लग्नसोहळ्यातील गमतीजमती

    'तोरणदारी आणि मरणदारी जायलाच हवे' अशी आपल्याकडे जनरूढी आहे. तोरणदार म्हणजे ज्यांच्याकडे मंगल प्रसंग विशेषत: विवाह सोहळ्याचा प्रसंग आहे असे घर. अशाच काही लग्नसोहळ्यातील मी अनुभवलेले हे थोडे गमतीचे प्रसंग.




  मी महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राच्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचा प्रसंग आला. त्याकाळी लग्नमंडपात खुर्च्या टाकण्याची फार पद्धत नसे. जमीनवरच गाद्या, सतरंज्या टाकलेल्या असत. लग्नातील शेवटची मंगलअष्टका झाल्यावर लोक जागेवरच डावीउजवीकडे फिरून बसत आणि जेवणासाठी पंगती तयार होत. आम्ही या लग्नात पहिल्या पंगतीला जेवायला बसायचे असे ठरवून गेलो होतो. लग्न लागले. आम्ही जेवढ्या तयारीत होतो त्यापेक्षा अन्य वऱ्हाडीमंडळी जास्त तयारीत होते. त्यामुळे आम्हाला पहिल्या पंगतीला बसायला जागा मिळाली नाही. म्हटलं काही हरकत नाही. आता दुसऱ्या पंगतीला बसू. पण आमची तयारी कमी पडली . आम्हाला दुसऱ्या काय पण तिसऱ्याही पंगतीला बसायला जागा मिळाली नाही. शेवटी मित्राने काहीतरी करून जिथे स्वयंपाक चालला होता त्याच खोलीत आम्हाला जेवायला बसवले.

     संभाजीनगरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून काम करत असताना स्वयंसेवकांच्या घरच्या लग्नाला जायचा प्रसंग येत असे. ग्रामीण भागातील लग्नात सर्वत्र एक पद्धत दिसली. लग्न लागण्याच्या आधी नवरानवरी मांडवाच्या प्रवेशद्वारापासून जोडीने बोहल्यावर येत असत. त्यावेळी बॅंडवर हमखास 'बहारों फूल बरसावो मेरा मेहबूब आया है' हे चित्रपगीत वाजवले जात असे. मला प्रश्न पडे की हे गीत ज्या चित्रपटातील आहे तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जी लग्ने होत असत त्या लग्नात नवरानवरी जोडीने येत असताना कोणते गाणे वाजवले जाई? 

    मी तेव्हा धुळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होतो. त्यावेळी मी प्रत्येक सोमवारी उपवास करत असे. त्यादिवशी रात्री जेवत असे. एका कार्यकर्त्याने त्याच्या लग्नाचे निमंत्रण दिले. लग्न धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा या गावी सोमवारी गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) होते. लग्नाच्या दिवशी धुळे शहरातील दुसऱ्या एका कार्यकर्त्यासोबत मी दुपारी धुळ्याहून निघालो. लग्न एका मंगल कार्यालयात होते. आम्ही मुहूर्ताच्या आधी पोचलो. कार्यालयातील तळमजल्यावर लग्न लागले. नवरानवरीची भेट घेतली. आता जेवण पहिल्या मजल्यावर होते. आम्ही जेवणासाठी म्हणून पहिल्या मजल्यावर गेलो. तेव्हा समजले की जेवण दुपारीच होते. तिथून माघारी फिरलो. परत रात्री धुळ्याला पोचलो. आम्ही लग्नाच्या ठिकाणी जेवून येणार असे त्या कार्यकर्त्याने घरी सांगितले होते म्हणून घरी त्याच्यासाठी स्वयंपाक केला नव्हता. आम्ही पोचेपर्यंत घरातील सर्वांचे जेवण झाले होते. स्वयंपाक शिल्लक राहण्याचे कारण नव्हते. मग घरात असलेले चुरमुरे, फरसाण इ.खाऊन माझा सोमवारचा उपवास त्यादिवशी सुटला. 

   एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. लग्न लागल्यावर तेव्हा जेवणाची पंगत बसायची गडबड सुरू झाली तेव्हा ज्यांच्याकडे जेवणाच्या व्यवस्था दिली होती त्यांना काहीजण सूचना करू लागले. त्या सूचना बहुतेक त्यांना पटणाऱ्या नव्हत्या. त्यावेळी ते म्हणाले, " आम्हाला आमच्या लायनीप्रमाणे जाऊ दे." मला पुलंच्या 'म्हैस' कथेची आठवण झाली. शुभेच्छा देऊन, जेवण करून आम्ही बाहेर पडलो तरी ते वाक्य मला आठवत राहिले.

      नुकताच एका लग्नाला गेलो होतो. लग्न लागल्यावर नवरानवरीला भेटून शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी मोठी रांग लागली होती. आमचा क्रमांक आला आणि आम्ही मोठ्या घोळक्याने बोहल्यावर चढलो. आताच्या पद्धतीने शुभेच्छा, फोटो, व्हिडिओ शूटिंग झाले. आता खाली उतरायचे तेव्हा सोबतचे एकजण म्हणाले, ' लग्नात थोडी शिस्त पाळायला हवी.' मी म्हटले,‌‌" लग्नात शिस्त पाळणे अवघडच आहे. "


सुधीर गाडे,  पुणे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख