एक संस्मरणीय दिवस

     काही दिवस उजाडण्यापूर्वीच ते संस्मरणीय होणार याची खात्री असते. काही वेळा दिवस पूर्ण झाल्यावर तो संस्मरणीय झाला हे लक्षात येते. माझ्यासाठी असाच संस्मरणीय ठरलेला दिवस म्हणजे २ डिसेंबर २०२२.

       संस्थेच्या कामासाठी २ डिसेंबर २०२२ ला दिल्ली येथे जायचे ठरले. लोटे घाणेखुंट, ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील म.ए.सो. आयुर्वेद महाविद्यालयाच्या कामासंदर्भात ही भेट होती. भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी यांना भेटणे आणि आयुष खात्याचे मा.केंद्रीय मंत्री श्री. सर्वानंदजी सोनोवाल यांची शक्य झाल्यास सदिच्छा भेट घेणे ही दोन कामे त्यादिवशी व्हावीत अशी कल्पना होती. शक्य झाल्यास मंत्री महोदयांची भेट घेणे असे लिहिले कारण डॉ. देवपुजारी यांनी भेटीची वेळ दिलेली होती परंतु मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून भेटीबाबत निश्चित समजले नव्हते. त्यांचे स्वीय सहाय्यक श्री सैकिया यांच्याशी मोघम संपर्क झाला होता. त्यामुळे दोन डिसेंबरला दिल्लीत जाऊन भेट होते का असा प्रयत्न करायचे ठरले.

     दोन डिसेंबरला सकाळी साडेसात वाजताच्या विमानाने नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्याम सुंदर भाकरे असे आम्ही तघेजण दिल्लीला निघालो. विमान वेळेवर सुटले आणि वेळेवर दिल्लीत पोहोचले. तिथून आम्ही डॉ. देवपुजारी यांच्या कार्यालयात वेळेपूर्वीच पोहोचलो. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर डॉ. देवपुजारी यांची भेट झाली. याच वेळी तिथे मूल्यांकन समितीचे अध्यक्ष म्हणून काम करणारे डॉ. रघुराम भट्ट यांची देखील भेट झाली. 


              ( डॉ.जयंत देवपुजारी यांना भेट)

        मंत्री महोदयांच्या स्वीय सचिवांशी पुन्हा संपर्क केला आणि दुपारच्या सत्रात मंत्री महोदय आयुष मंत्रालयाच्या कार्यालयात येणार आहेत त्यावेळी भेट होऊ शकते असे त्यांनी कळवले. वाटेत भोजन करून आम्ही दुपारी अडीचच्या सुमाराला आयुष मंत्रालयात पोहोचलो. मंत्री महोदय तोपर्यंत मंत्रालयात आले नव्हते. त्यांच्या स्वीय सचिवांना आम्ही तेथे पोहोचलो आहोत हे कळवले आणि मंत्री महोदय येण्याची वाट पाहत आम्ही थांबलो. तेथील अधिकाऱ्यांनी चहाची व्यवस्था केली. पावणे चार चार च्या सुमाराला श्री सैकिया मंत्रालयात आले आणि आमची त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. तेव्हा त्यांनी सांगितले की अचानक मंत्री महोदयांचा कार्यक्रम बदलला आहे आणि ते मंत्रालयात न येता त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. तेथील दुसरे स्वीय सहाय्यक श्री.मुकुल यांच्याशी मी बोलतो. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही निवासस्थानी जाऊन मंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करा. 

    श्री. मुकुल यांच्याशी फोनवर बोलणे झाले आणि त्यांनी निवासस्थानी येण्याबाबत सुचवले. आता आमचे लक्ष घड्याळाकडे लागले होते कारण आमचे परतीच्या विमानाचे तिकीट होते. त्याची वेळ होती सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटे. त्यामुळे सायंकाळची गर्दी लक्षात घेता सव्वापाच साडेपाचच्या सुमाराला आम्हाला विमानतळाच्या दिशेने जाण्यासाठी निघावे लागणार होते. परंतु शक्य झाल्यास मंत्री महोदयांची भेट घ्यावी यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानी पोचलो. 

    श्री.मुकुल यांची भेट झाली आणि त्यांनी मंत्रिमहोदयांच्या कार्यक्रम पत्रिकेत आमचे नाव समाविष्ट केले. त्यांना आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाची कल्पना दिली आणि शक्य तितक्या लवकर भेट मिळावी अशी विनंती केली. त्यांच्या सूचनेनंतर निवासस्थानी असलेल्या छोटेखानी सभागृहात आम्ही वाट पाहत बसलो. आमच्या आधी तेथे अन्य निमंत्रित अधिकारी उपस्थित होते. संसदेच्या आगामी अधिवेशनातील कामकाजासंबंधी मंत्रिमंडळ होतं त्यांची बैठक होणार होती. घड्याळाचे काटे हळूहळू पुढे सरकत होते. दरम्यान श्री सैकियादेखील निवासस्थानी पोहोचले त्यांना देखील आम्ही परत विनंती केली.

      आम्ही भेटीची वाट पाहत असताना डॉ. भाकरे यांच्या परिचित आणि मंत्रालयातील अधिकारी श्रीमती नेसरी त्या ठिकाणी बैठकीसाठी आल्या. त्यांच्याशी बोलणे झाले. थोड्यावेळाने श्रीमती नेसरी यांनी तेथे उपस्थित असलेल्या अन्य अधिकाऱ्यांशी आमचा परिचय करून दिला. संस्थेची माहिती सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी उत्सुकतेने संस्थेच्या कामाबद्दल चौकशी केली. 

       घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. आता पाच वाजले होते आणि उशीर होत असेल तर भेट न घेताच परत जायचे का याबाबत आमची चर्चा चालू होती तसेच भेटीसाठी प्रयत्न देखील चालू होते. अंदमान बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर मंत्री महोदयांच्या भेटीसाठी आले होते. ती भेट संपल्यानंतरच मंत्री महोदय पुढील कार्यक्रमांसाठी वेळ देणार होते. सव्वा पाचच्या सुमाराला लेफ्टनंट गव्हर्नर बाहेर पडले आणि श्री. मुकुल यांनी आम्हाला मंत्री महोदयांच्या निवासस्थानामधील एका कक्षात बोलावून बसायला सांगितले. मंत्री महोदय समोरच्या कक्षात आणखी कोणाशी तरी बोलत होते.  बोलणे झाल्यावर ते या कक्षात येऊन आम्हाला भेटतील असे समजले. अचानक दोन पाच मिनिटांनी मंत्री महोदय आम्ही आधी ज्या सभागृहात बसलो होतो तिकडे गेल्याचे लक्षात आले. आम्ही लगबगीने सभागृहात पोहोचलो श्री मुकुल यांनी मंत्रिमहोदयांना विनंती केली आणि मंत्रिमहोदयांनी अन्य उपस्थितांच्या आधी आमची भेट घेतली मंत्रिमहोदयांना आम्ही संस्थेचा इतिहास ग्रंथ ' ध्यास पंथे चालता ' आणि संस्थेचे बोधचिन्ह भेट दिली संस्थेबद्दल माहिती दिली संस्थेची स्थापना १८६० मध्ये झाली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते हे ऐकल्यानंतर मंत्रिमहोदयांनी उत्सुकतेने संस्थेची माहिती घेतली आणि आम्ही त्यांना संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. २ डिसेंबर हा आसाम दिवस म्हणून साजरा केला जातो. आसामचे असणाऱ्या मा. श्री.सोनोवाल यांना आम्ही आसाम दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जवळपास पाच सात मिनिटे ही भेट झाली.  

  


            ( मा.श्री. सर्वानंद सोनोवाल यांना भेट )

     आम्ही अतिशय आनंदाने सभागृहाबाहेर पडलो बाहेर पडल्यावर श्री सैकीया व श्री.मुकुल यांचे आम्ही आभार मानले. "लवकर जा, म्हणजे तुम्हाला विमानतळावर वेळेवर पोहोचता येईल " असे सांगून त्यांनी आम्हाला निरोप दिला. आता साडेपाच वाजून गेले होते. 

      टॅक्सी मिळाली आणि आम्ही विमानतळाच्या दिशेने निघालो. सायंकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची खूप गर्दी होती. विमानतळावर वेळेत पोचून विमान मिळेल की नाही याची धाकधूक वाटत होती. साधारण पावणेसाच्या सुमारे विमानतळावर पोहोचलो. सुरक्षा तपासणी थोडक्या वेळात आटोपली आणि आम्ही पुढे निघालो. तेथे दाखवलेल्या सूचनेनुसार आमचे विमान अगदी शेवटच्या टोकाला होते. हे अंतर जवळपास अडीच तीन किलोमीटरचे होते. भरभर चालत आम्ही विमान येणार होते त्या ठिकाणी पोचलो. तेथे पोचल्यानंतर अजून विमान प्रवाशांना विमानात घेण्याची सुरुवात झाली नाही हे लक्षात आले आणि आम्हाला हुश्श झाले. तेथे चहा घेतला.  पाचच मिनिटात आम्हाला विमानात प्रवेश मिळाला. दिवस संपला होता पण तो संस्मरणीय झाला होता.


सुधीर गाडे, पुणे 

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख