एका प्रेरणादायक आणि आनंददायक प्रक्रियेतला सहभाग


     " सुधीरजी , तुम्हाला यावर्षीच्या 'बाया कर्वे पुरस्कार ' निवड समितीमध्ये सदस्य म्हणून काम करायचे आहे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे मा.कार्याध्यक्ष श्री. रवी देव यांचा मला फोन आला. त्यांनी आग्रहपूर्वक केलेल्या सूचनेला नकार देणे हा पर्यायच नव्हता. तेव्हापासून या प्रक्रियेत मी सहभागी झालो. 


    गेली २६ वर्षे सलगपणे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलेला दरवर्षी २९ नोव्हेंबर या दिवशी 'बाया कर्वे पुरस्कार'  दिला जातो. हा पुरस्कार कोणाला द्यायचा यासाठी दरवर्षी वेगवेगळी समिती नेमली जाते. यावर्षीच्या २७ व्या पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिताताई घैसास , राष्ट्र सेविका समितीच्या श्रीमती पौर्णिमाभाभी शर्मा यांच्याबरोबर  सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. समितीच्या बैठका सुरू झाल्या. या बैठकांमध्ये आमच्याबरोबरच श्री.रवी देव, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विद्याताई कुलकर्णी,  संस्थेचे सचिव डॉ. पी.व्ही. एस .शास्त्री हे देखील सहभागी होऊ लागले.  संस्थेच्या कार्यालयातील श्रीमती शिल्पा डुंबरे यात संपर्क, समन्वय याचे काम करत होत्या.

  महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महिलांची माहिती आम्ही सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने मिळवू लागलो. समितीच्या बैठकांमध्ये या सर्व महिलांच्या कामाची माहिती घेऊन त्याबाबत चर्चा करण्यात आली. ज्यांची नावे आमच्या पुढे विचारार्थ आली त्या सर्वच जणी आपापल्या क्षमतेने आपापल्या परिसरामध्ये महिला सक्षमीकरणासाठी वर्षानुवर्षे कार्य करत आहेत . सर्वांचे काम इतके महत्त्वाचे आणि चांगले आहे ही कोणाचे नाव निवडावे हा एक प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला.

    श्रीमती पौर्णिमाभाभी शर्मा यांच्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून छत्तीसगडच्या अबुझमाड या नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीमती बुधरी ताती यांचे नाव समोर आले. आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षी गुरूंच्या आशीर्वादाने सामाजिक कामाची सुरुवात करून श्रीमती बुधरी ताती यांना जवळपास चार दशके होऊन गेली आहेत. वनवासी कल्याण आश्रम आणि राष्ट्र सेविका समिती यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कातून त्या नागपूरला जवळपास एक वर्ष राहिल्या. सामाजिक कामाची प्रेरणा त्यातून बळकट झाली. आयुष्याचे ध्येय ठरले. नागपूरवरून परतल्यानंतर त्यांनी स्वतःच्या घराबाहेर पडून आपल्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला जनजाती क्षेत्रातील पाड्यांवर पायी फिरून त्यांनी समाज जागृती करण्यास सुरुवात केली. जवळपास सहाशे पाड्यांवर त्यांचा संपर्क झाला. त्या भागातील स्त्रियांना तसेच इतरांना स्वच्छतेच्या सवयी लावणे, अंधश्रद्धांमधून दूर करणे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी म्हणून रोजगाराची निर्मिती करणे, औपचारिक शिक्षणाची सुरुवात करणे , आरोग्यविषयक उपक्रम हाती घेणे,  पारंपरिक धर्मश्रद्धा बळकट करणे , आपमतलबी लोकांच्या जाळ्यात भोळ्याभाबड्या जनजातीयांनी अडकू नये यासाठी प्रयत्न करणे असे विविध प्रकारचे उपक्रम त्यांनी हाती घेतले. निश्चयाने आणि चिकाटीने त्या काम करत आहेत. सुरुवातीला असणारा विरोध,  उपेक्षा स्वतःच्या संयमित आचरणाने, चिकाटीने त्यांनी बदलून टाकला. समाजकार्य हे एकमात्र ध्येय अंगीकारल्यामुळे त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा मेळा जमत गेला. या दीर्घ प्रवासात शस्त्रधारी नक्षलवाद्यांशी सामना करण्याचे, गैरसमजुतीने जीवावर उठलेल्या आपल्या समाजबांधवांच्या रोषाला सामोरे जाण्याचे, आपमतलबी धर्मप्रचारकांबरोबर सामना करण्याचे प्रंसगही आले. पण ' आपले कार्य हे ईश्वरी कार्य आहे ' या श्रद्धेने त्या या सर्व प्रसंगांना खंबीरपणे सामोऱ्या गेल्या आणि सुखरूप बाहेर पडल्या. होणारी उपेक्षा, विरोध मावळून समाजबांधवांनी त्यांना आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून स्वीकारले. त्यांच्या कार्यक्षेत्रात हळूहळू समाजपरिवर्तन होत गेले. समाजाचे जीवनमान उंचावले. श्रीमती बुधरीजी यांच्या कार्याची माहिती माहिती मिळाली आणि आम्ही भारावून गेलो आणि एकमताने हे नाव निश्चित झाले. 

   श्रीमती बुधरीजी यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आला आणि त्यांची पुरस्कार स्वीकृतीसाठी संमती घेण्यात आली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने अन्य आवश्यक सर्व गोष्टी पूर्ण करण्यात आल्या.

 मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी संस्थेच्या रमा पुरूषोत्तम संकुलातील खुल्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. कार्यक्रमापूर्वी श्रीमती बुधरीजी आणि त्यांच्या सहकारी श्रीमती शांतीदेवी यांच्याशी चहापानाच्यावेळी अनौपचारिक गप्पा झाल्या. दोघींचाही साधेपणा, प्रांजळपणा, तळमळ हे गुण सर्वांच्या मनाला स्पर्शून गेले. माझ्या मनात सारखे येत होते, ' एवढे व्यापक, मोठे काम करणाऱ्या श्रीमती बुधरीजी यांची निवड करणारा मी कोण? मी केवळ निमित्तमात्र तिथे उपस्थित आहे.' 

   पुरस्कार देण्याचा कार्यक्रमही संस्मरणीय झाला. कर्वे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी म्हटलेली सुरेल प्रार्थना, श्री.रवी देव यांचे प्रास्ताविक, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी करून दिलेला निवड समितीचा परिचय, श्रीमती पौर्णिमाभाभी शर्मा यांनी करून दिलेला पुरस्कारार्थीचा परिचय, पुरस्कार प्रदान सोहळा, श्रीमती बुधरीजी यांचे प्रांजळ , कळकळीचे बोलणे, पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे विचारप्रवर्तक भाषण, डॉ.शास्त्री यांचे आभारप्रदर्शन, विद्यार्थ्यांनी म्हटलेले सुरेल वंदेमातरम् हे सर्व कायमच लक्षात राहील.  कार्यक्रमाच्या ठिकाणी काढलेली फुलांची मनोहर रांगोळी, व्यासपीठ व्यवस्था, तांत्रिक बाबींची जोड हे सगळे चांगले होते.

   पुरस्कार वितरण सोहळा संपल्यावर सर्वांसाठी संस्थेच्या वसतिगृहाच्या भोजनालयात सहभोजनाचे आयोजन केले होते. या भोजनात कार्यक्रमाच्या अध्यक्षांपासून ते कार्यक्रमाची व्यवस्था करणाऱ्या कंत्राटी कामगारांपर्यंत सर्वजण सहभागी होते. हे बघून समरसतेचा आपुलकीचा एक वेगळा अनुभव मिळाला. आधीच्या उत्तम कार्यक्रमाने मन तर तृप्त झाले होतेच. त्यानंतरच्या सुग्रास भोजनाने पोटही तृप्त झाले.  एका प्रेरणादायक आणि आनंददायक प्रक्रियेची ही सांगता झाली. ही प्रक्रिया सदैव स्मरणात राहील.


सुधीर गाडे, पुणे 

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख