दुचाकी लावताना

     " बरं, झालं तुम्ही गाडी मेन स्टॅंडवर लावली." मध्यंतरी मी एके ठिकाणी गाडी लावताना शेजारी लावलेली स्वतःची गाडी काढण्याची वाट बघत असलेले एकजण मला म्हणाले. " मी नेहमी मेन स्टॅंडवर गाडी लावतो." मी उत्तर दिले. याबद्दल मनात नेहमीच विचार येत असतो.

             ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

     पुणे शहरात दुचाकींची संख्या खूप मोठी आहे. बहुतेक वेळा बऱ्याच गाड्या साईड स्टॅंडवर लावलेल्या दिसतात.‌ साईड स्टॅंडवर गाडी लावणे जास्त सोपे आणि चटकन होणारे असते. त्यामुळे महिला आणि पुरुष दोघेही सहजपणे गाडी साईड स्टॅंडवर लावतात. अनेक वेळा असे होते की मेन स्टॅंड वापरले जातच नाही. त्यामुळे चुकून कधी ते वापरायचे म्हटले तर सहजासहजी शक्य होत नाही. त्यासाठी खूप ताकद लावावी लागते. दोन वाहनांच्या मध्ये असलेल्या थोड्याशा जागेत गाडी लावता येत नाही. तेव्हा आजूबाजूची वाहने मेन स्टॅंडवर लावण्यासाठी खूप खटपट करावी लागते.

       साईड स्टॅंडवर गाडी लावली की त्यासाठी जास्त जागा लागते. साधारण १५% जास्त जागा लागते असे मला वाटते. म्हणजे याचा अर्थ एखाद्या ठिकाणी १०० गाड्या लावण्याची सोय केली असेल तर त्या ठिकाणी साधारण ८५- ८७ गाड्या लावल्या जातात.‌ त्यामुळे जागा अपुरी पडते. यातून समस्या अधिक गंभीर होते.

    यात अजून एक भर पडते. पुणे शहरात बरेच दुकानदार दुकानासमोर कोणी गाडी लावू नये, स्वतःच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना जागा रहावी म्हणून मोठे लोखंडी स्टॅंड दुकानासमोर लावतात. दुकान ज्या इमारतीत आहे त्या इमारतीत जाण्याच्या मार्गावर नो पार्किंग असतेच. यामुळे वाहने लावण्यासाठी अजून कमी जागा उपलब्ध होते. 

     कधी‌ कधी असे वाटून जाते की हॅक्सा ब्लेड घेऊन जावे आणि साईड स्टॅंडवर लावलेल्या गाड्यांचे साईड स्टॅंड कापून काढावे. पण मग‌ विचार येतो शहरातील खाजगी वाहनांची संख्या का वाढते? शहरातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणा ही पुरेशी सक्षम नाही. कमीत कमी वेळात पाहिजे त्या ठिकाणी पोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकजण नाईलाजाने स्वतःची खाजगी गाडी घेतात. त्यामुळे खाजगी गाड्यांचे प्रमाण वाढते आणि वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडते. जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम केली तर कदाचित हा प्रश्न थोडा सुटू शकेल.

       पण मग शहरातील लोकसंख्या का वाढते? ग्रामीण भागातील सोयीसुविधा अपुऱ्या पडतात, चांगल्या नसतात त्यामुळे शहरात स्थलांतर होत जाते. त्यामुळे कधीकाळी ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात शहरी लोकसंख्या जास्त झाली आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकूणच समाजजीवन गुंतागुंतीचे, धावपळीचे झाले आहे. समाजाचे प्राधान्यक्रम आणि विचार बदलणे, ग्रामीण भागात चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणे यासारखे पर्याय प्रत्यक्षात आणले गेले तर परिस्थिती बदलू शकते. 

     या गोष्टी किती वेगाने बदलतील,‌‌‌‌‌कोण बदलतील  हे सांगता येणे कठीण आहे. तोपर्यंत आपल्या हातात जे आहे ते आपण करू शकतो. प्रश्न थोड्या प्रमाणात कमी व्हावा यासाठी प्रयत्न करू शकतो. तोच करत रहायला हवे.


सुधीर गाडे, पुणे 

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख