म.ए.सो.चे महानाट्य 'वज्रमूठ' साकारताना

 

    संपूर्णपणे भारतीयांनी सुरू केलेली आणि आजदेखील विस्तार पावत असलेली शैक्षणिक संस्था अशा दोन विशेषणांनी वर्णन केले तर ते बहुदा आमच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेला लागू ठरेल. संस्थेने सन २०२० मध्ये आपल्या वाटचालीचा शतकोत्तर हीरक महोत्सवी म्हणजे १६० वर्षांचा टप्पा पार केला. यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम संस्थेने आखले होते. परंतु कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ते सर्व उपक्रम त्याच वर्षी पूर्ण करणे शक्य झाले नाही. यातील बहुतेक सर्व उपक्रम नंतर पूर्ण झाले. एक उपक्रम राहिला होता तो म्हणजे संस्थेची स्थापना करणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांची संस्था स्थापनेमागे असलेली भूमिका, त्यांनी केलेला त्याग आणि संघर्ष महानाट्याच्या रूपात साकारणे. त्याची तयारी २०१९ मध्येच सुरू झाली होती. संस्थेच्या नियमक मंडळाचे माजी सदस्य श्री भालचंद्र पुरंदरे यांचा महानाट्य याविषयातील अनुभव लक्षात घेऊन संस्थेच्या नियमक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी हे महानाट्य लिहिणे आणि साकार करणे ही कल्पना पुरंदरे सरांना सुचवली होती. पुरंदरे सरांनी याविषयाशी संबंधित अनेक पुस्तके वाचून आणि वेगवेगळ्या व्यक्तिंशी बोलून महानाट्याची संहिता लिहिली. या सगळ्यात त्यांच्या पत्नी सौ.गौरी पुरंदरे यांची भक्कम साथ त्यांना झाली. तसेच म.ए.सो.मुलांचे विद्यालय (भावे हायस्कूल) मधील ग्रंथपाल श्रीमती गायत्री जवळगीकर यांनीदेखील पुरंदरे सरांना मदत केली.  काही महिन्यांपूर्वी २०२१ मध्ये एके दिवशी पुरंदरे सरांचा निरोप आला आणि राजीवजी आणि मी संध्याकाळी त्यांच्या घरी पोचलो. पुरंदरे सरांनी त्यादिवशी जवळपास दीड तास आम्हाला ती संहिता प्रभावीपणे ऐकवली. तेव्हाच त्या संहितेच्या परिणामकारकतेची आम्हाला कल्पना आली. एक जुनी कविता आहे ' दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो'. पुरंदरे सरांचे घर टेकडीवरच आहे. मला वाटले ' भालचंद्र (पुरंदरे) डोंगरी राहतो भव्यता नाट्याची पाहतो.' पुरंदरे सरांकडून संहितेची वही घेऊन आलो आणि ती संहिता टंकित करून घेतली.

     


    कोविडमुळे २०२१ मध्येदेखील महानाट्य प्रत्यक्षात आणणे शक्य झाले नाही. पण २०२२ मध्ये परिस्थिती बदलली. महानाट्याबबतचा पुढचा विचार सुरू झाला. संस्थेने नियामक मंडळाच्या मा.उपाध्यक्ष श्रीमती आनंदीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि पुढचे काम सुरू झाले. एके दिवशी महानाट्याची संहिता श्रीमती आनंदीताई पाटील, संस्थेच्या इतिहास ग्रंथाच्या लेखिका डॉ.केतकी मोडक आणि मी परत एकदा ऐकली. या संहितेमध्ये आम्ही काही सुधारणा सुचवल्या. पुरंदरे सरांनी त्या लिहून घेतल्या आणि त्याप्रमाणे बदल केले.‌ अर्थात सौ.गौरीकाकू यात बरोबर होत्याच.

    साधारण जुलै २०२२ मध्ये याचा पुढचा टप्पा सुरू झाला. संस्थेच्या पुण्यातील म.ए.सो.कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या  प्राध्यापकांना या प्रक्रियेत सामावून घेतले. त्यांच्यासोबत महानाट्य संहितेचे वाचन परत एकदा झाले. पुन्हा काही सूचना करण्यात आल्या. आता संहिता तयार झाली.  आता पुढचा टप्पा सुरू झाला तो म्हणजे कलाकारांच्या निवडीचा. संस्थेच्या पुण्यातील विविध महाविद्यालयातील कला मंडळ प्रमुखांची एक बैठक पुरंदरे पतीपत्नींच्या उपस्थितीत घेण्यात आली आणि कलाकारांच्या निवडीचे तसेच महानाट्याच्या पुढील वाटचालीचे टप्पे ठरवून त्याप्रमाणे काम सुरू केले गेले.

    याच कालावधीत महानाट्याला संगीत देण्यासाठी, त्याची ध्वनीफीत तयार करण्यासाठी योग्य व्यक्तिचा शोध सुरू झाला. वेगवेगळी नावे समोर आली. यातून एक नाव निश्चित झाले ते म्हणजे श्री.अभिषेक शाळू याचे. पुरंदरे सर डे.ए.सो.च्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेचे मुख्याध्यापक असताना अभिषेक त्यांचा विद्यार्थी होता. तर म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेत शिकलेला अभिषेक म.ए.सो.गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधून २०१० मध्ये तो बी.कॉम झाला होता. त्यानंतर सीएस, एल एल एम चे शिक्षण घेतलेल्या अभिषेकडे 'क्रांतिसूर्य सावरकर', 'स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ' या पुण्यात झालेल्या पूर्वीच्या महानाट्यांचा अनुभव होता. आता अभिषेकदेखील महानाट्याच्या प्रक्रियेत सहभागी झाला.

    


   आता सुरू झाली महानाट्यात वाचिक अभिनय, कायिक अभिनय, नृत्य, संगीत यात सहभागी होण्यासाठीची निवड. संस्थेच्या पुण्यातील म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय, म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, म.ए.सो.सिनियर कॉलेज, म.ए.सो.आय.एम.सी.सी. यातील विद्यार्थ्यांमधून निवड सुरू झाली. या प्रक्रियेत या महाविद्यालयांतील वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रथम वाचिक अभिनयासाठी कलाकार निश्चित झाले. या प्रक्रियेत म.ए.सो.कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् मधील  प्रा.रश्मी देव, प्रा.वृषाली लेले, प्रा.सुखदा दीक्षित, प्रा.अबोली थत्ते, समन्वयक श्री.आदित्य देशमुख, श्रीमती पौरवी साठे आणि इतर कलाकारांची खूप मदत झाली. पुण्यातील झंकार स्टुडिओत याचे ध्वनीमुद्रण झाले. संवाद ध्वनीमुद्रित करत असताना प्रसंगांच्या आवश्यकतेनुसार पुरंदरे सरांनी काही नवीन संवाद लिहून दिले.कलाकारांनी ध्वनीमुद्रण केले. संगीतसंयोजनाची जबाबदारी पार पाडली श्री.होनराज मावळे या पुण्यातील गुणी तरूण कलाकाराने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने नादमधुर , प्रभावी असे संगीतसंयोजन पूर्ण केले.

    याचा पुढचा टप्पा म्हणजे तयार झालेली ध्वनीफीत ऐकणे.एके दिवशी म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयात संस्थेचे पदाधिकारी मा.राजीवजी सहस्रबुद्धे, डॉ.माधवी मेहेंदळे, डॉ.भरत व्हनकटे, डॉ.केतकी मोडक, डॉ.गोविंद कुलकर्णी आणि मी यांच्या उपस्थितीत पुरंदरे सर सौ.पुरंदरे आणि अभिषेकने ही ध्वनीफीत ऐकवली. उपस्थित सर्वांना ती खूप प्रभावी झाल्याचे लक्षात आले. काही आवश्यक दुरुस्त्या सुचविल्या गेल्या. त्या पुढच्या काही दिवसात करुन घेतल्या गेल्या. 

    नंतर तयारी सुरू झाली ती रंगमंचावर काम करू शकणाऱ्या कलाकारांची निश्चिती‌ करण्याची. त्यासाठी म.ए.सो.च्या पुण्यातील महाविद्यालयांच्या कला मंडळ प्रमुखांना, शाळांमधील शिक्षकांना सूचना गेल्या.म.ए.सो.परफॉर्मिंग आर्टस् कॉलेजमधील प्राध्यापकांबरोबरच अन्य शाळा महाविद्यालयांतील प्रा.अर्चना जोशी, प्रा.सुरेखा वैद्य, प्रा.संतोष मोटेगावकर, प्रा.चेतना देसाई, प्रा.रश्मी मोरे, श्रीमती शिल्पा गायकवाड, श्रीमती धार्मिक, श्रीमती सुवर्णा काळे, श्रीमती रत्नमाला कांबळे , श्रीमती वैशाली उपासनी हे सगळेजण आणि अन्य शिक्षक या प्रक्रियेत सहभागी होते. यापैकी बहुतेकजणी समूहदृश्यांमध्ये कलाकार म्हणून सहभागी झाल्या. तसेच संस्थेच्या महाविद्यालयांतील प्रा.प्रणव कुलकर्णी डॉ.अजिंक्य देशपांडे हे सुरूवातीला आणि नंतर प्रा.स्वप्नील सोनवणे कलाकार म्हणून सहभागी झाले. निवड सुरू झाली. पण दिवाळीच्या सुट्टीतील काही दिवस ते काम पुढे जाऊ शकले नाही. दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा ते काम २९ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाले. १ नोव्हेंबरला म.ए.सो.मुलांचे विद्यालय(भावे हायस्कूल) येथे प्रमुख भूमिकांतील काही कलाकारांच्या उपस्थितीत नाटकाच्या तालमी दररोज सुरु झाल्या. विविध कला मंडळातील कलाकार रोज तासनतास तालीम करू लागले. याच वेळी महानाट्याच्या सुरूवातीला आणि शेवटी असलेल्या नृत्याची तयारी वेगळ्या ठिकाणी सुरू झाली. यावेळी शाळांची दिवाळी सुट्टी संपलेली नसल्याने शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभागी होऊ शकत नव्हते.शाळांच्या दिवाळी सुट्टी संपल्यावर शाळांमधील शिक्षक शिक्षिकांच्या मदतीने मुलेमुली महानाट्याच्या तालमीत सहभागी होऊ लागल्या. मुलामुलींना आपापल्या शाळांतून तालमीसाठी आणणे, तालीम संपल्यावर सर्वजण सुखरूप घरी पोचतील असे पाहणे यात या सर्वांनी महत्वाची भूमिका पार पाडली. मुलामुलींच्या पालकांचे चांगले सहकार्य यात मिळाले. त्यामुळे तालमीला रंग भरू लागला.नंतर या कामात संस्थेच्या श्रीमती वर्षा न्यायाधीश, श्रीमती पूजा सप्तर्षी, श्रीमती गायत्री जवळगीकर मदतीसाठी सहभागी झाल्या.

   एक गोष्ट अजून पाहिजे तेवढी चांगली होत नव्हती ती म्हणजे समूहदृश्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग आणि नेपथ्य मांडणी,हलवाहलव यासाठी पडद्यामागे काम करणारे स्वयंसेवक यांची पुरेशी संख्या. पुरंदरे सर आणि अभिषेकने हे लक्षात आणून दिल्यावर डॉ.गोविंद कुलकर्णी आणि मी वेगवेगळे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक आणि शिक्षक यांच्याशी बोललो. पाठपुरावा केला. एक दोन दिवसात ही संख्या पुरेशी झाली आणि तालीम आता आणखी चांगली होऊ लागली. यात काही वेळा अनियमित असणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे प्रश्न निर्माण होत होते. पण अभिषेक आणि पुरंदरे सर न कंटाळता, वैतागता तालीम घेतच होते.



   एकीकडे तालीम सुरू असताना दुसरीकडे महानाट्यासाठी आवश्यक अन्य व्यवस्था करणाऱ्या व्यक्ती, कंपन्या निश्चित करण्याचे काम सुरू होते. महानाट्य समितीच्या मा.अध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार 'मल्हार प्रॉडक्शनचे'श्री. महेश लिमये यांना ध्वनी, छायाचित्रण, चित्रीकरण,प्रक्षेपण याची , 'डिलाइटसचे'श्री. तेजस देवधर यांना प्रकाश व्यवस्थेची, 'मनोरंजन' यांच्याकडे नेपथ्य साहित्याची, 'पोटे मंगल केंद्राचे'श्री. चंद्रकांत पोटे यांना रंगमंचाची, 'जाधव नाट्य संसार' यांना वेशभूषेची , श्री.केदार सोनपाठकी आणि अरविंद सूर्य यांना रंगभूषेची जबाबदारी देण्यात आली.यामध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सचिन आंबर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मदत झाली.

   या तांत्रिक बाबींबरोबरच महानाट्याच्या कार्यक्रमासाठी निमंत्रणे देणे, जाहिरात करणे, प्रेक्षकांसाठी आवश्यक वेगवेगळ्या व्यवस्था करण्याची तयारी संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि वर्धापनदिन समितीचे सदस्य डॉ.मानसी भाटे, श्री.सुधीर भोसले यांच्या मदतीने सुरू झाली. महानाट्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून म.ए.सो.च्या माजी विद्यार्थिनी प्रसिद्ध नृत्यांगना श्रीमती मनिषाताई साठे यांना निमंत्रण दिले गेले. अतिशय आपुलकीने त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले. 

    येणाऱ्या छोट्यामोठ्या अडचणींवर मात करत तालीम उत्साहात सुरू होती. आवश्यकतेप्रमाणे संस्थेच्या विविध घटकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. वेशभूषा, नेपथ्य याचे साहित्य आणण्यात आले. तालीम चांगली आकार घेऊ लागली. शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमस्थळी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे रंगीत तालीम घेण्यात आली. जवळपास २५० च्या संख्येत असलेल्या कलाकारांना रंगमंचाचा अंदाज आला.या तालमीतच दुसऱ्या दिवशी जास्त वेळ तालीम घ्यायचे ठरले.

     संस्थेच्या वर्धापनदिनी १९ नोव्हेंबर २०२२ला दीर्घ तालीम झाली. प्रसिद्ध कलाकार आणि म.ए.सो.कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे सल्लागार श्री.योगेश सोमण हे या तालमीला उपस्थित होते. तालीम पाहून त्यांनी काही सूचना केल्या. ही तालीम झाल्यावर सगळ्यांचा उत्साह वाढला. आता प्रत्यक्ष प्रयोगाला जेमतेम २० तास उरले होते. 



    एवढ्या सगळ्या तयारीनंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाचा दिवस रविवार २० नोव्हेंबर २०२२ उजाडला. सकाळपासूनच गणेश कला क्रीडा मंच येथे वेगवेगळ्या व्यवस्था करणारे, कलाकार, संस्थेचे कर्मचारी पदाधिकारी यांची लगबग सुरू झाली. एक एक व्यवस्था पूर्ण होऊ लागल्या. साधारण दुपारी एकच्या सुमाराला शेवटची तालीम सुरू झाली. शाळांमधील वयवर्षे १० असणारे मुलेमुली ते ६५ वयाचे पुरंदरे सर या जवळपास २५० कलाकारांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका,  संस्थेचे पदाधिकारी श्रीमती आनंदीताई पाटील, डॉ.मानसी भाटे, डॉ.गोविंद कुलकर्णी, मी असे सर्वजण सहभागी होतो.ही तालीम जवळपास ३ वाजेपर्यंत चालली. भुकेलेल्या सर्वांनी दुपारचे भोजन घेतले. त्यानंतर सर्वजण प्रत्यक्ष प्रयोगाच्या दृष्टीने शेवटच्या तयारीला लागले.

   याबरोबरच कार्यक्रमासाठीच्या अन्य व्यवस्था संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारी, शाळा महाविद्यालये यातील कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्या. सर्वत्र तयारीची लगबग चालू होती.

    दुपारी ४ वाजल्यापासून हळूहळू संस्थेचे कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, निमंत्रित, मान्यवर यांनी सभागृह भरू लागले. सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी सुरूवातीचा कार्यक्रम सुरू झाला. तो आटोपशीर कार्यक्रम जवळपास ४५ मिनिटांत पूर्ण झाला. श्रीमती मनिषाताई साठे, संस्थेचे मा.अध्यक्ष एअर मार्शल भूषणजी गोखले (निवृत्त) , श्रीमती आनंदीताई पाटील, पुरंदरे सर या मान्यवरांच्या मनोगताबरोबरच म.ए.सो.चे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री.वामन प्रभाकर भावे आणि श्री.लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या वशंजांच्या कृतज्ञ सत्काराने हा कार्यक्रम हृद्य झाला. 

   आता काहीच मिनिटे उरली होती. सर्वजण तयार होतेच. शेवटच्या क्षणी काही अनपेक्षित तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्या दूर करण्यात आल्या आणि सव्वासहाच्या सुमाराला म.ए.सो.चे महानाट्य 'वज्रमूठ' याचा प्रत्यक्ष प्रयोग सभागृह आणि बाहेर उपस्थित असलेल्या सुमारे ४५०० प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू झाला. पहिल्या मिनिटापासूनच महानाट्याने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली. सर्वच दृष्टीने दर्जेदार झालेला हा प्रयोग प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अधिकच रंगत गेला. महानाट्य संपल्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आम्हा सर्वांचे कौतुक केले. मन समाधानाने अगदी भरून आले. प्रयोग संपल्यावर त्याठिकाणी प्रत्यक्ष भेटून, नंतर दूरध्वनी, संदेश यामाध्यमातून कौतुकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. 

'वज्रमूठ' हे महानाट्य साकारताना प्रथमपासूनच कायावाचामनाने महानाट्यात रमलेले पुरंदरे पतीपत्नी, मला महानाट्यासाठी एकटा राहू द्या म्हणणारा, न चिडता कंटाळता सुमारे २५० जणांकडून काम करून घेणारा अभिषेक शाळू, महानाट्यात सहभागी कलाकारांच्या अल्पाहाराकडे ममतेने लक्ष देणाऱ्या आनंदीताई, पहाटेपासून संस्थेच्या कामासाठी बाहेरगावी गेलेले असताना, घरी तापाने फणफणलेला मुलगा असताना रात्री घरी जाण्यापूर्वी 'काही काम आहे का?' असे विचारणारे गोविंद कुलकर्णी, मला वासुदेव बळवंत फडके पुरेशा प्रभावीपणे साकारता येत नाहीत म्हणून जिथे वासुदेव बळवंत फडके राहत होते त्या मंदिरात जाऊन एकाग्र होणारे , प्रत्यक्ष प्रयोगात उत्कटतेने भूमिका साकारणारे प्रणव कुलकर्णी, ' प्रणव कुलकर्णी हेच वासुदेव बळवंत फडके म्हणून शोभतील' असे सुचवणारे, महानाट्यात कायिक, वाचिक अभिनय करणारे अजिंक्य देशपांडे, भावे हायस्कूलमधील उत्साही, चंचल,‌खोडकर पण प्रत्यक्ष प्रयोगात बिनचूक काम करणारी मुले, मनापासून व्यवस्थित काम करणाऱ्या म.ए.सो.सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला आणि म.ए.सो.रेणुका स्वरूप प्रशालेतील मुली, शिस्तीने महानाट्यातील दृश्यात सहभागी होणाऱ्या म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुली आणि मुले, महानाट्याच्या आदल्या दिवशी एका फोनवर मुद्गल उपलब्ध करून देणारे भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी, माजी नगरसेवक धीरज घाटे, इतर नाट्य स्पर्धांमध्ये एकमेकांशी  स्पर्धा करणारे, महानाट्याची तालीम सुरू होताना एकमेकांबद्दल पूर्वग्रह असलेले पण महानाट्य संपताना एकमेकांचे चांगले मित्र मैत्रिणी झालेले महाविद्यालयातील विद्यार्थी, आपल्या शाळेतील मुली सुखरूप घरी पोचल्या ना याची काळजी , महानाट्याची ओळन ओळ तोंडपाठ असलेले विद्यार्थी, उशीरा महानाट्यात सामील होऊनही बिनचूक नेपथ्य व्यवस्था करणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्रत्यक्ष कुस्तीपेक्षा महानाट्यातील कुस्ती खेळण्याच्या प्रसंगाचा ताण जास्त वाटतो म्हणणारा पैलवान विद्यार्थी हे आणि असे अनेक अनुभव आले. त्याने मन संपन्न झाले. हे महानाट्य साकारताना आम्हाला संस्थापकांच्या प्रयत्नांची, कष्टांची , त्यागाची ' अनुभूती ' आली. हा अविस्मरणीय अनुभव कायमच आनंद आणि समाधान देत राहील.


या महानाट्याचा व्हिडिओ 👇

https://youtu.be/o6-7ECSTfes


सुधीर गाडे, सहसचिव , महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे 

Comments

  1. सुरेख.. सादरीकरण... प्रत्येक शब्दाने डोळयासमोर अदभूत जिवंत प्रसंग ऊभे राहिले...

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर. अतिशय विस्तृतपणे प्रत्येक प्रसंगाची आठवण ठेवून वर्णन केलेले आहे त्यामुळे ह्या महानाट्याची जडणघडणीत प्रत्यक्ष सहभाग नसला तरी सहभागी असल्यासारखेच वाटते हे शिवधनुष्य पेलणाऱ्या सर्व सहभागींना धन्यवाद आणि अभिनंदन व खूप खूप कौतुक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख