ग्रंथांचे सखोल अध्ययन केले असे दिसून येते. आपल्या अमेरिकेच्या प्रवासात स्वामीजी प्रशंसेबरोबरच ताळतंत्र सोडलेल्या टीकेचेही धनी झाले. परंतु त्यांनी केव्हाही या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला नाही. यातूनच स्वामीजींचे स्वतःच्या इच्छाशक्तीवर कसे नियंत्रण होते हे दिसून येते. स्वामीजींच्या कल्पनेतील शिक्षणा घेऊन आपल्याला खऱ्या अर्थाने प्रगती करता येईल. 

      योग्य शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी पुढे काय करावे याचेही मार्गदर्शन स्वामीजींनी केले आहे. अशा प्रकारे शिक्षणा घेतलेल्या व्यक्तींनी आपल्या शिक्षणाचा उपयोग गरजू समाज बांधवांसाठी केला पाहिजे असे स्वामीजींचे सांगणे आहे. स्वामीजींच्या जीवनकालात भारत गुलामगिरी मध्ये होता. आपले कोट्यावधी बांधव पशुतुल्य आयुष्य जगत आहेत याचे अगदी जवळून दर्शन स्वामीजींनी आपल्या भारत भ्रमणाच्या काळात घेतले होते. या समाज बांधवांना त्यांच्या दिन अवस्थे मधून बाहेर काढण्यासाठी शिक्षित व्यक्तींनी पुढे यावे असे स्वामीजींचे आवाहन आहे. यासाठी शिक्षित स्त्री पुरुषांनी गावोगाव गेले पाहिजे. समाजामध्ये मिसळले पाहिजे असे स्वामीजी सांगतात. राम कृष्ण मठाच्या माध्यमातून गावोगावी जाणाऱ्या व्यक्ती निर्माण व्हाव्यात असा स्वामीजींनी प्रयत्न केला असे दिसून येते. 

    शिक्षित व्यक्तींनी समाजात जाऊन काम करताना कोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे याबद्दलही स्वामीजी सांगतात. स्वामीजींच्या मताप्रमाणे समाजात जाऊ काम करणे ही जीव रूपात वावरणाऱ्या ईश्वराची सेवा आहे असा भाव व्यक्तीच्या मनात असायला हवा. त्यासाठी या व्यक्तींनी 'शिवभावे जीवसेवा' केली पाहिजे असे ते सांगतात. समाजाचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये कधी कधी आपण समाजकार्य करतो म्हणजे समाजावर उपकार करतो अशा प्रकारचा भाव उत्पन्न झाल्याचे बघायला मिळते. स्वामीजींच्या मते ही गोष्ट चूक आहे. त्यांच्या मते या व्यक्तींच्या मनामध्ये आपण ' दरिद्रीनारायणाची सेवा ' करत आहोत असा भाव असणे गरजेचे आहे. १८९९ मध्ये कलकत्ता शहरामध्ये जेव्हा प्लेगने थैमान घातले होते तेव्हा स्वामीजींनी याच भावनेने समाजाची सेवा केली असे आपल्या लक्षात येते. तसेच बेलूर येथील रामकृष्ण मठाची इमारत बांधणाऱ्या मजुरांना जेव्हा त्यांनी अत्यंत प्रेमाने जेवायला घातले तेव्हा 'आज माझ्याकडे नारायण जेवला' असे उद्गार त्यांनी काढले. यासारख्या प्रसंगावरून स्वामीजी कशा पद्धतीने आचरण करीत होते हे आपल्या लक्षात येते.

    गावोगावी जाऊन समाज सेवा करण्यासाठी एका महत्त्वाच्या गुणाची आवश्यकता आहे असे उत्पादन स्वामीजी करतात. तो गुण म्हणजे त्याग. भारतीय संस्कृतीचा त्याग हा विशेष गुणधर्म आहे. समाजाचे व्यापक हित साधण्यासाठी वैयक्तिक आशा, आकांक्षा, मोह, अभिलाषा यांचा त्याग करणे आवश्यक आहे. स्वामीजींचे जीवन हे त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार जन्ममरणाच्या फेऱ्यामधून सुटका होऊन मोक्षप्राप्ती होणे हेच जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. परंतु स्वामीजींना वैयक्तिक मोक्षप्राप्तीचाही मोह नाही. ते म्हणतात, " परंतु आता आज मात्र मुक्तिलाभाची बिंदुमात्रही कामना माझ्या मनात नाही. जोवर एकदेखील व्यक्ती मायेमध्ये बद्ध राहील तोवर मला मुक्ती नको. " त्यागाचा हा जणू सर्वोच्च आदर्शच होय. अशा प्रकारचे त्यागपूर्ण आयुष्य जगूनच शिक्षितांना वाटचाल करावी लागेल.

     समाजसेवेबाबत योग्य धारणा ठेवून काम करणाऱ्या व्यक्तींना स्वामीजी आणखी एक गोष्ट सुचवतात ती म्हणजे एकत्र येऊन काम करण्याची म्हणजेच संघटनेची‌. भारतासारख्या विशाल देशामध्ये जर संपूर्णपणे बदल घडवायचा असेल तर एकट्या दुकट्या व्यक्तीच्या कार्याला निश्चितच मर्यादा आहेत. अशा प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तींमुळे समाजात काही बदल घडून येईलही. परंतु तो देशाच्या तुलनेत छोट्या प्रमाणावर असेल. तसेच हा बदल अशा व्यक्तीच्या आयुष्याबरोबरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून स्वामीजींनी संघटनेचा आग्रह धरला आहे. रामकृष्ण मठाच्या माध्यमातून अशा प्रकारची संघटित शक्ती निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे दिसून येते.

      समाजसेवा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या संघटनेची कार्यशैली कशी असावी याबाबतचे स्वामीजींचे विचार लक्षात घेणे आवश्यक आहे. रामकृष्ण मठाची स्थापना करत असताना स्वामीजींनी पत्रांद्वारे व प्रत्यक्ष रूपाने आपल्या गुरुबंधूंना व शिष्यांना जे मार्गदर्शन केले ते यासंदर्भात लक्षात घ्यायला हवे. अशा संघटनेमध्ये व्यक्तिमहात्म्य असू नये असा स्वामीजींचा आग्रह दिसतो. संघटनेमध्ये होणाऱ्या निर्णयांसाठी परस्परांमध्ये चर्चा व सहमती आवश्यक असल्याचे स्वामीजी सुचवतात. तसेच संघटनेचा व्यवहार पारदर्शी असावा असा त्यांचा कटाक्ष दिसतो. रामकृष्ण मठाच्या स्थापनेवेळी त्यांनी आपल्या गुरुबंधूंशी मोकळेपणाने चर्चा करून सर्वांचे मत योग्य दिशेने वळविल्याचे दिसून येते. 

      समाजसेवेच्या माध्यमातून समाजामध्ये बदल घडवून आणताना कोणत्या बाबींचा आग्रह स्वामीजींनी धरला होता हे पाहणे उचित ठरेल. स्वामीजींच्या मते प्रत्येक समाजाचे एक प्राणतत्व असते. समाजामध्ये बदल घडवत असताना हे बदल या प्राणतत्वाशी सुसंगत असेच असले पाहिजेत असा स्वामीजींचा आग्रह आहे. समाजातील बदल या प्राण तत्त्वांच्या विरोधी अशा पद्धतीने घडवले गेले तर समाजाचा नाश उडवे असा इशाराही ते देतात. भारताचे प्राणतत्व हे आध्यात्मिकता अर्थात धर्म हेच आहे असे प्रतिपादन ते करतात. यामुळे भारताच्या समाज व्यवस्थेमधील बदल हे याच प्राण तत्त्वाला अनुसरून असावे असा त्यांचा आग्रह आहे. आपल्या मद्रास (चेन्नई) येथील 'माझ्या मोहिमेची योजना' या भाषणात ते असे म्हणतात, " म्हणून भारतामध्ये प्रत्येक सुधारणेसाठी धार्मिक स्वरूपाची चळवळ प्रथम हाती घेतली पाहिजे." आपल्या विचारांना अनुसरून त्यांनी रामकृष्ण मठाच्या कार्यपद्धतीमध्ये आध्यात्मिक साधनेवर भर दिला. 

     भारताचे प्राणतत्व धर्म आहे असे सांगतानाच स्वामीजी म्हणतात, " ज्यामुळे त्या अविकारी तत्वाची अनुभूती येते तो धर्म होय. " त्याचबरोबर ते असेही म्हणतात, " बाह्य अवडंबराला धर्म समजणे अनिष्ट व विघातक आहे. आपण त्याला तात्काळ आळा घातला पाहिजे."  धर्माच्या नावाखाली चाललेल्या अनिष्ट रूढी, प्रथा यांना त्यांनी ठामपणे विरोध केला आहे. त्यांचा भर प्रत्यक्ष अनुभूती घेण्यावर आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या या विचारांचे प्रगटीकरण रामकृष्ण मठाच्या कार्यपद्धतीमध्ये दिसून येते.

    समाजसेवेच्या माध्यमातून समाजामध्ये बदल घडवत असताना एक पथ्य पाळण्याचा स्वामीजींचा आग्रह दिसून येतो. तो आहे टीकाकाराची वृत्ती सोडून देण्याचा. कायम टीकाकाराच्या भूमिकेमध्ये राहिल्याने समाजमनात दुरावा उत्पन्न होतो आणि अपेक्षित असे कार्य घडून येत नाही. स्वामीजींनी आपल्या कार्यात हे पथ्य पाळल्याचे दिसून येते.

   समाजसेवा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या अंगी महत्त्वाचा एक गुण असणे आवश्यक आहे. तो म्हणजे देशप्रेम. मनामध्ये नितांत असे देशप्रेम असेल तर देशाच्या, समाजाच्या समस्यांबद्दल आपुलकी वाटेल. या आपुलकीमधूनच प्रत्यक्ष काम करण्याची प्रेरणा उत्पन्न होईल व ती सदोदित टिकेल. स्वामीजी त्यांचा पहिला परदेश प्रवास पूर्ण करताना म्हणाले , " पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी भारतावर फक्त प्रेम करीत होतो. आता मात्र भारतातील धुळीचे कणदेखील मला पवित्र आहेत. भारताची हवा आता मला पावित्र्याने भरलेली वाटेल." या उद्गारातून त्यांच्या देशप्रेमाचे दर्शन होते. 

     देशप्रेमी समाजसेवी व्यक्तींनी कोणते ध्येय ठेवले पाहिजे याचेही मार्गदर्शन स्वामीजींनी केले आहे. त्यांच्या मते आपल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारावर संपूर्ण जगावर विजय मिळवणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. ते म्हणतात, " आपण आपल्या देशाच्या बाहेर गेले पाहिजे आणि आपल्या आध्यात्मिकतेने व तत्वज्ञानाने जग जिकले पाहिजे. " तसेच ते म्हणतात, " आध्यात्मिक विचारांनी जगावर विजय मिळवणे याचा अर्थ जीवनदायी सिद्धांताचा प्रचार करणे हा होय." स्वामीजींनी आपल्या जीवनात हेच कार्य केले असे आपल्याला दिसून येते. 

     स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रासंगिकता - आपण जेव्हा वर्तमानकाळातील भारताबद्दल विचार करू लागतो तेव्हा स्वामीजींचे विचार आजही किती उपयुक्त आहेत ते आपल्या लक्षात येते. आज आपल्या समाजापुढे दहशतवाद, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार , वाढत चाललेली आत्मकेंद्रितता यासारख्या अनेक समस्या आहेत असे दिसून येते. अनेकवेळा या समस्यांच्या विक्राळतेमुळे छाती दडपून जाते. परंतु अशा वेळी स्वामीजींच्या ' निर्भय बना ' याच संदेशाचे आपल्याला अनुकरण करावे लागेल. समाजातील व्यक्तींना अत्याचाराला सामोरे जाण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सामर्थ्यवान व्हावे लागेल आणि या अत्याचारांचा सामना करावा लागेल. शारीरिक सामर्थ्याच्या आधारावर अत्याचारी व्यक्तींना अटकाव करता येईल.

     आपल्यापुढील समस्यांच्या गुंतागुंतीमुळे काही वेळा मनात संभ्रम उत्पन्न होतो की या समस्यांना आपण उत्तर शोधू शकू की नाही? अशा परिस्थितीमध्ये स्वामीजींचा आत्मश्रद्धेचा विचार आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. 

      आज समाजामध्ये अनेक शिक्षित व्यक्ती बेरोजगार दिसतात तर अनेक शिक्षित व्यक्ती चुकीचे आचरण करताना दिसतात. अशावेळी स्वामीजींचे शिक्षण विषयक विचार आपल्या ध्यानात येतात आणि त्या अर्थाने आजच्या शिक्षणाची मर्यादा लक्षात येते. या अर्थाने आजच्या शिक्षणात बदल करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागेल.

       स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही कोट्यावधी भारतीय आज हालाखीचे आयुष्य जगताना दिसतात. अशा माणसांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर शिक्षित व्यक्तींनी गावोगाव जाऊन समाजसेवा करावी. अशा व्यक्तींनी एकत्र येऊन संघटितपणे समाजाचे दुःख दैन्य दूर करावे या स्वामीजींच्या विचारांची यथार्थता लक्षात येते.

     जागतिकीकरणाच्या आजच्या युगामध्ये विकसित देशांची उभे उभ नकल करून आपल्या समाजामध्ये तसाच बदल घडविण्याची चढाओढ पाहिली की आठवतात ते स्वामीजींचे शब्द ' आपल्या प्राण तत्त्वाच्या विरोधात जाऊन बदल घडवाल तर विनाश ओढवेल'. यामुळे पुन्हा लक्षात येते की भारताला आपला वेगळा मार्ग शोधावा लागेल.

     समाजातील आत्मकेंद्रिततेचे वाढणारे प्रमाण पाहताना व्यक्तीच्या मनातील देशप्रेम जागूनच याला उत्तर देता येईल असे लक्षात येते. 

    आजच्या व्यामिश्र स्वरूपाच्या जागतिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर स्वामीजींचे अध्यात्मिक व तात्विक विचार जगाला मार्गदर्शक ठरतील. या सगळ्यामुळेच स्वामीजींचे विचार आजही दीपस्तंभ सारखे मार्गदर्शक आहेत हे लक्षात येते. याच विचारांच्या प्रकाशात पुढची वाटचाल उत्साहाने करावी लागेल. ही वाटचाल करत असताना स्वामीजींची भविष्यवाणी प्रेरणा देत राहील. ते म्हणतात, " उठा, जागे व्हा आणि आपल्या ह्या भारत मातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुन्हा विराजमान झालेली पहा. तिच्यात नवचैतन्याचा संचार होऊ द्या आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल अशा अपूर्व नवचैतन्याचा संचार होऊ द्या.'

( म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने २२-२३ फेब्रुवारी २०१३ यादिवशी आयोजित केलेल्या ' मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया ' या राष्ट्रीय परिषदेत प्रसिद्ध केलेला निबंध)


सुधीर गाडे, पुणे 

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख