काहीतरी केल्याचे समाधान
काही दिवसांपूर्वी दुचाकीवरून चाललो होतो. एका चौकात सिग्नल लाल झाला म्हणून थांबलो. नेहमीप्रमाणे गाडी बंद केली. वाटले, तेवढेच थोडे प्रदूषण कमी झाले. आजूबाजूला लक्ष गेले आणि पाहिले तेव्हा आजूबाजूच्या सर्व दुचाकी गाड्या सुरूच होत्या.
तशाच चारचाकी गाड्यादेखील सुरू होत्या. मनात विचार आला , आपल्या गाडी बंद करण्यामुळे प्रदूषणात किती घट होईल बरे ? पुणे शहराचा विचार केला तर शहरात चारचाकी आणि दोनचाकी गाड्या यांच्या संख्येत फार मोठा फरक नाही. आजकाल सर्व चारचाकी गाड्या एसी असतात आणि तो एसी सर्व वेळ चालू असतो. त्यामुळे सिग्नलला चार चाकी गाडी बंद करता येत नाही. दोन चाकी गाड्या चालवणारे बरेच जण गाडी तशीच सुरू ठेवतात. त्यामुळे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये एखाद दुसऱ्या व्यक्तीने जर सिग्नलला गाडी बंद केली तर फार फरक पडणार नाही.
प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रदूषणात भर घालणारा असाच एक मोठा घटक म्हणजे औद्योगीकरण. कारखान्यांमधून बाहेर पडणारे धूर, वायू हे किती प्रदूषण करतात हे अनेक ठिकाणी पाहता येते. याबाबत सरकारी नियम अनेक आहेत. परंतु प्रत्यक्षात काय स्थिती आहे ते स्पष्ट दिसते. याचबरोबर कारखान्यांमधून बाहेर पडणारे पाणी हे प्रक्रिया करून जलस्रोतात सोडले पाहिजे हा नियम किती काटेकोरपणे पाळला जातो हे आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते. अनेक ठिकाणचे जलस्रोत किती प्रदूषित झाले आहेत याचा अनुभव त्या जलस्रोताच्या आजूबाजूच्या लोकांना येतो. अनेक वर्षांपूर्वी पुण्यातील डॉ. विश्वास येवले यांची भेट झाली होती. ते आळंदी ते पंढरपूर असा जलदिंडीचा उपक्रम चालवतात. ते म्हणाले की, " मी महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा यॉटिंग या नौकानयनाच्या शर्यतीत भाग घ्यायचो. नाव चालवत असताना तहान लागली तर आम्ही मुठा नदीचे पाणी ओंजळीने पीत होतो." आता पुणे शहरातील मुठा नदी किती स्वच्छ, शुद्ध आहे हे पुणेकरांना चांगलेच माहिती आहे. अशीच परिस्थिती भारतातील बऱ्याच नद्यांची आहे.
जगासमोर जो पर्यावरणाचा प्रश्न आहे त्याचे मूळ कशात आहे याचा विचार केला की लक्षात येते ते मूळ विचारसरणीत आहे. पाश्चात्य विचारसरणीनुसार पुरुष हा जगाचा मालक मानला गेला आहे. सर्व गोष्टी त्याच्या उपभोगासाठी निर्माण झाल्या असे मानले गेले आहे. त्यामुळे सर्व गोष्टींचा मनाला येईल तसा उपभोग घेण्याचा त्याला अधिकार आहे असले असे मानले जाते. यातून तशाच प्रकारची कृती घडते आणि निसर्गाचे शोषण होते. परंतु भारतीय विचारसरणीनुसार माणूस हा चराचर सृष्टीचा घटक मानला गेला आहे. त्यामुळे माणसाने चराचराशी सुसंगत असे सहजीवन जगले पाहिजे अशी अपेक्षा असते. भारतीय विचार निसर्गाच्या शोषणाचा नसून दोहनाचा आहे. याप्रमाणे व्यवहार झाला तर पर्यावरणाचा प्रश्न सुसह्य होईल असे वाटते.
पर्यावरणाशी संबंधित अन्य छोट्या छोट्या गोष्टी करताना मनात विचार येत राहतो. उदाहरणार्थ टिश्यू पेपर कमी वापरणे , येता-जाता विजेचे दिवे, उपकरणे इ. बंद ठेवणे , पाठकोरे कागद वापरणे, बादलीमध्ये पाणी घेऊन कमी पाण्यामध्ये आंघोळ करणे. या साऱ्यातून ऊर्जा, वीज, पाणी यांची बचत होत राहते. परंतु जगासमोरचा पर्यावरणाचा प्रश्न इतका बिकट झाला आहे की त्याचे भयंकर परिणाम आता प्रत्यक्ष अनुभवाला येत आहेत. नुकताच एक व्हिडिओ पाहिला. विल नावाची एक व्यक्ती २०० उपग्रहांच्या मदतीने गेली अनेक वर्षे पृथ्वीच्या पृष्ठभागाची दररोज ४० लाख छायाचित्रे घेते. त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. यातून पृथ्वीच्या पाठीवरील वनराई गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून येते. तसेच ध्रुवांवरचे बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळले आहे हे लक्षात येते. या सगळ्या अति गंभीर परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने काही काळ आपली दुचाकी बंद ठेवली तर नेमका किती परिणाम होईल हा मुद्दा अगदी विचार करण्याजोगा आहे. एकूण प्रश्नाच्या तुलनेत फारच किरकोळ परिणाम होईल. परंतु तरीदेखील असे करत राहायचे कारण त्यामुळे काहीतरी केल्याचे समाधान मिळते.
यासंदर्भात एक गोष्ट आठवली. एकदा जंगलाला वणव्यामुळे आग लागली. त्यामुळे सर्व प्राणी , पक्षी सैरावैरा पळू लागले. परंतु एक छोटी चिमणी जवळच्या पाणवठ्यावरून चोचीत पाणी घेऊन वणव्यावर ओतत होती. त्यावेळी अन्य पक्षांनी तिला विचारले की, " एवढ्या मोठ्या आगीमध्ये तुझ्या चोचभर पाण्याने काय बरं परिणाम होईल?" त्यावेळी ती म्हणाली, " माझ्या चोचभर पाण्याने काय बरं परिणाम होईल यापेक्षा नंतर जेव्हा कोणीतरी आग लागल्यावर कोण काय करत होते याची नोंद ठेवील त्यावेळी माझे नाव सैरावैरा पळणाऱ्यांमध्ये येणार नाही तर आग विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये येईल."
हे समाधान काही वेगळेच आहे.
सुधीर गाडे, पुणे
आपण आपल्या पुर्वजांनी व ऋषीमुनींनी सांगितलेल्या मुल्ल्यांपासुन दूर गेलो आहे, त्याचाच हा परिणाम आहे. अतिशय सुंदर विचार. धन्यवाद सर.
ReplyDeleteहोय डॉक्टर.
Deleteप्रतिक्रियेसाठी आभार